कोरोना स्थिती गंभीर

0
29

जगभरामध्ये कोरोनाच्या नव्या लाटेस कारणीभूत ठरलेला ओमिक्रॉन व्हेरियंट अखेर ब्रिटनमधून गेल्या सतरा डिसेंबरला गोव्यात आलेल्या एका आठवर्षीय मुलाच्या माध्यमातून गोव्यात दाखल झाला आहे. हा मुलगा ज्याअर्थी गोव्यात आला म्हणजे त्याच्यासोबत त्याचे कुटुंब आले, येथील नातेवाईकांमध्ये, मित्रपरिवारामध्ये गेले दहा दिवस मिसळले. नाताळ साजरा केला. याचा अर्थ ओमिक्रॉनचा संसर्ग बर्‍याच मोठ्या प्रमाणात राज्यात पसरलेला असू शकतो, परंतु सध्या तरी केवळ हिमनगाचे टोक दिसते आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे, कारण मुळात कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरियंट हा डेल्टापेक्षा तिप्पट अधिक संसर्गजन्य असल्याचे सिद्ध झालेले आहे. ज्या झपाट्याने त्याचा फैलाव जगभरात होतो आहे आणि आता भारतातही बघता बघता ज्या वेगाने ओमिक्रॉनचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे, ते लक्षात घेता गोव्याला नववर्षाच्या स्वागताच्या नादात हलगर्जी न करता कोरोनाच्या तिसर्‍या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी कडक निर्बंध घालणेच श्रेयस्कर ठरेल.
ओमिक्रॉनचा संसर्ग देशात वाढू लागल्याचे दिसताच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने २१ डिसेंबरला सर्व राज्यांना सुस्पष्ट दिशानिर्देश दिले. निर्बंध, चाचण्या, रुग्णांचा शोध, पाळत, वैद्यकीय व्यवस्थापन, लसीकरण आणि कोविडयोग्य वर्तन या सर्व अंगांनी राज्य सरकारांनी कोणती खबरदारी घेतली पाहिजे याचे लिखित स्वरूपातील मार्गदर्शन केंद्र सरकारने केलेले आहे. आता राज्य सरकारची जबाबदारी ठरते ती ह्या मार्गदर्शक सूचनांच्या काटेकोर अंमलबजावणीची. राज्य सरकारने कोरोनाविषयक तज्ज्ञ समिती आणि कृतिदल नियुक्त केलेले आहे. त्यामुळे आता ह्या तज्ज्ञ समिती आणि कृतिदलावर राज्यातील कोरोनाविषयक परिस्थिती हाताळण्याची संपूर्ण जबाबदारी येते. तज्ज्ञ समितीच्या परवा झालेल्या बैठकीत काही शिफारशी कृतिदलाला करण्यात आल्या आहेत, ज्यासंबंधी तातडीच्या निर्णयांची गरज आहे. केंद्र सरकारने केलेल्या शिफारशींत मुख्यत्वे एका आठवड्यात टेस्ट पॉझिटिव्हिटी दर दहा टक्क्यांवर गेल्यास किंवा आयसीयूंतील चाळीस टक्के प्राणवायूयुक्त खाटा भरल्यास राज्यात कडक निर्बंध जारी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. ही परिस्थिती उद्भवेपर्यंतचे निर्णयस्वातंत्र्यही राज्य सरकारांना आहे व स्थानिक पातळीवर त्यांनी निर्णय घ्यायचा आहे.
राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती चिंताजनक बनू लागली आहे. काल कोरोनाचे तब्बल ११२ रुग्ण आढळले. ओमिक्रॉनचा एकच रुग्ण अधिकृतपणे अद्याप आढळलेला असला तरी एकूण सक्रिय रुग्णसंख्या पाचशेच्या वर पोहोचली आहे. काल विमानतळावर विदेशांतून आलेले तब्बल पाच प्रवासी कोरोनाबाधित सापडले. ते कोणत्या व्हेरियंटचे बाधित आहेत हे कळायला वेळ लागेल. राज्यातील चाचण्या आणि नवे रुग्ण यांचे प्रमाण तपासले तर दैनंदिन टेस्ट पॉझिटिव्हिटी दर गेले काही दिवस सतत चार टक्क्यांवर दिसतो. म्हणजेच कमी प्रमाणात चाचण्या होऊनही अधिक रुग्ण सापडत आहेत. या परिस्थितीत तज्ज्ञ समितीने रात्रीची संचारबंदी, शाळा, सार्वजनिक सोहळ्यांतील उपस्थिती, हॉटेलमधील पाहुण्यांची आरटीपीसीआर चाचणी आदी विविध गोष्टींसाठी गणिती सूत्रे घालून दिली आहेत, परंतु कोरोनासारखा संसर्ग जेव्हा उसळी घेतो तेव्हा ही सारी गणिती सूत्रे कोलमडून पडतात हा अनुभव अवघ्या जगाने आजवर घेतलेला आहे. निर्बंध लागू करण्यासाठी हे जे टक्केवारीचे निकष तज्ज्ञ समितीने समोर ठेवलेले आहेत, त्यावर विसंबून न राहता भोवतालची परिस्थिती पाहून तत्पर अंमलबजावणी होणे अधिक जरूरी आहे. सध्या राज्य नववर्षाच्या स्वागताच्या जोशात आहे. कॅसिनोंपासून पर्यटन व्यावसायिकांपर्यंत सर्वत्र देशी विदेशी पाहुण्यांचे लोंढे लोटू लागले आहेत. अशा वेळी सर्व नववर्ष रजनींवर बंदी घालून रात्रीची संचारबंदी करण्याचे आणि मेजवान्यांना मज्जाव करण्याचे धाडस ह्या सरकारमध्ये दाखवायला हवे. इतर सर्व राज्यांनी रात्रीची संचारबंदी जारी केली आहे, परंतु गोवा सरकारला जनतेपेक्षा कॅसिनो लॉबी आणि बड्या पर्यटन व्यावसायिकांची अधिक चिंता दिसते. परंतु कोणाचे कितीही हितसंबंध यात गुंतलेले असोत, ज्या तर्‍हेने परिस्थिती बिघडू लागली आहे ते पाहिल्यास सरकारला येत्या नववर्षात पुन्हा कडक निर्बंध लागू करणे भाग पडेल असे चित्र दिसू लागले आहे. पर्यटन, लग्नसराई, निवडणुकांच्या या धुमाकुळामध्ये गोमंतकीय जनतेवर कोरोनाच्या नव्या लाटेची टांगती तलवार लटकू लागली आहे. तज्ज्ञ समितीने जनतेचे हित पाहावे. राजकीय दबावापोटी कठोर निर्णय घेण्यात चालढकल करू नये हीच जनतेची अपेक्षा आहे. कोणत्याही परिस्थितीत गोव्यात पुन्हा मृत्युसत्र सुरू होता नये.