>> ‘मन की बात’मध्ये मोदींचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ मधून काल संवाद साधताना देशवासीयांना कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. पण अजून कोरोना गलेला नाही. यामुळे कुठलाही उत्सव कार्यक्रमात कोरोनाच्या नियमांचे पालन करणे विसरू नका असे आवाहन केले. यावेळी मोदींनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणार्या मीराबाई चानू हिचे अभिनंदन केले. तसेच ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा फडकताना बघून रोमांचित झाल्याचे सांगितले.
देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. यावेळी स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्यांचे स्मरण केले जात आहे. यामुळे १५ ऑगस्टला राष्ट्रगीत नक्की म्हणा, असेही आवाहन त्यांनी केले. ‘नेशन फर्स्ट, ऑलवेज फर्स्ट’ या मंत्रासह आपल्याला पुढे जायचे आहे. १५ ऑगस्टला यंदा राष्ट्रगीताशी संबंधित एक प्रयत्न करण्यात येत आहे. सांस्कृतिक मंत्रालयाकडून हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. यात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन राष्ट्रगीत म्हणावे. यासाठी एक वेबसाइटही बनवण्यात आल्याचे मोदींनी पुढे सांगितले.
आज सोमवार २६ जुलैला ‘कारगिल विजय दिवस’ आहे. कारगिलची लढाई भारतीय सैन्याचे शौर्य आणि संयमाचे प्रतीक आहे. यावेळी हा कारगिल विजय दिवस स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान साजरा होत असल्याचे मोदी यांनी सांगितले.