फायझर या अमेरिकेतील कोरोनावरील लस उत्पादक कंपनीपाठोपाठ सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानेही कोरोनावरील लशीच्या प्रत्यक्ष उत्पादनासाठी आपत्कालीन परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. सिरम इन्स्टिट्यूटने ‘कोविशिल्ड’ या लशीच्या उत्पादनासाठी ऍस्ट्राझेनेका या ब्रिटिश औषध उत्पादक कंपनीशी करार केला आहे. ऍस्ट्राझेनेका ही ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधन विभागासमवेत कोरोनावरील लस विकसित करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूटने या लशीच्या चार वैद्यकीय चाचण्यांच्या अंतरिम निष्कर्षांचा तपशील भारत सरकारच्या औषध नियंत्रकांना सादर केला आहे.
भारतामध्ये फायझरला ब्रिटन आणि बहरीननंतर भारतानेही लस उत्पादनास मंजुरी दिलेली आहे. त्यापाठोपाठ सिरम इन्स्टिट्यूटलाही ही परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
कोविशिल्ड ही लस सुरक्षित असून त्याद्वारे कोरोनाचा फैलाव रोखता येऊ शकतो असा दावा कंपनीने केला आहे. कोविशिल्डला भारतीय वैद्यकीय अनुसंधान आयोगाचे (आयसीएमआर) चे सहप्रायोजकत्व आहे. त्याच्या तिसर्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्या देशाच्या विविध भागांत सध्या सुरू आहेत. ऑक्सफर्ड – ऍस्ट्राझेनेकाच्या वतीने या लशीच्या चाचण्या ब्रिटन आणि ब्राझीलमध्येही सुरू आहेत. भारतातील एका, ब्रिटनमधील दोन व ब्राझीलमधील एका चाचणीचे वैद्यकीय निष्कर्ष सिरम इन्स्टिट्यूटने भारतीय औषध नियंत्रकांकडे सुपूर्द केले आहेत. ब्रिटन व ब्राझीलमधील वैद्यकीय चाचणीत सरासरी सत्तर टक्के परिणाम दिसून आल्याचे ऍस्ट्राझेनेकाने गेल्या महिन्यात जाहीर केले होते. ही लस २ अंश सेल्सियस ते ८ अंश सेल्सियस तापमानात साठवता येते. फायझरने बनवलेली लस साठवण्यासाठी मात्र वजा ७० अंश तापमानाची गरज भासते. भारतासारख्या देशात एवढ्या कमी तापमानात त्या लशीची साठवणूक व हस्तांतरण शक्य नसल्याचे मत अनेक तज्ज्ञांनी वर्तवलेले आहे. फायझरच्या लशीच्या भारतात वैद्यकीय चाचण्याही झालेल्या नाहीत. फायझरने भारतात विक्रीसाठी आपल्या लशीची आयात करण्यासाठी परवानगी मागितलेली आहे, तर सिरम इन्स्टिट्यूटने आपल्या लशीच्या उत्पादनासाठी परवानगी मागितलेली आहे.
भारत सरकारच्या औषध नियंत्रकांनी फायझरचा अर्ज केंद्रीय औषध प्रमाणिकरण नियमन संस्थेच्या तज्ज्ञ समितीकडे सुपूर्द केला आहे.
कोरोना लस साठवण्यासाठी
विमानतळांवर खास व्यवस्था
देशात कोरोना लशीच्या साठवणुकीसाठी केंद्र सरकारने जोरदार प्रयत्न चालवले असून नागरी विमानवाहतूक मंत्रालयासमवेत यासंदर्भात अनेक बैठका पार पडल्या आहेत. या लशीचे वाटप हवाईमार्गे करण्याचा व त्यासाठी देशातील विमानतळांवर लशीच्या साठवणुकीसाठी खास व्यवस्था करण्याचा सरकारचा विचार आहे. स्वतः पंतप्रधानांनी गेल्या शुक्रवारी यासंदर्भात एक बैठक आयोजित केली होती. देशभरात या लशीचे वाटप करण्यासाठी पुरेशी विमाने उपलब्ध होतील यासाठीही सरकार विमान कंपन्यांशी बोलणी करीत आहे. देशातील अब्जावधी लोकांपर्यंत ही लस पोहोचवणे हे मोठे आव्हान असणार आहे.