कोळशाच्या ढिगार्‍याखाली सापडून वास्कोत कामगार ठार

0
108

>> एक गंभीर, मुरगाव बंदरातील दुर्घटना

काल शुक्रवारी पहाटे मुरगाव बंदरातील जिंदाल साऊथ वेस्ट पोर्ट कंपनीच्या कोळसा हाताळणी जागेत काम करतान दोन मजूर कोळशाच्या ढिगार्‍याखाली गाडले गेले. त्यांपैकी दिलीप दास याचे जागीच निधन झाले तर शाहना अली हा मजूर गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. काल पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान ही दुर्घटना घडली.
मुरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास दिलीप दास आणि शाहना अली हे मजूर मुरगाव बंदरात साठवून ठेवलेल्या कोळशाच्या ढिगार्‍यावर ताडपत्री (आच्छादन) घालण्याचे काम करत होते. त्यावेळी अचानक सुसाट्याचा वारा आणि पाऊस आला. अचानक आलेल्या या तुफानामुळे त्यांचा ताडपत्रीवरील ताबा सुटला आणि कोळसा ढिगार्‍याचा काही भाग कोसळला. या कोसळलेल्या ढिगार्‍याखाली दोन्ही कामगार गाडले गेले.
यावेळी जवळच असलेल्या दुसर्‍या कामगारांनी ही घटना पाहिली असता त्यांनी आरडा ओरडा करून इतरांना बोलावून घेतले. यावेळी जवळच असलेल्या जेसीबीद्वारे कोळसा उपसून त्यात गाडलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात आले. यात शाहना अली हा मजूर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर दुसरा मजूर दिलीप दास याचे जागीच निधन झाले. त्याचा मृतदेह शवचिकित्सेसाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे. मुरगाव स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मेलीनो फर्नांडिस हे निरीक्षक प्रवीणकुमार वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील चौकशी करीत आहेत.