कोरोना योद्ध्यांना सहकार्य करूया योगसाधना – ४८५ अंतरंग योग – ७०

0
292
  • डॉ. सीताकांत घाणेकर

आपण योगसाधक हाच धडा घेऊया की आपण सर्व अष्टशक्तींचे ज्ञान मिळवून सर्वांना दान करूया. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जे कुणी प्रयत्नशील आहेत- वैज्ञानिक, डॉक्टर्स, पोलीस, स्वयंसेवक, नर्सेस, सरकार – स्वतःवर संपूर्ण नियंत्रण ठेवून त्यांना सहकार्य करूया.

विश्‍वातील प्रत्येकावर विविध तर्‍हेची संकटे ही आयुष्यभर येतच असतात. मग तो एखादा जीव-जंतू असू दे किंवा मानव असू दे! प्रत्यक्ष परमेश्‍वर असला तरीही वेळोवेळी विविध बिकट परिस्थितींचा सामना प्रत्येकाला करावाच लागतो.
अशा कठीण समयी काही विशिष्ट गोष्टींची अत्यंत आवश्यकता असते-

  • शांत मन * सद्सद्विवेकबुद्धी *स्वतःबद्दल प्रखर आत्मविश्‍वास
  • सृष्टिकर्त्या भगवंताबद्दल दृढ श्रद्धा
    हे सर्व असले तर आपण ज्या अष्टशक्तींचा विचार नवरात्रीपासून करत आहोत, त्या सर्व शक्तींचा उपयोग अत्यंत विचारपूर्वक करणे आवश्यक आहे.
    सध्या विश्‍वासमोर एक जटिल, महाभयंकर संकट उभे आहे. ते म्हणजे – कोरोना- एक छोटासा विषाणू!! त्याच्याबद्दल सर्व प्रकारची आवश्यक माहिती गोळा करण्याचे कार्य जगभरातले वैज्ञानिक करतच आहेत. त्याचा सामना करण्यासाठी कशाकशाची गरज आहे याचा अभ्यास व संशोधन अगदी जोरात व अत्यंत प्रामाणिकपणे चाललेले आहे आणि ते बरोबरच आहे. कारण कोरोनाने सर्व मानवतेलाच आव्हान दिले आहे, तेसुद्धा आमच्या अस्तित्वाचे!
    इतिहास साक्षी आहे. अशी कितीतरी मोठमोठी संकटे आलीत. थोडे दिवस त्रास अवश्य होतो. अनेकजण मृत्युमुखी पडतात. अत्यंत दुःख, शोक होतो. पण भगवंतसुद्धा शेवटी आपली परीक्षाच बघतो. त्याची कृपा अनंत आहे. मुख्य म्हणजे अत्यंत कष्ट घेऊन त्यानेच ही सुंदर सृष्टी आम्हा सर्वांसाठी निर्माण केली आहे. त्याची इच्छा आहे की आपण सर्वांनी समस्येचे कारण समजून परत तशी चूक करू नये.
    बघूया, प्रयत्न चालू राहू देत. आम्हाला सर्वांना आवश्यक उपाय मिळू दे. लवकरात लवकर चांगली स्थिती येऊ दे… अशी प्रार्थना मनापासून, हृदयापासून करूया. पण तोपर्यंत काय?
    प्रत्येकाने स्वतःची शक्ती वाढवावी- शारीरिक- मानसिक- भावनिक- बौद्धिक- आध्यात्मिक. यामध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती. त्यासाठी एक फार प्रभावी शस्त्र म्हणजे सर्वांचे सहकार्य – हीच ती आठवी सहयोगशक्ती!
    ८. सहयोगशक्ती – देवी श्रीमहालक्ष्मी…
    अनादी काळापासून भारतीय तत्त्ववेत्ते पुनःपुन्हा सांगतात – * संघौशक्ती कलियुगे… कलियुगात संघशक्ती अत्यंत जरुरी आहे आणि आता चालू आहे ते महाभयंकर कराल कलियुग आहे.
    आश्रमजीवनापासून सुरू होऊन तरुणांना एक प्रार्थना सहयोगाबद्दल शिकवीत असत.
    *ॐ सह नाववतु | सह नौ भुनक्तु | सह वीर्यं करवावहै | तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै | ॐ शांतिः शांतिः शांतिः॥
  • हे प्रभो, आम्हा दोघांचे (गुरू व शिष्य) रक्षण कर. आम्हा दोघांचे पालन कर. आम्ही दोघांनी बरोबर राहून सर्व प्रकारची शक्ती प्राप्त करावी. आम्ही केलेले अध्ययन (विद्या) दैवी व तेजस्वी होवो. आम्ही दोघांनी परस्परांचा द्वेष न करावा….
    अशी ही प्रार्थना जरी गुरु-शिष्यांना संबोधून केलेली असली तरी ती जिथे दोन किंवा अनेक व्यक्ती असतील तिथे सर्वांसाठीच आहे. अनेक कार्यक्रमांच्या सुरुवातीला ही प्रार्थना म्हटली जाते. त्यावेळी अशी अपेक्षा असते की त्या प्रार्थनेचा अर्थ समजून ती म्हणावी व त्याप्रमाणे प्रत्येकाने तसे आचरण करावे. सर्वांचे कल्याण होईलच, म्हणजेच विश्वकल्याण होईल.
    तशीच आणखी एक अत्यंत अर्थपूर्ण प्रार्थना नियमित म्हटली जाते-
  • समानी व आकूतिः समाना हृदयानि वः |
    समानमस्तुं वो मनो यथा वः सुसहासति ॥
  • तुमचे संकल्प एकसमान असोत. तुमची हृदये एक होवोत. तुमची मने एकसमान होवोत. ज्यामुळे तुमचे परस्पर कार्ये पूर्णरुपाने संघटित होवो.
    आपल्या पूर्वजांनी – तेजस्वी ज्ञानी ऋषी-महर्षींनी या सर्व भावपूर्ण, ज्ञानपूर्ण प्रार्थना अत्यंत विचारांनी रचलेल्या आहेत. सर्वांचे सुख- कल्याण त्यांना अभिप्रेत आहे. म्हणूनच शेवटी एक भावपूर्ण प्रार्थना असते…
  • सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः |
    सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्‍चित् दुःखमाप्नुयात् ॥
  • सर्व लोक सुखी व निरामय (व्याधी-रोगमुक्त) होवोत. सर्वांचे कल्याण व्हावे. कोणीही दुःखी असू नये.
    त्या सर्वांचा विचार केला की मनात येते की आपले पूर्वज विश्‍वाबद्दल किती काळजी करत होते. सर्वांबद्दल त्यांना किती प्रेम व जिव्हाळा होता! मुख्य म्हणजे त्यांचे विचार फक्त भारतापुरतेच मर्यादित नव्हते तर सर्व विश्‍वाबद्दल त्यांना आस्था व आपुलकी होती. म्हणूनच ते म्हणायचे…
  • कृण्वन्तो विश्‍वं आर्यं|
  • सगळ्या विश्‍वाला त्यांना आर्य करायचे होते. ‘आर्य’ हा जातिवाचक शब्द नसून गुणवाचक शब्द आहे. त्यांना सर्व आवश्यक ज्ञान प्रत्येक माणसापर्यंत पोचवायचे होते. फक्त एका विशिष्ट गटापर्यंत नव्हे! त्यांचा दृष्टिकोन फार विशाल होता, संकुचित नव्हता.
    सहयोगाची शक्ती या विषयावर अभ्यास व चिंतन करताना आणखी एक विचार येतो- तो भगवंताच्या वचनाचा… ‘‘तू एक पाऊल पुढे घाल, मी शंभर पावले घालीन’’.
    आता आपले पाऊल ते केवढे आणि भगवंताचे केवढे? वामन अवतारात त्याची प्रचीती येते. त्यावेळी घटना, परिस्थिती, तत्त्वज्ञान वेगळे होते.
    भगवंताचा विचार करताना व्यक्तीने अगदी निःशंक असणे आवश्यक असते. तशीच संपूर्ण श्रद्धा व विश्‍वास जरुरी आहे.
  • द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी व संत मिराबाईला विष प्यायला दिले तेव्हा भगवंताने काय केले हे सर्वांनाच माहीत हवे. अशा व्यक्तीचे विचार व चारित्र्य पवित्र असायला हवेत. त्याच तोलाचे कार्यही अपेक्षित आहे.
    तशीच एक घटना आठवते ती म्हणजे गोवर्धन पर्वताची. गोष्ट सर्वांनाच माहीत आहे. पण इथे संदर्भ आहे तो भगवंताच्या सहयोगाचा. गुराख्यांनी स्वतःची काठी लावून पर्वत उचलण्याचा प्रयत्न जरूर केला पण खरी गरज होती ती श्रीकृष्णाच्या करंगळीच्या बोटाची!
    माउंट अबू स्थित प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्‍वविद्यालय – यांच्या प्रवचनातून व साहित्यातून एक गोष्ट समजते की सहयोगशक्तीची देवी आहे- श्रीमहालक्ष्मी.
    देवीचे रूप बघितले की लगेच पवित्रतेचा अनुभव येतो. तिचे आसन आहे – कमळ. ते प्रतीकात्मक आहे.
  • कमळ – अगदी आकर्षक आहे. मृदू आहे. ते चिखलात उगवते पण त्याचा स्पर्शदेखील कमळाला होत नाही. भगवंताची आमच्याकडून हीच अपेक्षा आहे- पवित्रता, मधुरता, आकर्षकता, सुगंध… आणि मुख्य म्हणजे जगातील विकारांचा स्वतःवर परिणाम न होऊ देणे- इथे राहूनसुद्धा.
    लक्ष्मीच्या हातात कमळ दाखवतात. त्याचे विविध अर्थ आहेत- जो असा कमळासारखा असतो त्याला देवी उचलते. स्वतःजवळ ठेवते तसेच लाडक्या भक्ताला कमळ देते. या संदेशाबरोबर की तुझे जीवन कमळासारखे असू दे.
    देव म्हणजे जे देतात ते. दान करतात ते. लक्ष्मी तर धनाचीच देवता आहे. तिचा हात असा वर दाखवतात. त्यातून धनाचा वर्षाव होत राहतो.
    ज्या व्यक्ती असे दान करतात- तन, मन (सेवा) आणि धन – त्यांना भगवंत सहयोग अवश्य देतो आणि हा सहयोग विविध पैलूत व क्षेत्रात असतो.
    आपण सर्वजण मुख्यत्वे योगसाधक हाच धडा घेऊया की आपण सर्व अष्टशक्तीचे ज्ञान मिळवून सर्वांना दान करूया. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जे कुणी प्रयत्नशील आहेत- वैज्ञानिक, डॉक्टर्स, पोलीस, स्वयंसेवक, नर्सेस, सरकार – स्वतःवर संपूर्ण नियंत्रण ठेवून त्यांना सहकार्य करू या. भगवंताचा सहयोग आम्हाला नक्की लाभेल असा विश्‍वास व श्रद्धा ठेवूया. योगसाधकांनी या अष्टशक्तींची उपासना करून आशाच नाही तर खात्रीच बाळगू या.