>> आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची ग्वाही
संरक्षण मंत्रालयाकडून गोवा सरकारला कोविड – १९ उपाययोजनांसाठी सर्व प्रकारची मदत केली जाणार आहे, अशी माहिती संरक्षण, आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, संरक्षण दलाच्या तिन्ही विभागाच्या राज्यातील प्रमुख अधिकार्यांसोबत आयोजित बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.
राज्यात वाढणारी कोरोना बाधितांची संख्या चिंतेचा विषय आहे. राज्य सरकार कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे. गोव्यातील कोरोना विषाणू नियंत्रणात आणण्यासाठी संरक्षण दलाकडून आवश्यक सहकार्य दिले जाणार आहे. संरक्षण दलाच्या इस्पितळामधून आवश्यक वैद्यकीय सेवा व इतर प्रकारची मदत केली जाणार आहे, असेही मंत्री नाईक यांनी सांगितले.
चाळीसही मतदारसंघातून
गोळ्यांचे वितरण
केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून राज्य सरकारला आवश्यक मदत केली जात आहे. कोरोना विषाणू रोखण्यासाठी जनतेची साथ हवी. केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमांचे योग्य पालन करण्याची गरज आहे. आयुष मंत्रालयाकडून प्रतिकारशक्ती वाढविणार्या गोळ्यांचे वितरण करण्यात आलेले आहे. तसेच एका नवीन प्रतिबंधात्मक औषधाचे वितरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. राज्यातील चाळीस मतदारसंघातून या औषधांचे वितरण केले जाणार आहे, असेही मंत्री नाईक यांनी सांगितले.