- डॉ. संगीता राजेंद्र गोडबोले
(एम्.बी.बी.एस्., डी.सीएच)
सध्याच्या कोविद-१९ कोरोना व्हायरस या अत्यंत ज्वलंत प्रश्नाकडे आपण एक जागतिक वैद्यकीय आपत्ती म्हणून पाहूया आणि त्याबद्दल उठणार्या अफवांवर विश्वास न ठेवता काय खरे आणि काय खोटे याविषयी माहिती घेऊया .
मी अमेरिकन जर्नलमध्ये आलेल्या पेपरचा, न्यू इंग्लंड जर्नल आफ मेडिसिन मधील लेखाचा आणि डब्लूएचओनी काढलेली पत्रके, तसेच इतर ऑथेंटिक लेखांचा यात संदर्भ घेतला आहे आणि आपल्या वातावरणात आपल्या गावात आपण त्याविषयी काय करू शकतो यावर विचार मांडत आहे.
कोविद-१९ म्हणजे २०१९ साली आलेला कोरोना या व्हायरसमुळे/विषाणूंमुळे झालेला आजार. चीनमधील वुहान या गावी त्याचा पहिला रुग्ण सापडला आणि त्यानंतर चीनमध्ये झपाट्याने त्याचा प्रसार झाला.
आता जगातील अनेक देशात त्याचा फैलाव सुरू झाला आहे.
यामध्ये या आजाराची लक्षणे दिसण्याआधीच त्याने शरिरात प्रवेश केलेला असतो. सर्दी, घसा दुखणे, कोरडा खोकला, थकवा वाटणे, अंगदुखी, थोडा ताप किंवा कधीकधी तापही नाही, अशा लक्षणांपासून ते न्युमोनिया होऊन व्हेंटिलेटरवर ठेवण्यापर्यंत या रोगाची लक्षणे असू शकतात.
सुमारे ८०%पेशंट सौम्य इन्फेक्शन सदरात येतात…
यात खोकला आणि थोडा ताप असतो. यांना घरात राहून ओपीडी धरतीवर ट्रीटमेंट देता येते. बरेचदा कोणत्याही ट्रीटमेंटशिवायही हे रुग्ण बरे होतात.
१३-१४% मध्यम इन्फेक्शन सदरात येतात….
यांना दवाखान्यात ऍडमिट करून मॉनिटर करावे लागते.
आणि फक्त साडेचार टक्के तीव्र इन्फेक्शन या सदरात येतात. यांची अत्यवस्थ अवस्था असते ज्यामध्ये ‘आयसीयु’मध्ये ठेवून व्हेंटिलेटरवर कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यावा लागतो.
यापूर्वीही एस्आर्एस्; सिव्हियर ऍक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम आणि एम्ईआर्एस् – मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम या रोगांनी थैमान घातले होते.
चीनबरोबर इटली, साउथ कोरिया, इराण, फ्रांन्स या देशातही कोरोनाचा प्रसार मोठया प्रमाणात झाला आहे.
तीन फेब्रुवारीच्या गणनेनुसार फ्रांन्समध्ये सुमारे एक लाख चाळीस हजार रूग्ण होते.
साधारणपणे एक महिना हातात असूनही साऊथ कोरिया किंवा इटलीने युद्धपातळीवर हा प्रसार रोखण्याचे विशेष प्रयत्न केले नाहीत .
आश्चर्य असे की जपान, तैवान, सिंगापूर, हॉंगकॉंगमध्ये हा रोग का फैलावला नाही? तर .. २००३ साली या कोरोनासदृश ‘एस्आर्एस्’ने यांना गाठले असताना आपण यावर काय उपाययोजना करावी याचा आराखडा त्यांच्याकडे तयार होता आणि तो त्यांनी उपयोगात आणला.
साऊथ कोरियात ३० केसेस होत्या पण ३१ वा पेशंट हा हजारो लोकांना इन्फेक्ट करणारा सुपर स्प्रेडर ठरला. त्याच्यात लक्षणे दिसण्यापूर्वीच हे झाल्याने त्यावर उपाययोजना करणे कठीण होऊ लागले .
याचाच अर्थ आपण योग्य वेळी योग्य उपाययोजना केली तर यास तोंड देणे शक्य होईल.
अमेरिका आणि इतर देशातही केसेस मिळाल्या असून त्यावर उपाययोजना सुरू झाली आहे.
कोरोना व्हायरस हा आकाराने त्यामानाने मोठा आहे… सुमारे चारशे मायक्रॉन साईझ आहे त्याचा.
* शिंक/खोकला यातून डायरेक्ट तोंडावर त्याचे तुषार उडाले तर याची दुसर्यास लागण होते.
साधारण तीन फुटाचे अंतर असेल तर हे तुषार जमिनीवर पडतात आणि हा धोका टळतो.
* मेटल्स, सिरॅमिक्स, प्लास्टिक अशा गोष्टींवर तो साधारण नऊ दिवस जिवंत राहतो. त्यामुळे दाराच्या कड्या, गाड्यांची हँडल्स, इलेव्हेटरची बटन्स या सर्वात अधिक धोकादायक गोष्टी आहेत.
* प्राण्यांकडून दोन- अडीच टक्के फैलाव शक्य आहे.
– अशा वेळी परदेशात त्यांनी आणिबाणीचा उपाय म्हणून मॉल्स, शाळा, आफिसेस बंद केली.
– एका ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी वेगवेगळे कार्यक्रम बंद केले.
– रेस्टॉरंट्सही सकाळी सहा ते संध्याकाळी सहा या वेळातच चालू ठेवली.
अठ्ठावीस पेक्षा जास्त तापमानात कदाचित् हा विषाणू जगू शकणार नाही असा अंदाज असला तरीही तसे ठोस पुरावे अद्याप नाहीत.
पस्तीस डिग्रीवर तापमानात तो तीन- चार मिनिटांपेक्षा जास्त वेळ जगू शकणार नाही.. असे एका पत्रकात म्हटले आहे.
तेव्हा यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो याचा विचार करुया-
* मुळात आपली प्रतिकारशक्ती वाढवली पाहिजे.
* सत्तर किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना किंवा आधीच श्वसनाचे, हृदयाचे आजार असलेल्या, किडणीचे आजार असणार्या, मधुमेही लोकांना याचा धोका अधिक आहे.
* हात मिळवल्याने विषाणू फैलावतात, त्यामुळे शक्यतो लांबूनच बोलावे.
* बाहेर जाऊन आल्यानंतर सॅनिटायझरने किंवा साबणाने हात प्रत्येक वेळी स्वच्छ धुवावेत.
* तोंडाला मास्क बांधावा; नसल्यास रुमाल बांधावा.
* हातात ग्लोव्ज घालावेत.
* आपल्याला खोकला झाला असल्यास आपल्याकडून दुसर्यास जंतू जाऊ नयेत यासाठीही याचा उपयोग आहे .
* दोन- तीनदा मिठाच्या गरम पाण्याने गुळण्या करा.
* कोणत्याही प्रकारच्या फ्लू वगैरेही विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यास हा सर्वोत्तम आणि अत्यंत साधा सोपा उपाय आहे.
* मास्कच्या उपलब्धतेचा प्रश्न उद्भवू शकतो. दोन वेगळ्या रंगाच्या दोन पदरांचे कापडी मास्क वापरता येतील. म्हणजे त्या दोन पदरांचा रंग आत/बाहेर वेगळा असेल. घरी आल्यावर कापडी मास्क किंवा रूमाल एकदाच वापरून उकळत्या पाण्यात धुवावेत किंवा चक्क त्यांना प्रेशरकुकरमध्ये वाफ काढावी म्हणजे हास्पिटलमध्ये आटोक्लेव्ह केल्यासारखे होईल.
* शक्यतो लांबचे प्रवास टाळावेत.
* गर्दीच्या जागा टाळा.
* व्हिटमिन-सी युक्त पदार्थ घ्या. जसे- फ्रेश लिंबू सरबत, ऑरेंज ज्यूस, आवळा सरबत, मोरावळा हे पदार्थ रोज घ्या.
* खोकला झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याची लक्षणे दिसेपर्यंत तीन ते सात दिवस लागतात. जर ताप, खोकला, छातीत दुखणे, दम लागणे अशी लक्षणे वाढत जाऊ लागली तर कोरोनासाठी रक्ताची तपासणी करणे आणि छातीचा एक्सरे काढणे जरूर आहे.
कोरोना टेस्टसाठी मुंबईत कस्तुरबा हॉस्पिटल येथे व्यवस्था आहे.
काळजी घ्या… काळजी करून उपयोग नाही.
घरातील वृद्ध लोक, गरोदर स्त्रिया आणि मुलांना अधिक जपा.
कोरोना हा विषाणू असल्याने त्याच्या वाढीसाठी किंवा तो जिवंत रहाण्यासाठी मानवी अथवा प्राणीपेशीची गरज असते. तो एकटा राहू शकत नाही.
हा विषाणूंमुळे होणारा आजार असल्याने त्यावर अंँटिबायोटिक्स उपयोगी नाहीत.
परंतु कोरोना इन्फेक्शन बरोबरच बॅक्टेरिअल इन्फेक्शनचा संभव अजूनतरी ऐकिवात नाही. त्यावर अजून संशोधन चालू आहे आणि ते होणे गरजेचे आहे.
त्यावरची लस अजून उपलब्ध नाही.
पण त्यावर काम सुरू आहे. बाकी माहिती हळूहळू हाती येईल.
कोरोनाचे संकट आपल्याला किती त्रास देईल हे नक्की माहीत नाही. पण अशी काळजी घेतल्याने ते आपण कमी नक्कीच करू शकतो.
तेव्हा ..गोंधळून जाण्याची गरज नसली तरी हा दुर्लक्ष करण्यासारखा प्रश्न नाही हे निश्चित.