>> 6 रुग्णांना केले इस्पितळात दाखल; सक्रिय कोरोना रुग्णसंख्या 178 वर
राज्यात कोरोना महामारीचा धोका पुन्हा एकदा वाढू लागला असून, मागील चोवीस तासांत नवीन तब्बल 55 कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. नव्या रुग्णांपैकी 6 रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले असून, राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या 178 एवढी झाली आहे.
राज्यात मागील कित्येक महिन्यात कमी प्रमाणात नवीन कोरोनाबाधित आढळून येत होते; मात्र मार्च महिन्यापासून नवीन कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यास प्रारंभ झाला. राज्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीला सक्रिय कोरोना रुग्णसंख्या केवळ 10 एवढी होती. आता, सक्रिय रुग्णसंख्या दोनशेच्या जवळ जाऊन ठेपली आहे. एकाच दिवशी नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येने 50 चा आकडा पार केला आहे. राज्यात चोवीस तासांत 555 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यात बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 9.9 टक्के एवढे होते.
दुसऱ्या बाजूला देशपातळीवर कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. त्याच बरोबर एच3एन2 व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी नागरिकांमध्ये कोरोनाबाबत अजूनपर्यंत सावधगिरी दिसून येत नाही. राज्यात बऱ्याच नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर केला जात नसल्याचे सर्रास दिसून येत आहे.
आरोग्य खाते सतर्क; फ्लू क्लिनिक पुन्हा सुरू करण्याचा विचार
ख् राज्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य खाते सतर्क झाले आहे. आजारी नागरिकांची योग्य तपासणी केली जात आहे. तसेच, राज्यात फ्लू क्लिनिक पुन्हा सुरू करण्यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी काल दिली.
ख् कोरोना महामारीबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी केली जात आहे. राज्य सरकारकडून वेगळी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जात नाहीत. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्कचा वापर करावा, एकाच ठिकाणी गर्दी करू नये, अशा सूचना मंत्री विश्वजीत राणे यांनी दिल्या.