कोरोना मृत्यूसत्र थांबेना; राज्यात १० बळींची नोंद

0
12

राज्यात नवे कोरोनाबाधित रुग्ण घटत असले, तरी बळींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत आहे. राज्यात गेल्या २४ तासांत १० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, बळींची एकूण संख्या ३७२७ एवढी झाली आहे. तसेच नवे ५९५ कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

राज्यातील कोविड संसर्गाचे प्रमाण १५.९८ टक्के एवढे आहे. गेल्या २४ तासांत ३७२३ स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली, त्यापैकी ५९५ नमुने बाधित सापडले. त्यातील ५६७ जणांनी गृहविलगीकरणाचा पर्याय स्वीकारला असून, २८ जणांना इस्पितळांत दाखल करण्यात आले आहे.

गेल्या २४ तासांत ज्या १० जणांचा बळी गेला, त्यातील चौघांचा गोमेकॉत, तिघांचा दक्षिण गोव्यातील खासगी इस्पितळांत आणि एकाचा उत्तर गोव्यातील खासगी इस्पितळात मृत्यू झाला. उर्वरित दोघांना इस्पितळांत दाखल करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. गेल्या २४ तासांत १३२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सक्रिय रुग्णांची संख्या ६ हजारांच्या खाली आहे. सध्या राज्यात ५९६८ एवढे सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण २ लाख ४१ हजार ६८४ कोरोना रुग्ण सापडले असून, २ लाख ३१ हजार ९८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

वाढते कोरोना बळी ही बाब राज्यासाठी चिंतेची ठरली आहे. यापूर्वी सलग दोन दिवस ९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. तिसर्‍या लाटेत लस न घेतलेल्या रुग्णांना अधिक धोका संभवत असून, मृत्यू पावणार्‍यांमध्ये त्यांचीच संख्या जास्त आहे. दररोज जेवढे कोरोना बळी होत आहेत, त्यापैकी निम्म्यांनी कोविड प्रतिबंधक लसीचा एकही डोस न घेतल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीतून समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, यासाठी आरोग्य खात्याकडून सातत्याने आवाहन केले जात आहे.

देशातील कोरोना बळींची संख्या ५ लाखांच्या वर

देशात हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. सक्रिय कोरोना रुग्णांचा दर देखील कमी होत आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली, तरी कोरोनामुळे मृत्यू होणार्‍यांचे प्रमाण वाढत असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. मागील २४ तासांमध्ये देशात १०७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, आत्तापर्यंत देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ही ५ लाखांच्या पुढे गेली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांमध्ये देशात १ लाख ४९ हजार ३९४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहेत.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत भारतात कोरोनामुळे ५,००,०५५ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे ५ लाखांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होणारा भारत हा जगातील तिसरा देश ठरला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सक्रिय रुग्णांची संख्या ही घटली आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या ही १४ लाख ३५ हजार ५६९ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात २ लाख ४६ हजार ६७४ लोक कोरोनातून बरे झाले आहेत. आत्तापर्यंत देशात ४ कोटी १७ हजार ८८ लोक कोरोनातून बरे झाले आहेत. देशात लसीकरण देखील वेगाने वाढत आहेत. आत्तापर्यंत देशात कोरोनाचे १६८ कोटीहून अधिक डोस दिले आहेत. काल देशात ५५ लाख ५८ हजार ७६० लसीचे डोस देण्यात आले.