कोरोना काळात माहिती तंत्रज्ञानाचे योगदान

0
144
  • – डॉ. संतोष पाटकर (लेखक अभ्यासू सामाजिक भाष्यकार आहेत)

माहिती तंत्रज्ञान आज आपल्याला वरदान ठरले आहे. त्याचा वापर आपण चांगल्या कामासाठी केला पाहिजे. कोरोनाची पहिली लाट, दुसरी लाट यामध्ये आमचे भरपूर नुकसान झालेले आहे. आता तिसरी लाट धडकली आहे. तरीसुद्धा आपण आपले काम चालू ठेवलेले आहे. यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा भरपूर उपयोग झाला आहे.

माहिती तंत्रज्ञान हे १९९१ नंतर भारतात प्रचंड प्रमाणात विकसित झाले. आर्थिक सुधारणांअंतर्गत उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरणामुळे जग हे जागतिक गाव बनले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून काही सेकंदांतून जगातील कुठल्याही गावात संपर्क साधू शकतो. आज बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतभर आपले जाळे पसरलेले आहे. ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, वित्त, विमा सेवा अशा अनेक क्षेत्रांत भरपूर प्रमाणात बहुराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत. मोबाईल फोन, इमेल, वॉटस्‌ऍपच्या माध्यमातून अनेक माहिती मिळविली जाते. खरेतर माहिती तंत्रज्ञानाने आज जगामध्ये नवीन क्रांती घडविलेली आहे. पुस्तकी रूपाने किंवा कागदाच्या रुपाने देणारी माहिती आज ‘सॉफ्ट कॉपी’ने दिली जाते. गोवा विधानसभेचे माजी सभापती व आता हिमाचल प्रदेशचे राज्यपाल श्री. राजेंद्र आर्लेकर यांनी पहिल्यांदा गोवा विधानसभेचे अधिवेशन पेपरलेस केले होते. सरकारी कार्यालयांत सॉफ्ट कॉपीची मागणी करतात. त्यामुळे कागदाचा कमी वापर होतो आणि वेळही वाचतो. काही ठिकाणी प्रत्यक्षात कार्यालयात जाऊन माहिती देण्याची गरज नाही. आज मोबाईलमुळे अनेक अधिकारी किंवा कर्मचारी कार्यालयात हजर आहेत की नाहीत हे मोबाईलवरून कळू शकते. त्यामुळे उगाच हेलपाटे मारायची गरज नाही. सर्व सरकारी, बिनसरकारी व खाजगी आस्थापने यांच्या संकेतस्थळावर सगळी माहिती घरबसल्या मिळते. बँकेमध्ये व्यवहार, वीज बिले, पाण्याची बिले, ऑनलाईन खरेदी या सर्व गोष्टी माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करायला मिळतात. हे सगळे व्यवहार कायदेशीर असल्यामुळे सरकारलासुद्धा त्याचा महसूल मिळतो व व्यवहारात पारदर्शकता राखली जाते.

कोरोनाचा प्रथम प्रसार चीनमध्ये वुहान येथे झाला. २१ जानेवारी २०२० रोजी चीनमध्ये कोरोनाचे १०० रुग्ण आढळले म्हणून शिक्कामोर्तब झाले. हळूहळू त्याचा प्रसार संपूर्ण जगभर झाला. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी २५ मार्च २०२० रोजी लॉकडाऊन जाहीर करून कोरोनाचा जास्त प्रसार होऊ नये म्हणून काळजी घेतली. सरकारी कार्यालये, खाजगी आस्थापने, शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, वाहतूक वगैरे सर्व बंद होते. प्रसार रोखण्यात काही प्रमाणात यश आले. पण पूर्ण प्रसार बंद झाला नाही. कोरोनाचे रुग्ण वाढत होते व काही प्रमाणात कमी होऊन नंतर कोरोनाची दुसरी लाट धडकली. उत्पादन क्षेत्रात उत्पादन कमी झाले किंवा करण्यात आले. सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये बंद होत्या. शाळा, महाविद्यालयात विद्यार्थी प्रत्यक्षात न येता घरी बसून वर्ग ऑनलाईन पद्धतीने घ्यायला सुरुवात झाली. शिक्षकांना अनुभव नसल्यामुळे प्रशिक्षण देण्यात आले. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठाच्या बैठका ऑनलाईन पद्धतीने घ्यायला सुरुवात केली. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान न होता शिक्षण चालू ठेवणे गरजेचे होते. काही प्रमाणात अडीअडचणी आल्या, पण आता मुलांना, पालकांना व शिक्षकांना सवय झाली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे सगळे शक्य झाले. जर माहिती तंत्रज्ञान विकसित झाले नसते तर ह्या गोष्टी अवघड झाल्या असत्या.

भारतात संगणकाचा वापर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्याचे श्रेय माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांना जाते. सुरुवातीला संगणक वापरल्यामुळे भारतात बेरोजगारी वाढली म्हणून शंका उपस्थित झाल्या. काही प्रमाणात त्यात तथ्य होते. पण संगणकामुळे नवीन संधी उपलब्ध झाल्या. त्यामुळे जास्त रोजगाराची संधी मिळाली. आज सगळ्या क्षेत्रांत संगणकाचा व इंटरनेटचा वापर होतो व आज माहिती तंत्रज्ञानाची उपकरणे ही एक गरज झाली आहे.

कोरोनाच्या काळात सगळे उद्योगधंदे मंदीत चालत होते. काही तर एकदम ठप्प झाले होते. पण कोरोना दरम्यान माहिती तंत्रज्ञानाच्या उपकरणांची विक्रीत वाढ झाली आहे. मोबाईल फोन, कॉंप्युटर, लॅपटॉप, नोटपॅड वगैरे यांची विक्री वाढली आहे. शाळा, महाविद्यालये ऑनलाईन वर्गामुळे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना लॅपटॉपची गरज लागते. त्यामुळे लॅपटॉपची मागणी वाढली. ऑनलाईन वर्ग मोबाईलपेक्षा लॅपटॉपवर ऐकणे चांगले असते. शिक्षकवर्ग शिकवताना पॉवरपॉईंट सादरीकरण करतात.

विद्यार्थ्यांना ते मोबाईलफोनपेक्षा लॅपटॉपवर चांगली ठळकपणे दिसू शकते. म्हणून लॅपटॉपचा वापर जास्त होतो. पण काही पालकांना व विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्यामुळे स्मार्टफोनचा उपयोग करतात. भारतामध्ये वर्क फ्रॉम होम म्हणजे घरी बसून काम करण्याची संकल्पना नव्हती. पण कोरोनाच्या काळात बहुराष्ट्रीय कंपन्या व खाजगी आस्थापने यांच्या समोर आणि पर्याय नव्हता. सर्व अधिकारी व कर्मचारी लॅपटॉपवर ऑनलाईन मिटिंग व कामे करीत होते. ज्या लोकांची कामे संगणक वापरून करायची असतात त्यांना घरी बसून काम करणे सोपे जात होते. पण उत्पादन क्षेत्रात मात्र प्रत्यक्षात कामगारांना काम करावे लागते म्हणून त्यांची उपस्थिती महत्त्वाची. आता माहिती तंत्रज्ञान विकसित झाले म्हणून व साधने उपलब्ध असल्यामुळे हे शक्य झाले. नाहीतर विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असते.

पहिल्या लॉकडाऊनच्या काळात दर दिवशी जवळ-जवळ ३२००० कोटींचे नुकसान होत असे. एप्रिल ते जून २०२० या दरम्यान भारताचा जीडीपी २४.४% खाली आला आणि त्यानंतर दुसर्‍या तिमाहीत म्हणजे जुलै ते सप्टेंबरमध्ये थोडी सुधारणा झाली. पण फक्त ०.५% व १.६% संपूर्ण वर्षामध्ये २०२०-२१ मध्ये जीडीपी ७.३% खाली आला. माहिती तंत्रज्ञानाचे महत्त्व व गरजेचे साधन म्हणजे लॅपटॉपची विक्री जगामध्ये १०६ अब्ज डॉलर २०२० मध्ये झाली होती व २०२१ साली ११५.८८ अब्ज डॉलर झाली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या उपकरणांच्या कंपन्या जास्त करून बहुराष्ट्रीय असून त्याचा व्यापार संपूर्ण जगावर होत असतो.

कोरोनाच्या काळात माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग चांगल्या प्रकारे करण्यात येत असे. संपूर्ण देशातील कोरोना रुग्णांची संख्या आरोग्य केंद्रांप्रमाणे व मृत्यूंची संख्या दरदिवशी लोकांना पुरवायला सोपे जात होते. दरदिवशी आरोग्य बुलेटीनमध्ये माहिती पुरवायची. कोरोना रुग्णांची चाचणी करून त्याचा निकाल लवकर देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत होता. लसीकरण कार्यक्रमाचे नियोजनासाठी व व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत होता. लसीकरणासाठी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे. सुरुवातीला लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते, कारण लसीकरणामुळे आरोग्यावर परिणाम होतील म्हणून लोक भीत होते. जागृती करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या साहित्यामुळे सहज शक्य झाले. तंत्रज्ञानाच्या आधारे काही विशिष्ट ऍपची निर्मिती झाली होती. त्यात आरोग्यसेतू तसेच कॉंटॅक्ट ट्रेसिंग आणि सेल्फ क्वारंटाईन ऍपची निर्मिती करण्यात आली. लसीकरण झाल्यानंतर लोकांना एसएमएस पाठवून माहिती देत असत. तर प्रमाणपत्र लवकर लोकांना देत असे. माहिती तंत्रज्ञान हे आज आमच्या पिढीला लाभलेले एक ब्रह्मास्त्र आहे. कुठलीही माहिती आणि केव्हाही हवी असल्यास इंटरनेटच्या आधारे काही मिनिटांमध्ये आपल्याला मिळू शकते. सर्व क्षेत्रांमध्ये आज तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यामुळे माणसाचा वेळ व पैसा वाचवता येतो. जुन्या पिढीच्या लोकांना जरा समजायला व शिकायला कठीण होत असेल पण युवा वर्ग आज जास्त उपयोग करीत असतात. बाहेर जाताना खिशात पैसे नसले तरी चालेल पण मोबाईल फोन आवश्यक आहे. माहिती तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग व्हायला हवा. काहीजण त्याचा दुरुपयोग करतात व त्यामुळे लोक ऑनलाईन व्यवहार करायला टाळतात. काहीजण वेगवेगळे संदेश, व्हिडिओ पाठवून चुकीची माहिती देतात व तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेतात. माहिती तंत्रज्ञान आज आपल्याला वरदान ठरले आहे. त्याचा वापर आपण चांगल्या कामासाठी केला पाहिजे. कोरोनाची पहिली लाट, दुसरी लाट यामध्ये आमचे भरपूर नुकसान झालेले आहे. आता तिसरी लाट धडकली आहे. तरीसुद्धा आपण आपले काम चालू ठेवलेले आहे. यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा भरपूर उपयोग झाला आहे. कदाचित आणि पुढे अधिक संशोधन त्यावर होऊन आधुनिक तंत्रविकसित होऊन देशाच्या विकासाला मोठा हातभार लागेल अशी आशा बाळगूया.