– दत्ता भि. नाईक
कोरोनाची हद्दपारी करण्यासाठी सध्यातरी एकच उपाय समोर दिसतो, तो म्हणजे, या विषाणूवर लस शोधून काढणे. देवी, कांजण्या, गोवर व आता पोलिओ यांची जशी हद्दपारी केली तशीच कोरोनाची हद्दपारी करण्यासाठी लस शोधून काढणे हाच एकमेव उपाय सध्यातरी दिसतो.
संपूर्ण जगाची ससेहोलपट घडवून आणणारे कोरोना व्हायरसचे महासंकट जवळच्या भविष्यकाळात आटोक्यात येईल असे वाटत नाही. भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचे आवाहन केले व जनतेने ते पाळले. त्यामुळे देशाच्या लोकसंख्येच्या मानाने कोरोनाग्रस्तांची व त्यामुळे मृत होणार्यांची संख्या खूपच कमी आहे. या विषाणूवर उपाय नसला तरी तब्येतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोगी पडणारे ‘ऑक्सिहायड्रोक्लोरोक्वीन’ हे भारतात मूबलक प्रमाणात उत्पादित केले गेल्यामुळे आपल्याच नव्हे तर जागतिक पातळीवर त्याचा उपयोग करता आला. ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जेर बात्सोनावो यांनी तर मोदींची लक्ष्मणाला मूर्च्छित अवस्थेतून ठीक करण्यासाठी संजीवनी घेऊन येणार्या हनुमानाशी तुलना करून कृतज्ञतेचे शिखर गाठले. अनेक छोटे-मोठे देश आपल्या देशाचे मानवतेच्या इतिहासातील स्थान मान्य करू लागलेले आपल्याला दिसून येते.
स्थलांतरितांची खटपट
इंग्रजांच्या राजवटीत जमीनदारी पद्धत सुरू झाल्यामुळे छोटे व मध्यम शेतकरी व शेतमजूर आपापली खेडी सोडून शहराकडे धाव घेऊ लागले. त्यांना शहरामध्ये वास्तव्य करण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे झोपडपट्ट्या वाढल्या. स्वातंत्र्यानंतर जमीन सुधारणा कायदे अमलात आले, त्यामुळे शहरांमध्ये स्थलांतरित होणार्यांचा लोंढा थांबेल असे वाटले होते. १९०९-१० मध्ये महात्मा गांधींनी ‘हिन्द स्वराज्य’ नावाचा एक प्रबंध तयार केला होता. त्यानुसार गावाच्या पंचक्रोशीत सुयोग्य व पर्यावरणप्रिय उद्योग उभे करावे, ज्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष होणार नाही अशी कल्पना मांडली होती. व्यक्ती कितीही मोठी असली तरी त्यांनी प्रस्तुत केलेल्या सर्वच्या सर्व त्रिकालाबाधित असतात असे कधीही होत नाही हे खरे असले तरी गांधीजींचे पट्टशिष्य म्हणवून घेणार्या पंडित नेहरूंनी ‘हिन्द स्वराज्य’ या संकल्पनेची टर उडवली व गांधीजींना तरी त्यातले सर्वकाही समजले असेल का? अशी पृच्छाही केली. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने स्वीकारलेली समाजवादी समाजरचनाही अशीच होती. देशासमोरचे कोणतेच प्रश्न सुटले नाहीत. परदेशातून धान्य आयात करण्याची परिस्थिती आपल्या शेतीप्रधान देशावर ओढवली.
समाजवादी समाजरचना म्हणजे काय हे पंडितजींना नेमके समजले होते की काय अशी पृच्छा अर्थतज्ज्ञांकडून केली जाऊ लागली.
कोरोनावर उपाय म्हणून लॉकडाऊन सुरू झाले तेव्हा हे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले. पोट भरण्यासाठी गावात काम मिळत नाही म्हणून शहरात येऊन स्थायिक झालेल्या रोजंदारीवर काम करणार्या मजुरांवर सर्व कामधंदे बंद पडल्यामुळे उपासमारीची वेळ येऊन ठेपली. रोज काही ना काही काम मिळते, त्यामुळे पोटापाण्याची व्यवस्था होते. राहण्यासाठी तुटपुंजी जागा असली तरी चालेल, यात समाधान मानून घेणार्या, कधीही कोणासमोर फुकटच्या मदतीसाठी ज्यांनी हात पसरले नाहीत त्यांना निरनिराळ्या समाजसेवी संघटनांकडून वाटल्या जाणार्या शिध्यावर दिवस कंठावे लागले. त्यामुळे आपापल्या गावी परत जावे व आपल्या ज्ञातिबांधवांमध्ये मिसळून मिळेल ते वाटून खावे ही कल्पना रुजू लागली व देशभरातील स्थलांतरित मजूर परत जाण्यासाठी खटपट करू लागले.
सेवा देणारी माणसे
लॉक डाऊनची सुरुवात झाली तेव्हा वर्तमानपत्रे व प्रसारमाध्यमे यांच्यासमोर मध्यमवर्गीय जनता होती. मध्यमवर्गीयांची बरीचशी कामे आजच्या युगात संगणकावर घरी बसून करता येतात. त्यामुळे स्वयंपाकात मदत करणारे नवरे, त्याचप्रमाणे धकाधकीच्या जीवनामुळे एकमेकांशी बोलण्यासाठी वेळ व सवड नव्हती, परंतु सध्या सर्व कुटुंबीय कसे एकमेकांशी सुख-दुःखाच्या गोष्टी करतात यांसारख्या विषयावर व्यंगचित्रे, व्हॉट्सऍप संदेश यांची चलती झाली. परंतु या सर्व गोष्टींपासून दूर असलेला श्रमिक वर्ग फारच अवघड परिस्थितीमध्ये अडकलेला आहे याचे भान या वर्गाला नव्हते. देशात असंतोष पसरवून, परिस्थितीचा लाभ उठवून अशा ज्वलनशील समाजाला पेटवून त्यांच्याकडून समाजद्रोही उठाव घडवून आणायचा व देशाची राजवट उलथवून टाकायची असा प्रयत्न करणारे काही कमी नाहीत. त्यातही स्थलांतरित मजूर मिळेल त्या वाहनाने गावी जायला उत्सुक आहेत. काहीजण मुलाबाळांना व कुटुंबीयांना घेऊन जमेल तेवढे सामान उचलून चालत निघाले असल्याची दृश्ये व वृत्ते प्रसारमाध्यमातून दाखवली जाऊ लागल्यामुळे सगळीकडे अस्वस्थता पसरली. औरंगाबाद येथे काही कामगार अंगावरून रेलगाडी गेल्यामुळे मरण पावल्याचे हृदयद्रावक दृश्य बघितल्याने सर्वत्र खळबळ माजली. जी कामे मध्यमवर्गीय करू शकत नाही त्या सर्व सेवा दाराशी येऊन देणारी ही माणसे. आपल्या सुखात व विकासात त्यांचा वाटा आहे तर मग त्यांचे दुःखही आपले दुःख का असू नये? यापेक्षाही विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे आपण अशाच एखाद्या कुटुंबात जन्माला आलो असतो तर? यासारखा विचार सर्वजणांनी केला पाहिजे अशीच परिस्थिती अवतीर्ण झालेली आहे.
सरकारच्या वतीनेही गावोगावी परत जाणार्या मजुरांची वाहतूक व्यवस्था केली जाऊ लागलेली आहे. याप्रकारे जमणारे मजूर बेशिस्त व बेताल झाले तर असंतोषाची आग सर्वत्र पसरण्याची शक्यता आहे याची जाग सरकारी यंत्रणांना वेळेवर आली ही एक चांगली गोष्ट आहे.
स्वदेशी वस्तूंवर भर हवा!
पंतप्रधान मोदी यांनी बदलत्या परिस्थितीची दिशा ओळखून अर्थव्यवस्थेला उभारी देण्याकरिता वीस लाख करोड रुपयांचे पॅकेज घोषित केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी ही योजना क्रमाक्रमाने विस्तृतपणे मांडली आहे. कोणत्याही आर्थिक धोरणाचे जसे स्वागत होत असते तसेच त्याच्या त्रुटी दाखविण्याचे कामही विरोधकांनी करायचे असते. सध्या अभ्यासपूर्ण विरोध करणार्यांची देशात वानवाच आहे हीसुद्धा एक मोठी समस्या आहे. भारतीय उद्योग महासंघाचे महासंचालक चन्द्रजित बॅनर्जी यांनी या पॅकेजचे स्वागत करताना म्हटले आहे की, या उपायांमुळे आत्मनिर्भर भारताचा पाया रोवला जाणार आहे. स्थानिक उत्पादन वाढवणे, आयात कमी करणे व रोजगार वाढवणे या तीन गोष्टी यामुळे साधल्या जाणार आहेत असेही ते या धोरणाचे स्वागत करताना म्हणाले.
बिजिंग ऑलिंपिकची तयारी चालली होती तेव्हा भारतातून बरेच खनिज चीनमध्ये पाठवले जात होते. तेव्हा चीनमधून आयात होणार्या मालाची संख्या कमी होती. हळूहळू ते प्रमाण बदलून आयात निर्यातीपेक्षा वाढलेली आहे. त्यावर पायबंद घालायचा असेल तर स्वदेशी वस्तूंच्या निर्मितीवर भर दिला पाहिजे हे आता सर्वजणांना पटू लागले आहे. चिनी अर्थव्यवस्था संपूर्ण जगाला गिळू पाहते हे आता स्पष्ट झाले आहे. ज्या चीनमधून कोरोनाचा विषाणू जगभर पसरला तो देश कोरोनामुक्त झाला यावर कोणीही विश्वास ठेवण्यास तयार नाही. चीनमधील संरक्षणविषयक विद्यापीठातून हा विषाणू पसरवला गेला अशी बातमी चीनमधूनच बाहेर फुटली आहे. चीनमध्ये आठ कोटी नागरिक मरण पावल्याचे एका महिलेने वृत्त दिले आहे.
अमेरिकेने वैश्विकीकरणाच्या नादात जो गाफीलपणा दाखवला त्याचा परिणाम देश भोगत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता उशिरा का होईना, पण उपाय शोधू पाहात आहेत. परंतु त्यांच्या व्यवहारात कृती कमी आणि आक्रस्ताळेपणा जास्त असल्याचे आढळून येत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमेरिका, ब्रिटन व युरोपीय राष्ट्रांमध्ये कोरोनाचा जोरात फैलाव झालेला असताना या देशांत जनतेवर लादलेल्या बंधनांचा निषेध केला जात आहे. अतिशय सुजाण व शिस्तबद्ध म्हणून गणलेल्या देशाच्या तुलनेत आपल्या देशात तुटपुंजी सामग्री व अत्यल्प माहिती या कारणामुळे अस्वस्थ बनलेला श्रमिक समाज खूपच सहनशील आहे असे म्हणावे लागेल. याउलट दारूची दुकाने खुलताच त्यासमोर मध्यमवर्गीयांच्या रांगा बघून रामराज्य येण्यापूर्वी तळीरामराज्य सत्वर येईल असे वाटू लागले आहे.
युधिष्ठिराचे उत्तर
निरनिराळ्या ठिकाणी असलेले श्रमिक ज्यांच्या कष्टावर समाज चालत असूनही त्यांची परप्रांतीय म्हणून हेटाळणी केली जात असते. ते सर्वजण आपापल्या मूळ गावी परतल्यावर सध्या पेटलेली आग तात्पुरती शांत होईल, परंतु समस्या सुटणार नाही. सरकारने दिलेल्या पॅकेजचा परिणाम दिसून यायलासुद्धा कालावधी लागणार आहे. संपूर्ण विकासाचे केंद्र गाव हे न ठेवता शहर हेच ठेवल्यामुळे अनेक समस्या उभ्या राहिलेल्या आहेत. सुमारे दोनशे वर्षांपूर्वी नयनरम्य बेटावर वसवलेले मुंबई नावाचे शहर भकास व बकाल बनले आहे. त्याच्या जोडीला उपनगरांची संख्या वाढत जाऊन अख्खा ठाणे जिल्हा मुंबईसदृश्य बनलेला आहे आणि ते कमी पडले म्हणून नवी मुंबई नावाचे नवीन शहर वसवण्यात आलेले आहे. विकासाच्या या नव्या संकल्पनेमुळे जितक्या उंच इमारती उभ्या राहतात तितकाच झोपडपट्ट्यांचा विस्तार होतो. याच कारणामुळे आजच्या मितीस मुंबईत सर्वात जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण आढळतात हे लक्षात येते. तथाकथित विकासाचे हे चक्र उलटे फिरवता येईल की नाही हे सांगता येत नाही. परंतु नवीन समस्या उभ्या राहू नयेत म्हणून सखोल चिंतनाची आवश्यकता आहे. गोवा राज्य कोरोनामुक्त झाले आहे, असे सांगत आपण मिरवत असतानाच बाहेरून आलेल्यांमुळे का होईना सध्या रुग्मांची संख्या पन्नाशी पार करू पाहात आहे.
महाभारतात वनपर्वात पांडव पाणी पिण्यासाठी गेले असता जलाशयाचा मालक यक्ष युधिष्ठिराला चार प्रश्न विचारतो. हेच प्रश्न यक्षप्रश्न म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यातील इथे लागू पडणारा म्हणजे जगात सुखी कोण आहे? व या प्रश्नाचे उत्तर देताना युधिष्ठिर म्हणतो, हे यक्ष, ज्याच्यावर कोणतेही कर्ज नाही, जो परदेशात वास्तव्याला नाही, आठवड्यातील पाचव्या वा सहाव्या दिवशी तरी जो आपल्या घरात शाकभाजी शिजवून खातो तो खरा सुखी आहे (महा. वनपर्व- . ३१३- श्लोक- ५). कोरोनाबाधित जगताला युधिष्ठिराने यक्षाला दिलेल्या या उत्तरावर विचार करण्याची वेळ आलेली आहे. कोरोनाची हद्दपारी करण्यासाठी सध्यातरी एकच उपाय समोर दिसतो, तो म्हणजे, या विषाणूवर लस शोधून काढणे. देवी, कांजण्या, गोवर व आता पोलिओ यांची जशी हद्दपारी केली तशीच कोरोनाची हद्दपारी करण्यासाठी लस शोधून काढणे हाच एकमेव उपाय सध्यातरी दिसतो.