- डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)
कोरोनाचा व्हायरस ५५ अंशांपेक्षा जास्त तापमानात नष्ट होतो. त्यामुळे तो शिजवलेल्या, तळलेल्या अन्नात राहूच शकत नाही. त्यामुळे चिकन, अंडी, मासे खायला हरकत नाही. पण हे सर्व पचायला जड असल्याने व उष्ण असल्याने हलके अन्न सेवन केलेलेच उत्तम.
शालांत परीक्षा रद्द झाल्या. गर्दीचे ठिकाण टाळा. हात स्वच्छ पाण्याने परत परत धुवा, सॅनिटायझर्सचा वापर करा, नाका-तोंडाला मास्क बांधा, घरचे जेवण जेवा, बाहेरचे हॉटेल-रेस्टॉरेंटमध्ये खाणे टाळा… अशा विविध सूचना सरकार विविध माध्यमांद्वारे जनतेला देत आहे. काही जणांमध्ये भीतीचे वातावरण आहे तर बर्याच जणांना ही अतिशयोक्ती वाटते. आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवार २२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ वा.पर्यंत कोणीही घरातून बाहेर पडू नये.. असे आवाहन केले होते ज्याची ‘जनता कर्फ्यू’ म्हणून नोंद केलेली आहे. पण खरंच ही अतिशयोक्ती आहे का? आपल्याला भीती वाटण्याची गरज नाही पण सरकारच्या सगळ्या सूचनांचे पालन करणे हे नक्कीच आपले कर्तव्य आहे. जर विकसित देशांमध्ये कोरोनाचा एवढा परिणाम होतोय तर भारतात होणार नाही? आपल्या देशात १३० कोटी जनता आहे. आपल्यासाठी हे संकट सामान्य नाही. कारण अगदी एक टक्का लोकांना जरी लागण झाली तरी विचार करा, लाखो लोक मरतील. म्हणून कोरोनाबद्दल निश्चिंत राहू नये व ही अतिशयोक्ती समजू नये.
कोरोनाबाबत सत्य –
* १ली स्टेज – बाहेरून लागण होऊन केसेस येतात.
* २री स्टेज – स्थानिक लागण सुरू होते.
* ३री स्टेज – कम्युनिटी लागण
* ४थी स्टेज – संपूर्ण साथ
भारतात आपण १ल्या स्टेजमधून २र्या स्टेजमध्ये आहोत. ३री स्टेज म्हणजे महाभयंकर अशी साथ पसरणे. म्हणून भारत सरकारचा प्रयत्न आहे की दुसर्या स्टेजलाच प्रसार थांबवला पाहिजे. सुट्ट्या जाहीर केल्या याचा अर्थ तुम्ही फक्त आणि फक्त घरात बसणे अपेक्षित आहे. स्वतःची काळजी घेणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.
गर्दी का टाळावी किंवा ३ फूट दूर का रहावे?..
कोरोना व्हायरस प्रामुख्याने खोकताना व शिंकतेवेळी उडणार्या थेंबातून पसरतो. अशा थेंबातून ३ फूटांपर्यंत हा विषाणू पोहोचू शकतो. त्यामुळे ३ फूट दूर राहणे योग्य ठरते. हा विषाणू हवेतून पसरत नाही. तो कडक पृष्ठभागावर स्थिरावतो आणि तिथून मऊ पृष्ठभागाकडे आकर्षित होतो. म्हणजे तो हातावर पडला तर ओठ किंवा नाकाच्या मऊ मांसल भागाकडे आकृष्ट होऊन त्या मार्गाने घशात जातो. घशातून फुफ्फुसात जातो आणि गंभीर स्थितीत फुफ्फुसात पाणी होऊन श्वासाला त्रास होऊ लागतो. हा व्हायरस पोटात जात नाही. हा १४ दिवस जिवंत राहतो. या १४ दिवसात कोणत्याही दिवशी तो घशात गेल्यावर त्याची लक्षणे दिसू लागतात.
सर्दी, खोकला, घसा खवखवणे, अंगदुखी, ताप ही त्याची लक्षणे आहेत. कधी कधी ही लक्षणे व्यक्त होतात. कधी कधी ही लक्षणे अव्यक्त स्वरूपात असूनही कोरोनाची लागण होऊ शकते.
सर्दी- खोकला या लक्षणांवरून कोरोना व्याधी कसा ओळखावा?
सर्दी- खोकला- ताप- अंगदुखीसारखी लक्षणे तर इतर रोगातही असतात. सर्दी- खोकल्याने तर कुणी मरत नाही. प्रत्येक सर्दी-खोकला-ताप ही लक्षणे म्हणजे कोरोनाची लक्षणे नव्हेत. जर परदेशातून कुणी आले असेल आणि त्याला लागण झाल्यावर तुमचा त्याच्याशी स्पर्श व संपर्क झाला असेल तर सर्दी- खोकला- ताप- अंगदुखी, घसा खवखवणे ही कोरोनाची लक्षणे असू शकतात. तसेच श्वास घेणे- सोडणे आखूड होत जाते.
आता सरकारी आदेशाने परदेशातून आलेल्या प्रत्येकाला १४ दिवस वेगळे ठेवले जात आहे त्यामुळे फैलाव रोखला जातो.
मास्क वापरण्याबाबत समज- गैरसमज
सध्या कोरोना व्हायरसच्या भीतिमुळे मोठ्या प्रमाणावर परदेशात मास्क खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली आहे. त्यामुळे तिथे मास्कचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. भारतात ही स्थिती काही वेगळी नाही. बर्याच जणांनी या मास्कचा व्यवसाय केला. त्यामुळे सरकारने अशा प्रकारच्या विक्रीवर प्रतिबंध लावला आहे. मास्कचा विचार करता
– कापडी
– एन ९५
– कोणताच मास्क वापरण्याची गरज नाही
– सर्जिकल मास्क
जे सर्वसाधारण जनतेला अपेक्षित असतात हे नॉन व्होवन फॅब्रिकपासून बनवलेले असतात. हे स्वस्त असून हे ड्रॉपलेट इन्फेक्शनपासून संरक्षण करतात.
हे डिसपोजेबल असतात, म्हणजे एकदा वापरून फेकून देणे अपेक्षित असते. यांचे आयुष्य साधारण ३ ते ८ तास असते. भारतीय जनतेचा विचार केल्यास हे मास्क… जेवताना, खाताना, रात्री झोपताना टेबलावर काढून ठेवलीत, परत उचलून नाका-तोंडावर बांधली म्हणजे न होणारे इन्फेक्शनसुद्धा होण्याचा संभव जास्त आहे.
या मास्कद्वारा ज्यांना सर्दी- खोकला झालेला आहे त्याच्या सर्दी-खोकल्याचे ड्रॉपलेट भोवतालच्या वातावरणात पसरत नाहीत आणि इन्फेक्शन पसरणे रोखले जाते.
सर्जिकल मास्क हा चेहर्यावर दाबून बसलेला नसतो. दोन्ही बाजूतून हे विषाणू तोंडात जातील. त्यामुळे बाहेरील इन्फेक्शन आत जाऊ न देण्यात हा मास्क फार प्रभावी काम करत नाही. म्हणजे श्वसनात बाहेरून आत जाणारे इन्फेक्शन मग ते कोरोना व्हायरस असो वा अन्य कोणतेही व्हायरल इन्फेक्शन असो ते रोखण्यास या मास्कचा फार उपयोग नाही.
१) कापडी मास्कचा तुटवडा भासल्यास आजारी रुग्णांना मोठा सुती रुमाल त्रिकोणी घडी करून नाका-तोंडावर बांधला व रोज तो गरम पाण्यात साबणाने धुतला तरी त्याच्यापासून इतरांना ड्रॉपलेटद्वारे होणारे इन्फेक्शन टाळता येते.
२) एन ९५ मास्क – या मास्कने इनहेल्ड इन्फेक्शन म्हणजे बाहेरून आत जाणारे इन्फेक्शन, सूक्ष्म धूलीकण, घातक गॅसेस रोखले जातात.
हे मास्क डिसपोजेबल आणि रि-युजेबल अशा दोन्ही पद्धतीत मिळतात.
कोरोना व्हायरस व अन्य व्हायरसने बाधित रुग्णांचे उपचार करणार्या डॉक्टर्सनी रुग्णांपासून स्वतःला इन्फेक्शन होऊ नये म्हणून हा मास्क वापरणे अपेक्षित आहे. तसेच व्हायरसने बाधित रुग्णांची सेवा करणार्यांनीही बचावासाठी हा मास्क वापरणे अपेक्षित आहे.
३) कोणताच मास्क नाही-
ज्यांना सध्या कोणताही त्रास नाही (सर्दी-खोकला-ताप इत्यादी) त्यांनी भीतिपोटी कोणताही मास्क वापरण्याची गरज नाही. खोकणार्याने आणि एखाद्याला खोकला येतो हे दिसले तर रुमाल नाक आणि तोंड यावर पसरून दाबून धरावा म्हणजे काही होणार नाही. नंतर हा रुमाल व आपले हात साबणाने स्वच्छ धुतले की व्हायरस मरतो. मास्कपेक्षा रुमालच उत्तम. सर्वसाधारण जनतेने मास्क मिळविण्याच्या मागे पडू नये.
तरीही सर्दी-खोकला झाल्यास सरळ पाच दिवस सुट्टी काढून घरी थांबावे म्हणजे दुसर्याला त्रास होत नाही. सर्वसाधारण सर्दी-खोकला पाच दिवसात बरा होतो. सर्वांच्या आरोग्यासाठी पुढचे काही दिवस म्हणजे १५ दिवस तरी सर्वांनीच हे पाळले पाहिजे.
मास्कपेक्षाही महत्त्वाचे आहे केवळ गर्दीच्या ठिकाणी न जाणे, हस्तांदोलन टाळणे, मेटल रेलिंग, दरवाज्यांच्या कड्या व इतर सार्वजनिक वस्तूंना हात लावल्यास साबणाने हात स्वच्छ धुणे. घशात खवखव वाटल्यास त्वरित कोमट पाण्यात मीठ व हळद पूड टाकून गुळण्या करणे.. इत्यादी उपाय करावेत.
साबणाने हात धुणे सर्वांत उत्तम. साबणात लिपिड असते. या लिपिडने व्हायरसचे आवरण फुटते आणि २० सेकंदात व्हायरस मरतो. यामुळे सतत साबणाने हात धुतले तर ते सर्वांत चांगले आहे. यासाठी कोणताही साबण चालतो. दिवसभर सॅनिटायझरची अजिबात गरज नाही. सॅनिटायझरमध्ये ६० टक्केपेक्षा अधिक अल्कोहोल असलेलाच सॅनिटायझर उपयोगाचा असतो. नाही तर त्याने व्हायरस मरत नाही. त्यामुळे साबण वापरणे अधिक चांगले, असे डॉ. तात्याराव लहाने यांचे मत आहे. ते ‘कोरोना’बाबत गठीत शासकीय समितीचे महत्त्वाचे सदस्य आहेत.
अल्कोहोलने कोरोना विषाणू मरतात का?
काही रुग्ण किंवा लोकांमधील ही पराकोटीची गैरसमजूत आहे की जर सॅनिटायझरमधील अल्कोहोलने जर कोरोना विषाणू मरत असतील तर अल्कोहोल पिण्याने तर कोरोना विषाणूंची बाधाच होणार नाही. व्यसनी लोकांना कारणच पाहिजे असते. दारू ही पोटात जाते आणि कोरोना फुफ्फुसात होतो. त्यामुळे दारूने व्हायरस नष्ट होत नाही. उलट दारू पिऊन- पिऊन लिव्हर खराब करून घ्याल!
चिकन- मासे सेवनाने व्हायरस पसरतो का?…
चिकन- मासे- अंडी खाण्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे चिकन, मासे, अंडी यांचा खप कमी झाला. दर कमी झाला त्यामुळे विक्रेत्यांचे भरपूर नुकसान झाले आहे. खरं तर हा विषाणू कोंबडी- मासे यांच्यामार्फत पसरलेला नाही. चीनमधील लोक वटवाघुळाचे सूप किंवा साप खातात. तसेच कच्चे, अर्ध शिजलेले मांस-मासे खाण्याने विषाणूंची बाधा झाली व ह्या विषाणूंचा प्रसार सर्व देशात होऊ लागला. चिकन, मासे, अंडी कच्ची खाल्ली तर धोका असू शकतो. पण आपण उकडून, शिजवून, तळून, भाजून चिकन, अंडी, मासे खातो. म्हणजे १०० अंश उष्णतेत ते भाजतो, तळतो. कोरोनाचा व्हायरस ५५ अंशांपेक्षा जास्त तापमानात नष्ट होतो. त्यामुळे तो शिजवलेल्या, तळलेल्या अन्नात राहूच शकत नाही. त्यामुळे चिकन, अंडी, मासे खायला हरकत नाही. पण हे सर्व पचायला जड असल्याने व उष्ण असल्याने हलके अन्न सेवन केलेलेच उत्तम.
गोमूत्र- शेणाने व्हायरस मरतो का?…
गोमूत्र शिंपडणे, गोवर्या जाळणे, धूपन करणे, धूपनासाठी गायीच्या शेणाच्या गोवर्या, गाईचे तूप, निम्ब, वेखंड, लसणीची सालं, धूप, गुग्गुळ घालून धूपन करणे याने नक्कीच कोरोना व्हायरस मरणार नाही. पण घरातील व घराबाहेरील वातावरण शुद्धतेसाठी याचा नक्की फायदा होतो. आयुर्वेद शास्त्रात जनोपध्वंस व्याधींमध्ये उपाय म्हणून धूपन सांगितले आहे.
कोरोना व्हायरस व व्याधीक्षमत्व –
कुठलाही व्हायरस म्हणा किंवा आजाराची लागण ज्याची व्याधीप्रतिकार शक्ती कमी असेल त्याला लगेच होते. आज आम्हा भारतीयांची जीवनशैली बरीच बदललेली आहे. फास्ट फूड, जंक फूड, रेडी टू इट, रेडी टू यूज, बेकरी उत्पादने इत्यादींमुळे पोषणमूल्यांचा र्हास होतो व निःसत्त्व आहाराचे सेवन होत आहे. ताण-तणाव बालांपासून ते वृद्धांपर्यंत वाढलेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून व्याधीक्षमता कमी कमी होत आहे. म्हणूनच यापुढे कोरोनाच काय तर कुठल्याही आजाराची, कुठल्याही व्हायरसची लागण होऊ नये म्हणून आयुर्वेद शास्त्राप्रमाणे दिनचर्या, ऋतुचर्या व स्वस्थवृत्ताचे नक्कीच आचरण करण्याचा प्रयत्न करुया.