कोरोना लस पूर्वचाचणी

0
308
  • मंजुषा पराग केळकर

माझे नातेवाईक, मित्रमैत्रिणी ह्यांनी खूप कौतुक केले व खूप शाबासकी दिली, धीर दिला. वेळोवेळी फोनवरुन संपर्कात राहून बळ दिले व त्यामुळे मात्र आपण एका खूप छान, स्तुत्य कामाचा हिस्सा झालोय ह्याचे समाधान वाटले.

मानवाच्या हव्यासापोटी आज जगावर मानवी विनाशाची वेळ येऊन ठेपली आहे. विनाशकारी हव्यासापोटी प्रयोगशाळेत विषारी कणांची निर्मिती करून त्याचा शिरकाव मानवी शरीरात झाला आणि मोठ्या मानवी विनाश सत्राला मानवामुळेच आरंभ झाला. जो पुढे अनियंत्रित झाला. हे विषरूप अणूसारखे कण मानवाला अल्प काळात नष्ट करण्यासाठी पुरेसे आहेत. 
नावही अगदी साजेसेच बघा ह्याचे. ये करो ना, वो करो ना, आवो ना, जावो ना, म्हणत म्हणत सगळ्यांना त्याने बंदिवान केले. चोर दरोडेखोरांना तुरुंगात घालून तिथून कोठेही जाण्यास बंदी असायची म्हणून त्याला तुरुंगवास म्हणायचे. पण आता ह्या कोरोनाने सार्‍या जगाचेच तुरुंगात रूपांतर केले आहे जणू हळूहळू ह्याने आपले रंग ढंग दाखवायला सुरुवात केली तसतसे ह्याला पकडण्यासाठी धावपळ सुरू झाली. त्यात मग आंतरराष्ट्रीय राजकारण, देशांतर्गत राजकारण, वैचारिक भेदाभेद, जागतिक आर्थिक उलाढाली आणि सर्वसामान्य माणूस ह्या सगळ्यांनाच त्याने आपल्या फेर्‍यात घेतले. 

त्यात मग मोलमजुरी करणारे, हातावर पोट असणारे, नाकासमोर चालून आपली उपजीविका करणारे, भट भिक्षुक, छोटे व्यावसायिक, विद्यार्थी वर्ग ह्यात होरपळून निघाले. नेमके काय केले? म्हणजे हे नष्टचर्य संपेल ह्याचा विचार करत प्रत्येक जण आजचा दिवस ढकलतोय. पण तरीसुद्धा जर नीट विचार केला तर असे दिसते की जेवढी ही वास्तविकता भयानक आहे तेवढी झळ आपल्याला बसते आहे का? तर प्रामाणिक पणे त्याचे उत्तर नाही असे द्यावयास हवे. का? तर मला असे वाटते की राजकीय ताकद जर प्रामाणिक असेल, धीरोदात्त असेल, सहिष्णू असेल तर नक्कीच ह्या अशा भयानक घटनांमुळे होणारे भयानक परिणाम, त्याची विदारकता आपल्यापर्यन्त खूप कमी प्रमाणात पोहचते आहे.  ह्या सगळ्या विपरीत परीस्थितीचे सर्वसमावेषक अभियानात रूपांतर करून घेण्याची तयारी ह्या सरकारमधे असल्याने आपण सर्वच ह्या आगळ्या वेगळ्या अभियानाचे एक घटक झालो. भारत देश परत विश्वगुरु होण्यासाठी तयार आहे हे लक्षात आले. आपण प्रत्येक जण ह्या समाजाचा एक घटक आहोत आणि आपले सामाजिक कर्तव्य म्हणून मी काहीतरी केले पाहिजे हा विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचला. त्यातूनच आपल्यातलेच बंधुभगिनी देवदूतासारखे पुढे सरसावले. कुणी धान्य वाटप केले, कोणी अन्न वाटप केले, कोणी धान्य संकलन केले, काढा वाटप केले, औषध वाटप केले, मास्क वाटप केले, कुणी विस्कटलेल्या कुटुंबातील लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्ति ह्यांचा सांभाळ केला. कुणी चार्‍याचा प्रश्न सोडवला, कुणी ह्या सर्वांसाठी लागणार्‍या निधि संकलनाचे काम केले, कुणी रक्तदान, प्लाझमा-दान ह्यासाठी आवाहन केले तर कुणी समाजप्रबोधनाचे काम केले.
किती तर्‍हेची म्हणून कामे सांगावीत? हे सगळे वैयक्तिक पातळीवर, समाजसेवी संस्थांमार्फत, गणपती मंडळाच्या मार्फत तर काही ठिकाणी तरुणतरुणी नवनवीन गट स्थापन करून ह्यातील आपला वाटा उचलण्यासाठी आपणहून पुढे येत गेले. एकूणच हे चित्र पुढील सुदृढ भारताच्या प्रगतीसाठी तयार झालेले सामाजिक भान ठेवून कार्य करण्यासाठी सुरू झालेले सामाजिक ऊत्थापन आहे.  

ह्या सर्वात मोठा वाटा आपले पोलिस दल, सफाई कर्मचारी, रुग्णालयातील कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, साहित्य व औषध निर्माण संस्था, कारखाने, छोटे दुकानदार, बँक कर्मचारी व इतर असे बरेच व्यवसायिक ह्यांचा आहे. ह्या सर्वांचे अथक प्रयत्न, दिवसरात्र सतत काम करणे ह्यासाठी आपण ह्या सर्वांचे सदैव ऋणी असणार आहोत. प्रत्येक गोष्टीला जशी सुरवात असते तसाच त्याचा अंतही ठरलेला असतो. आता ह्या कोरोना नामक भस्मासुराला मारण्यासाठी समस्त शास्त्र जगत आपल्या ज्ञानाची/प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.  कोणतेही औषध, लस सर्वांपर्यंत पोहचण्याआधी त्यावर निरंतर, दीर्घकाळ चाचण्या घ्यायच्या असतात व ते कसोटीला उतरले की मगच त्या आजारावरील उपाय म्हणून ते वापरण्यायोग्य होते. कोरोना लसीच्या पूर्वचाचणीपर्यन्त आता संशोधन सस्थांचे प्रयत्न निष्कर्षापर्यन्त आले आहेत.  

मी कल्याण आश्रम, गोवा इथे पूर्ण वेळ कार्यकर्ती म्हणून काम करते आहे.  या वेळेस लॉकडाउन असल्याने संपर्काचे काम बंद आहे तेव्हा आपण काय करू शकतो ह्याचा विचार करत होते आणि एक संधी चालून आली. आपल्या देशातील बर्‍याच संस्था संशोधन करत आहेत. त्यातील एक- भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड, हैदराबाद. ह्या संस्थेच्या कोरोना लसीच्या पूर्वचाचणीसाठी माझी निवड होवून ह्या मोठ्या संघर्षाचा मी छोटासा हिस्सा होवू शकले ह्याबद्दलचे माझे हे अनुभव कथन.  

गोव्यातील रेडकर हॉस्पिटलमधे कोरोना लसीच्या पूर्वचाचणीसाठी स्वयंसेवक हवे आहेत असा निरोप एका समुहावर वाचण्यात आला आणि तत्क्षणी मी तयार आहे असे मी मोठ्यांदा म्हंटले आणि परत तो निरोप वाचला.  त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व निकषात मी बसत होते. तेव्हा पुढची तयारी. नवरा, मुलगाही ह्याच कामात असल्याने त्यांनी तुझी मानसिक तयारी असेल तर जरूर भाग घे असे सांगून प्रोत्साहनच दिले. आता अजून बळ आले होते. पण आता पुढील टप्पा जास्त महत्वपूर्ण होता, नुसती मानसिक तयारी काय कामाची? शारीरिकदृष्ट्या सुद्धा मी कसोटीला उतरायला हवी होते. त्यांनी दिलेल्या क्रमांकावर फोन करून मी चाचणीसाठी तयार असल्याचे कळवले. त्यांनी उद्या ११ वाजेपर्यंत हॉस्पिटलमध्ये या असे संगितले. हो तर म्हंटले पण हॉस्पिटल मी रहाते तेथून ४०, ४५ किमी. लांब आहे आणि तेथे पोहोचायला ३ बसेस बदलून जाणे आणि कोविडमुळे बसेस मिळून तिथे वेळेत पोहोचणे अवघड होते. पण म्हणतात ना, प्रामाणिक इच्छा असली की पुढचा मार्ग दाखवायला देव आपल्याला मदत करतो. तसेच झाले. संघाच्या सेवा प्रमुखांनी मला एका कार्यकर्तीचा नंबर दिला. ती पण चाचणीला जायला तयार होती. मी तिच्याशी बोलले आणि नवीन मैत्रीण ताबडतोब तयार झाली. अर्ध्या रस्त्यावर तिचे घर आहे. तिथपर्यन्त एक बस आणि पुढे तिची मोठी गाडी अशी व्यवस्था झाली.  आम्ही दिलेल्या वेळेवर पोहोचलो. मला इन्जेक्शनची प्रचंड भीती वाटते. पण उत्साहाच्या भरात हीही बाब गौण वाटायला लागली.  रिवाजाप्रमाणे  टेम्प्रेचर गन, ऑक्सीमीटर  लावून तपासणी झाली. पुढे फॉर्म भरून घेतला. पुढील साधारण वर्षभराची प्रक्रिया कशी असणार आहे, ह्यातील धोके काय असू शकतात हे समजावून सांगीतले. आता पहिली पायरी म्हणजे रक्त तपासणी.  (प्रत्येक वेळी रक्त तपासणी होईल हे आमच्या फॉर्ममध्येच लिहिलेले आहे.)  त्यात बर्‍याच चाचण्या आहेत. महत्वाची कोरोनासाठी स्वॅब चाचणी करण्यात आली. आता हे रिपोर्टस् समाधानकारक असतील तर तुम्हाला ३ दिवसांनी परत बोलावू असे सांगितले. त्याप्रमाणे २ दिवसानी तुम्ही सक्षम आहात आणि उद्या सकाळी ११वा.पर्यन्त या असे सांगण्यात आले.  
आता महत्वाचा टप्पा सुरू होणार होता लसीकरण. त्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी मला पहिला डोस दिला गेला. सर्व परत नीट समजावून सांगितले. महत्वाचे म्हणजे आता तुम्ही कोरोनामुक्त झाला असे समजून सगळीकडे फिरू नका असेही सांगितले. काहीही त्रास झाला तरी ताबडतोब फोन करा असे सांगितले. परत त्यांच्याकडून पण चौकशीसाठी मधे फोन आला होता. पण मला देवकृपेने काहीही त्रास झाला नाही.  

२८ दिवसांनी ठरल्याप्रमाणे त्यांनी परत बोलवले. दूसरा डोस दिला गेला आणि लसीकरण पूर्ण झाले. लसीकरणानंतर शरीरांतर्गत बदलाचे निरीक्षण- ह्यासाठी आता त्यांच्या चार्टप्रमाणे साधारण वर्षभर ते बोलवतील. तेव्हा रक्त, कोविड इत्यादि चाचण्या होतील. ह्यावेळी त्यांनी एक नोंदणी पुस्तक दिले आहे.   कुठलाही बदल जाणवला तर फोन कराच पण त्याची नोंद पण करून ठेवा असे सांगितले.
अश्या प्रकारे कोविडपूर्व चाचणी अभियान संपूर्ण देशभरात चालू आहे.  स्वखुशीने, विना मोबदला ह्या अभियानात ज्यांची तयारी असेल अश्यांनी यावे ह्यासाठी संघामार्फत व्हाट्सऍप समुहातून संदेश आपण देतो आहोत. ह्याला नेहमीप्रमाणे संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. लोकांच्या मनात भय असणे हे आपण समजू शकतो कारण जी लस सिद्ध झालेली नाही त्याचा आपल्यावर प्रयोग होणार ज्यात वावगे काही घडणारच नाही ह्याची खात्री नसणे ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. पण वाईट तेव्हा वाटले की काही लोकांना असे वाटते की असे धोकादायक काम मी करतेय म्हणजे काहीतरी पैसा त्यातून मला मिळत असावा. त्यांच्या मते त्याशिवाय का कोणी आपला जीव धोक्यात घालणार आहे? हे मी येवढ्यासाठी येथे नमूद करते आहे कारण सर्व कार्यकर्ते स्वखुशीने तनमनधनपूर्वक कोणत्याही मोबदल्याशिवाय ह्या अभियानाचा हिस्सा झालेत. संशोधक खूप मेहनतीने ह्यावर संशोधन करत आहेत. पण त्यांचा प्रयोग यशस्वी होण्यासाठी फक्त आपल्यासारख्यांची थोडी मदत लागणार आहे आणि शेवटी ह्या सफलतापूर्वक तयार झालेल्या लसीचा फायदा सर्व जगालाच होणार आहे.  

आता हा जसा थोडासा वाईट अनुभव आला तसा चांगल्या प्रतिक्रियाही खूप आल्या. माझे नातेवाईक, मित्रमैत्रिणी ह्यांनी खूप कौतुक केले व खूप शाबासकी दिली, धीर दिला. वेळोवेळी फोनवरुन संपर्कात राहून बळ दिले व त्यामुळे मात्र आपण एका खूप छान, स्तुत्य कामाचा हिस्सा झालोय ह्याचे समाधान वाटले.   
*आणखी एक अनुभव - डरावना होता बरं का! एकीने मला थेटच विचारले - कशाला गं या भानगडीत पडलीस? तू नीट माहिती का नाही घेतली आधी?  अशाच एका पूर्वचाचणीत एक जण गेला म्हणे....
असो, तर अशा ह्या कोविडने आपणा सर्वांचेच धाबे दणाणले आहे. त्याचे समूळ उच्चाटन व्हावे ह्यासाठी लवकरात लवकर ही लस सफल होवू दे अशी त्या भगवंताकडे प्रार्थना करूयात.