>> नवे कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण १० टक्क्यांच्या खाली
राज्यात नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असली तरी, कोरोना बळींची वाढती संख्या कायम आहे. गेल्या चोवीस तासांत आणखी ८ कोरोना बळींची नोंद झाली असून, नवीन २२१ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यात बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण महिनाभरानंतर १० टक्क्यांच्या खाली आले असून, बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ७.७७ टक्के एवढे आहे.
गेल्या काही दिवसांपासून स्वॅब तपासणीमध्ये घट होत चालली आहे. गेल्या चोवीस तासांत २८४३ स्वॅबची तपासणी करण्यात आली, त्यातील २२१ स्वॅबचे नमुने बाधित आढळून आले. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ५ हजारांच्या खाली आली असून, ती ४ हजार ३७७ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३७४८ एवढी झाली आहे.
राज्यात ७ दिवसांत ५५ बळी
राज्यातील कोरोना बळीच्या संख्येत अजूनपर्यंत घट झालेली नाही. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या सात दिवसात ५५ जणांचा कोरोनाबाधितांचा बळी गेला आहे.
२४ जण इस्पितळांत
राज्यात गेल्या चोवीस तासांत २४ जणांना इस्पितळांत दाखल करून घेण्यात आले आहे. इस्पितळात दाखल होणार्या कोरोनाबाधिताची संख्या कमी झालेली नाही. गेल्या २४ तासांत इस्पितळातून बर्या झालेल्या २८ जणांना घरी पाठविण्यात आले आहे.
५०० जण कोरोनामुक्त
राज्यात नवीन कोरोनाबाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त आहे. मागील चोवीस तासांत आणखी ५०० जण कोरोनामुक्त झाले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६५ टक्क्यांवर पोहोचले आहे.