काही दिवसांपूर्वी राज्यात आलेल्या ‘क्यार’ वादळामुळे भातशेती व सुपारी पिकाचे मिळून अंदाजे दीड ते दोन कोटींचे नुकसान झाल्याची माहिती कृषिमंत्री बाबू कवळेकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
वरील वादळामुळे ५०० हेक्टर जमिनीतील कृषी पिकाचे नुकसान झालेले असून त्याचा फटका १०११ शेतकर्यांना बसला आहे. या शेतकर्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तसेच गेल्या पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे २ हजार हेक्टर एवढ्या कृषी जमिनीतील पिकाचे नुकसान झाले होते. राज्यातील सुमारे ६३३६ शेतकर्यांना या पुराचा फटका बसला होता. नुकसानाचा एकूण आकडा हा ९ कोटींचा होता. या शेतकर्यांपैकी केळी उत्पादकांना नुकसान भरपाईच्यापोटी सरकारने ९४ लाख रु.चा निधी वितरीत केला होता. अन्य शेतकर्यांना नुकसान भरपाई देणे शिल्लक असल्याचे ते म्हणाले.
ज्यांच्या भातशेतीचे नुकसान झालेले आहे त्यांना यापूर्वी हेक्टरमागे २५ हजार रु. देण्यात येत असत. आता हेक्टर मागे ४० हजार रु. देण्याचा विचार असल्याचे ते म्हणाले. भातशेतीचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना जास्तीत जास्त २ लाख रु. एवढी नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सेंद्रिय शेतीसाठी केंद्राकडून ५० कोटी
राज्यात सेंद्रीय शेतीसाठीचा उपक्रम सुरू करण्यासाठी केंद्राकडून कृषी खात्याला पुढील तीन वर्षांच्या काळात ५० कोटी रु. एवढा निधी मिळणार असल्याची माहिती कृषिमंत्री बाबू कवळेकर यांनी दिली. वरील निधीचा उपयोग करुन राज्यात १० हजार हेक्टर जमिनीत सेंद्रीय शेती करण्यासाठी एकूण ५०० क्लस्टर (समूह) तयार करण्यात येणार आहे. वरील योजनेसाठी पहिल्या वर्षी केंद्राकडून १६ कोटी ५० लाख रु., दुसर्या वर्षी १७ कोटी रु. तर तिसर्या वर्षी १६ कोटी ५० लाख रु. अशा प्रकारे ५० कोटी रु. एवढा निधी तीन हप्त्यांत देण्यात येणार आहे.
किसान योजनेसाठी ५ रोजी नावनोंदणी
प्रधानमंत्री किसान निधी योजना व प्रधानमंत्री किसान मानधन योजना या दोन योजनांचा राज्यातील शेतकर्यांना लाभ मिळावा यासाठी दि. ५ रोजी राज्यातील शेतकर्यांची विभागीय कृषी कार्यालयांत नावनोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री कवळेकर यांनी काल दिली.
किसान निधी योजनेखाली केंद्र सरकारकडून शेतकर्यांना प्रत्येकी ६ हजार रु. देण्यात येणार असून दोन-दोन महिन्यांच्या अंतराने तीन हप्त्यात हा निधी देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेखाली वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या शेतकर्यांना मासिक ३ हजार रु. एवढे निवृत्तीवेतन मिळणार आहे. त्यासाठीही नोंदणी ५ नोव्हेंबर रोजी करावी लागणार आहे. १८ ते ४० ह्या वयोगटातील शेतकरी त्यासाठी आपल्या नावाची नोंदणी करु शकतील. त्यांना आपल्या वयानुसार रु. ५५ ते २०० रु. पर्यंत मासिक हप्ता या पेन्शनसाठी भरावा लागणार आहे.