कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करा ः मुख्यमंत्री

0
80

>> वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसोबत बैठक

राज्याला पडलेला कोरोनाचा विळखा लक्षात घेऊन काल मंगळवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक, तसेच अन्य वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना कोविड एसओपीची कडकपणे अंमलबजावणी करण्याचे व या एसओपीचा भंग करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. राज्यात रात्रीची संचारबंदी तसेच जमावबंदी याची योग्य प्रकारे अंमलबजावणी होईल यासाठी कडक पावले उचलावीत अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना केली.

राज्यात कुणी क्रीडा मेळाव्यांचे आयोजन करणार नाहीत, तसेच सामाजिक सोहळे, राजकीय सोहळे, जत्रा, फेस्त मोठ्या स्वरुपातील लग्न समारंभ आदींचे आयोजन केले जाणार नाही याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. लग्न सोहळा फक्त ५० लोकांना घेऊन आयोजित करू द्यावा. तसेच त्यापेक्षा जास्त लोकांना घेऊन लग्न सोहळा अथवा अन्य कार्यक्रम करू दिल्यास सभागृह मालकावरही कारवाई केली जावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना केली आहे. गरज भासल्यास अशा सभागृहाबाहेर पोलिसांना तैनात केले जावे, अशी सूचना त्यांनी केली. प्रार्थनास्थळांत एकावेळी २५ पेक्षा लोकांना प्रवेश दिला जाऊ नये, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना केली.

यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, वरील प्रकरणी आपण राज्याचे पोलीस महासंचालक, पोलीस अधिकार्‍यांबरोबर व्हिडिओ कॉन्स्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून त्यांना कडक सूचना केल्या आहेत.
नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी मिरवणुका काढणार्‍यांना रोखण्यास पोलिसांना अपयश का आले याचा खुलासाही करण्यास पोलीस अधिकार्‍यांना सांगण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.