कोविड महामारी आणि अर्थव्यवस्था यावर कृती आराखडा तयार करा

0
126

>> दिगंबर कामत यांची राज्यपालांकडे मागणी

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी काल राज्यपाल सत्यपाल मलीक यांची राजभवनवर जाऊन भेट घेतली व कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी गोवा सरकारने कोणती पावले उचलायला हवीत त्यासंबंधीच्या आपल्या सूचना व उपाय योजनासंबंधीचे एक निवेदन त्यांना सादर केले. राज्य सरकारने कोरोनासंबंधी राज्यभरातील लोकांची चाचणी करण्याचे काम हाती घ्यावे. त्याचबरोबर कोविड महामारी व अर्थव्यवस्था यावर त्वरीत कृती आराखडा तयार करावा तसेच श्वेतपत्रिका जारी करावी, अशी मागणीही कामत यांनी केली आहे.

सरकारने विनाविलंब व्हेंटिलेटर्स, अन्य आवश्यक यंत्र सामुग्री तसेच कोविड रुग्णांसाठी ‘आयसीए’आरने सांगितलेली औषधे यांचा योग्य पुरवठा करावा, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे काम पूर्ण करून तेथे कोविड रुग्णांसाठी सोय करावी. त्यासाठी प्रधानमंत्री केअर निधीतून पैसे आणावेत, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

कोविड हाताळणीत सरकारने सर्वांना विश्वासात घेणे महत्त्वाचे असल्याचे कामत यांनी म्हटले आहे. सरकारने दक्षिण व उत्तर गोवा अशी दोन्ही जिल्ह्यात दोन कोविड इस्पितळे सुरू करावीत व खासगी इस्पितळातील अतिदक्षता विभागात २० टक्के खाटा कोविड रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्याचा विचार बदलावा, अशी मागणीही कामत यांनी केली आहे.

‘इंट्रानेट’चा वापर करा
राज्यात ऑनलाइन शिक्षणासाठी माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी गोव्याला भेट दिलेल्या इंट्रानेट सुविधेचा वापर केला जावा, अशी सूचनाही कामत यांनी केली आहे.