कोहिनूर

0
7

भारतीय उद्योगविश्वातील नैतिकतेचा एक मानदंड काल आपल्या डोळ्यांआड झाला. रतन टाटा यांच्या रूपाने केवळ टाटा समूहाचाच नव्हे, तर भारतीय उद्योगविश्वाचा एक जागतिक चेहरा आणि एका भव्योदात्त अशा आदर्श कार्यसंस्कृतीचा कदाचित अखेरचा शिलेदार आपली अमीट छाप मागे ठेवून आपल्यातून निघून गेला. आर्थिक उदारीकरणाच्या पंखांवर स्वार होऊन भारतीय अर्थव्यवस्था नुकतीच कुठे पिंजऱ्याबाहेर पडत असताना टाटा समूहाची सूत्रे रतन टाटांकडे आली होती. पाठीशी ‘टाटा’हे बलदंड नाव जरूर होते, परंतु समुहातील एकेक कंपनी म्हणजे एकेक स्वायत्त संस्थान बनून गेलेले होते. जमशेटजी आणि जेआरडींचा नीतीमान वारसा पाठीशी जरूर होता, परंतु त्यांच्या तालमीत तयार झालेली जुनी खोडे काही नवे करू पाहणाऱ्या रतन टाटांच्या नव्या स्वप्नांमध्ये आडकाठी घालायला उभी होती. काही नवे करायचे असेल तर आधी हे अडथळे दूर करणे जरूरीचे होते. ‘टिस्को’चे रूसी मोदी, ‘टाटा केमिकल्स’चे दरबारी सेठ, ‘इंडियन हॉटेल्स’चे अजित केरकर, ‘टेल्को’चे सुमंत मुळगावकर आदी एकेका महारथींनी टाटांच्या साम्राज्याचा एकेक स्तंभ बनून आपापल्या कंपन्या मोठ्या उंचीवर जरूर नेल्या होत्या, परंतु ‘टाटा’ नाव त्या धारण करीत असल्या, तरी त्यांची तोंडे एका दिशेला नव्हती. ह्या सर्व कंपन्या एका छत्राखाली आणणे जरूर होते. मग रतन टाटांनी संचालकांसाठी 75 व्या वर्षी सेवानिवृत्तीचा नियम आणला आणि एकेक जुनी खोडे हटवायला सुरूवात केली. ‘सभ्यता’ ह्या शब्दाचा प्रतिशब्द ठरावा अशा शांत, संयमी, सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाचे रतन टाटा ‘वज्रादपि कठोरानी’ बनून काय करू शकतात ह्याचे हे दर्शन टाटा समूहातील तत्कालीन 84 कंपन्यांमध्ये योग्य तो संदेश पोहोचवण्यास पुरेसे होते.
रतन टाटांच्या कणखरपणाचे दुसरे उदाहरण ठरले ते पुण्याच्या टेल्कोतील संप आणि दंगलखोरी त्यांनी ज्या तऱ्हेने चिरडून टाकली त्याचे. टाटांचा कार्यभार स्वीकारल्यावर एक गोष्ट रतन टाटांच्या लक्षात आली, ती म्हणजे समूहातील कंपन्या जरी असंख्य असल्या, तरी त्यातील बहुतेकांची मालकी निरनिराळ्या विश्वस्त संस्थांकडे होती. खुद्द टाटांपाशी खूपच कमी मालकी होती. सरकारी वित्तसंस्थांनी मनात आणले तर त्या कंपन्यांवर कब्जा करू शकतात हे ध्यानी आल्याने ह्या सर्व कंपन्यांतील आपले भांडवल वाढवण्याचा टाटा सन्सने निर्णय घेतला आणि टीकेची पर्वा न करता तो धडाडीने अंमलात आणला. रतन टाटांचे खरे कर्तृत्व दिसले ते त्यांनी ह्या समूहाला जागतिक पातळीवर नेले तेव्हा. आपल्या समूहातील एकेका कंपनीचे सुकाणू हाती घेऊन त्यांचा कारभार सुरळीत करण्याचा प्रयत्न तर त्यांनी केलाच, परंतु परदेशांतील छोट्यामोठ्या कंपन्यांना विकत घेऊन ‘टाटा’ हा जागतिक ब्रँड कसा बनेल ह्याकडे त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले. अशा प्रकारे विश्वव्यापी ओळख निर्माण करणारा ‘टाटा’ हा पहिला भारतीय उद्योगसमूह ठरला. भारतात ‘टाटा’ तर पिढ्यानपिढ्या अग्रणी होतेच, परंतु एक नवी जागतिक ओळख ह्या सगळ्या खरेदी व्यवहारांतून रतन टाटांनी निर्माण केली. टेटली, कोरस, जॅग्वारपासून 60 हून अधिक विदेशी कंपन्या टाटांनी आपल्या ताब्यात घेऊन भारतीय उद्योगक्षेत्राची आणि पर्यायाने भारताचे वाढते सामर्थ्य ताकद जगाला दाखवून दिले. अर्थात, अवघे जग पादाक्रांत करीत असतानाही आपला देश आणि आपली माणसे हे रतन यांच्यासाठी प्राधान्य होतेच. भारतातील संपूर्णतः स्वदेशी बनावटीची कार त्यांनी बनवली आणि तिला यथार्थ नाव दिले, ‘इंडिका.’ दुर्दैवाने पुढे हा वाहन उद्योग तोट्यात गेला, तेव्हा फोर्ड कंपनीकडे मांडलेला विक्रीचा प्रस्ताव त्या कंपनीने मोठ्या गुर्मीत उडवून लावला. परंतु काही वर्षांतच अशी परिस्थिती आली की ही गुर्मी दाखवणारी फोर्ड दिवाळखोरीत निघाली आणि तिला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी तिची उपकंपनी जॅग्वार लँडरोव्हर विकत घेण्यासाठी टाटांची मनधरणी करण्याची पाळी तिच्यावर आली. जॅग्वारची खरेदी हा टाटांच्या शिरपेचातील मानाचा तुरा ठरला.
एकदा भर पावसात स्कूटरवरून चाललेले चौघांचे कुटुंब रतन टाटांनी गाडीतून पाहिले आणि सर्वसामान्यांना परवडेल अशी कार बनवण्याचा त्यांनी विडा उचलला. पश्चिम बंगालमध्ये सिंगूरला त्यासाठी सुसज्ज कारखाना उभारला गेला. परंतु ममता बॅनर्जींनी त्याविरुद्ध मोठे आंदोलन पुकारले. नव्याने उभारलेला कारखाना बंद पडायची वेळ आली, तेव्हा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी असलेल्या नरेंद्र मोदींनी रतन टाटांना केवळ एका शब्दाचा एसएमएस पाठवला, ‘वेलकम!’ आणि सिंगूरचा सुरू होऊ न शकलेला हा कारखाना तीन हजार ट्रकांच्या मदतीने अख्खाच्या अख्खा गुजरातेत साणंदला हलवणारे जगाने कधी न पाहिलेले स्थलांतर त्यावेळी घडले. त्या कारखान्यात गिरीश वाघ ह्या मराठमोठ्या अभियंत्याने कागदावर उतरवलेली ऐतिहासिक कार तयार झाली, ‘नॅनो’. आपला संकल्प जाहीर करताना ‘दोन हजार डॉलर्सची कार बनवण्या’चे वचन त्यांनी एका अर्थविषयक नियतकालिकातील मुलाखतीत दिले होते. तेव्हा डॉलरचा भाव पन्नास रुपयांना एक डॉलर होता. प्रत्यक्षात सिंगूर ते साणंद स्थलांतरित होऊन जेव्हा ही कार तयार झाली, तोवर डॉलरचा भाव आणि तिच्यावरील खर्च कितीतरी पटींनी वाढलेला होता. परंतु ‘प्रॉमिस इज अ प्रॉमिस’ म्हणत रतन टाटांनी एक लाख रुपयांनाच ‘नॅनो’ बाजारात उतरवली आणि लाखो गोरगरीबांचे चारचाकीचे स्वप्न साकार झाले. कोणताही गाजावाजा न करता आणि प्रसिद्धीच्या झोतापासून सदैव चार हात दूर राहून रतन टाटांनी जे सामाजिक कार्य केले आहे, ते तर फार मोठे आहे. आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास, प्राणीकल्याण अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांच्या देणगीतून मोठमोठे प्रकल्प साकारले आहेत. किती स्टार्टअप्सचे ‘एंजल इन्व्हेस्टर’ बनून त्यांनी त्यांना उभारी दिली ह्याचीही गणतीच नाही. एवढे मोठे औद्योगिक साम्राज्य म्हटले की वादविवाद हे आलेच. रतन टाटांच्या कारकिर्दीतही काही वादाचे प्रसंग उद्भवले. टाटा फायनान्समधील आर्थिक घोटाळा, सायरस मिस्त्री प्रकरण, नीरा राडिया टेप्स, परंतु ‘टाटा’ ह्या नावावर कधीही किटाळ उसळले नाही, त्यामागे होता भारतीय जनतेचा ह्या नावावरील प्रचंड विश्वास. ‘ताज’वरील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाच नव्हे, तर हॉटेलशेजारच्या चणेफुटाणे विकणाऱ्यांच्या कुटुंबीयांना देखील ‘टाटां’च्या माणसांनी घरी जाऊन नुकसान भरपाई दिली. जनसामान्यांचा जो विश्वास जमशेदजी, जेआरडींपासून ह्या समूहाने कमावलेला होता, नैतिकतेवर आधारलेली जी विलक्षण कार्यसंस्कृती निर्माण केलेली होती, तिला रतन टाटांनी आपल्या काळात शिखरावरच नेले. अत्यंत निर्व्यसनी आणि आजीवन अविवाहित राहिलेल्या रतन टाटांचा साधेपणा, विमानतळावर देखील स्वतःची बॅग स्वतः घेऊन जाणे, टाटा समूहात सन्मानाने परतलेल्या ‘एअर इंडिया’ तून प्रवास करताना देखील कधीही न दिसणारा बडेजाव, शॉप फ्लोअरवर सुरूवात करून 29 वर्षांनी चेअरमन बनल्यावर देखील न बदललेला शांत, संयमी, शालीन, सुसंस्कृत स्वभाव.. किती गोष्टी सांगाव्यात! पद्मविभूषण रतन टाटा हीच मुळात एक दंतकथा बनली आहे. पैसा अनेकांपाशी असतो, परंतु दानत असतेच असे नाही. नफा हेच व्यवसायाचे ध्येय मानणारे असंख्य असतात, परंतु सामाजिक बांधिलकी आणि व्यावसायिक नीतीमत्ता ह्या पायावर ज्यांचा व्यवसाय उभा असतो, तेच उद्योगपती समाजात आदराचे स्थान कमावतात. रतन टाटा हे असे नैतिकतेचे दुसरे नाव होते. ‘टाटां’ंविषयीचा हा विश्वास कसा निर्माण झाला, असा सवाल एका पत्रकाराने त्यांना केला होता. रतन टाटा तेव्हा विनयाने म्हणाले होते, ‘भारतात जे जे नवीन घडले, त्याच्याशी टाटा जोडले गेले हेच त्याचे कारण असावे. टाटा हे काही राजघराणे नव्हे, की प्रत्येक राजपुत्र राजा बनावा. प्रत्येक पिढीला हे अधिराज्य आणि हा विश्वास नव्याने कमवावा लागला आहे! ‘मला बोलावल्याबद्दल पश्चात्ताप करण्याची वेळ तुमच्यावर कधीही येणार नाही’ असे जेआरडींना आश्वासन दिलेल्या रतन टाटांनी आपल्या संपूर्ण हयातीत तो शब्द खरा करून दाखवला हे निःसंशय. कार आणि ट्रकांपासून विमानांपर्यंत, पाणी आणि मिठापासून चहा – कॉफीपर्यंत, कपड्यांपासून दागिन्यांपर्यंत, मनगटावरील घड्याळापासून पोलादापर्यंत, हॉटेलांपासून इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत, आपल्या जीवनाच्या हरेक क्षेत्रामध्ये ‘टाटां’चे आज जे अस्तित्व आहे, त्या साम्राज्याचा हा सम्राट आता आपल्याला सोडून गेला आहे. रतन टाटा हे केवळ ‘रतन’नव्हे, हा तर भारतीय उद्योगजगताचा ‘कोहिनूरच’ होता.