>> लवकरच २-१८ वयोगटाचे लसीकरण
देशातील २ ते १८ वर्षांच्या वयोगटातील मुलांसाठी ‘भारत बायोटेक’च्या ’कोव्हॅक्सिन’ लशीच्या आपत्कालीन वापराला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे, आता देशात अल्पवयीन मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास लवकरच सुरूवात होणार आहे. याआधी, लहान मुलांवर या लशीच्या वापराला तज्ज्ञांकडून हिरवा कंदील देण्यात आला होता. त्यामुळे अधिकृतरित्या या लशीचा लहान मुलांसाठी वापराला मंजुरीचा मार्ग मोकळा झाला आहे. लसीकरणासंबंधी नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीने ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ला (डीजीसीआय) २ ते १८ वयोगटातील मुलांसाठी ’कोव्हॅक्सिन’च्या वापरासाठी शिफारस केली होती. ती शिफारस ‘डीजीसीआय’कडून मंजूर करण्यात आली आहे.
आतापर्यंत भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही लस १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी उपलब्ध होती. मात्र, आता ही लस लहान मुलांनाही या लशीचा वापर केला जाणार आहे. मात्र या लशीच्या किंमतीबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. लहान मुलांच्या लसीकरणासाठी सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून गंभीर आजारी असलेल्या मुलांना ही लस प्रथम देण्यात येईल. ही लस मिळेपर्यंत दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.