कोल्हापूरचे माजी खासदार सदाशिवराव मंडलिक (वय ८०) यांचे सोमवारी रात्री मुंबईत वृध्दापकाळाने निधन झाले. मंडलिक काही काळापासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर बॉम्बे रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. काल दुपारी कोल्हापूरातील कागल तालुक्यातील मुरगूड या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सदाशिवराव मंडलिक तीन वेळा कोल्हापूरचे खासदार राहिले. त्याआधी त्यांनी तीन वेळा विधानसभेत कारकिर्द गाजवली. जिल्हा परिषदेतही त्यांनी काम केले. ९०च्या दशकात शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी शिक्षण व पाटबंधारे खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते.