कोरोना आणि जगन्नाथाची रथयात्रा

0
188
  •  दत्ता भि. नाईक

अक्षुण्णपणे चालू असलेली रथयात्रा बंद पडते की काय अशी शंका उत्पन्न झाली होती. बारा वर्षे रथयात्रा बंद पडली असती तर पुरीनगरीचे ऐश्‍वर्य डळमळले असते. अखेरीस काही लोकांच्या उपस्थितीत रथयात्रेचे आयोजन करण्याची सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी मिळाली.

यंदा ‘कोरोना’ विषाणूच्या प्रकोपामुळे अनेक सुप्रसिद्ध व देशभरातील भक्तजनांना एकत्र आणणार्‍या यात्रा एकतर बंद कराव्या लागल्या किंवा कमी लोकांच्या उपस्थितीत साजर्‍या कराव्या लागल्या. ओरिसा राज्यातील पूर्व किनार्‍यावरील जगन्नाथपुरी येथील रथयात्रेचेही असेच घडले. यात्रेचा विषय सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचला. एखाद्या वर्षी खंड पडला तर बारा वर्षे रथयात्रा बंद ठेवावी लागते. जगद्गुरू आद्य शंकराचार्यांनी केदारनाथ, द्वारका, श्रृंगेरी व जगन्नाथपुरी अशा चार ठिकाणी मठांची स्थापना केली होती. सप्त मोक्षदायी स्थानांमध्ये पुरीचा क्रमांक लागतो. चैतन्य महाप्रभू या महान वैष्णव संतामुळे बंगाल व ओरिसा या दोन्ही प्रांतांना भक्तिमार्गाचा उपदेश देणारी परंपरा येथील भूमीवर सुरू झाली. अक्षुण्णपणे चालू असलेली रथयात्रा बंद पडते की काय अशी शंका उत्पन्न झाली होती. बारा वर्षे रथयात्रा बंद पडली असती तर पुरीनगरीचे ऐश्‍वर्य डळमळले असते. अखेरीस काही लोकांच्या उपस्थितीत रथयात्रेचे आयोजन करण्याची सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी मिळाली.

मावशीच्या घरापर्यंत
जगन्नाथ, बंधू बलभद्र व भगिनी सुभद्रा अशा दैवतांची ही रथयात्रा आषाढ शुक्ल द्वितीयेला सुरू होते व आषाढी एकादशीला ही तिन्ही दैवते आपापल्या स्थानावर परत जातात. जगन्नाथाच्या रथाला नन्दिघोष, बलभद्राच्या तालध्वज तसेच सुभद्रेच्या रथाला देवदलन या नावाने ओळखतात. रथात बसण्याच्या मूर्ती कडुनिंबाच्या झाडाच्या लाकडापासून बनवलेल्या असतात. त्याचप्रमाणे एका वर्षी रथयात्रा आटोपली की दुसर्‍या वर्षीच्या रथयात्रेसाठी रथ बनवण्याचे काम सुरू होते. पुरीचे जगन्नाथ मंदिर ते गुंडीचा नावाच्या त्यांच्या मावशीच्या घरापर्यंत दोन किलोमीटरएवढी ही यात्रा असते. अतिशय रूंद व ऐसपैस असलेला हा सरळ रस्ता आहे. जेव्हा रथयात्रा नसते तेव्हा हा रस्ता छोटी दुकाने, फळे व इतर साहित्य विकणार्‍या फेरीवाल्यांच्या गर्दीने गजबजलेला असतो.

गुंडीचा ही या तिन्ही भावंडांची मावशी आहे अशी स्थानिक लोकांची श्रद्धा असून याच ठिकाणी जगन्नाथाचा म्हणजे कृष्णाचा जन्म झाला असे त्यांचे म्हणणे आहे. एक आठवडाभर मावशीच्या घरी मुक्काम केल्यानंतर तिन्ही भावंडे आपापल्या स्थानी परत येतात.
दुसर्‍या एका स्थानावर असलेल्या या तिन्ही मूर्तींची पूर्व किनार्‍यावर आणून स्थापना करण्याचे काम इंद्रद्युम्न नावाच्या राजाने केले अशी एक पौराणिक कथा आहे. त्याची पत्नी गुंडीचा ही कृष्णभक्त होती. तिच्यामध्ये वात्सल्याचा भाव निर्माण झाल्यामुळे तिला या तिन्ही दैवतांच्या मावशीचा दर्जा मिळाला.

मंदिराची वैशिष्ट्ये
पुरीचे जगन्नाथमंदिर वेगवेगळ्या कारणांमुळे देशातच नव्हे तर जगप्रसिद्ध आहे. सध्या जे मंदिर आहे त्याचे बांधकाम बाराव्या शतकात अनंत वर्मन चोल गगराज याने सुरू केले व त्याच्यानंतर अनंग भीमदेव राजाने पूर्ण केले. मंदिराच्या मुख्य दरवाजाला सिंहदरबार म्हणून ओळखतात. तो पूर्व दिशेला असून त्याच्या समोर सिंहाची मूर्ती आहे. त्याचप्रमाणे पश्‍चिमेला व्याघ्र दरवाजा, उत्तरेला हत्ती दरवाजा तर दक्षिणेला अश्‍व दरवाजा या नावाने ओळखतात.
मंदिराचे एकूण क्षेत्रफळ टाळीस हजार चौरसमीटर आहे, तर उंची पासष्ट मीटर एवढी आहे. मंदिराच्या कलशावर सुदर्शनचक्र आहे. अजूनही बघितल्यास ते आपल्याच समोर असल्याचा भास होतो. या मंदिराचे स्थानच असे आहे की, सूर्य कोणत्याही बाजूस असो, त्याच्या घुमटाची सावली पडत नाही. अतिशय उंचावर मंदिराचा ध्वज आहे. त्याचे वैशिष्ट्य असे की तो सतत वार्‍याच्या विरुद्ध दिशेला वाहत असतो. हा ध्वज फडकावणारा माणूस शिखरावर पाय उलटा करून उलटाच चढत असतो. ज्या राजाने मूळ मंदिराची स्थापना केली त्या इंद्रद्युम्न राजाच्या नावाचे जवळच एक तळे आहे. तेथील पाण्यानेच मंदिर परिसर व रथयात्रेच्या वेळेस रस्ता धुतला जातो. जगन्नाथ हा जगाला अन्न पुरवणारा देव आहे. येथील प्रसाद भाताचा बनवलेला आहे. येथील स्वयंपाकघर कधीही बंद नसते म्हणून हे जगातील सर्वात मोठे स्वयंपाकघर म्हणून ओळखले जाते. एकावर एक अशी सात मातीची भांडी ठेवून भात शिजवला जातो व सर्वात उंचीवरील भांड्यातील भात सर्वप्रथम शिजतो.

कोणतेही मंदिर म्हटले की त्याबरोबर इतर अनेक मंदिरे आसपास असतात. त्याचप्रमाणे जगन्नाथ मंदिरापासून दीड किलोमीटर अंतरावर लोकनाथ महादेवाचे मंदिर असून त्याच्या समोर पार्वतीसागर नावाचे तळे आहे. शंकराने ब्रह्मदेवाचे पाचवे मुख कापून टाकले अशी एक पौराणिक कथा आहे. ते मुख हातात घेऊन भटकत भटकत शंकर भगवान पुरी येथे आल्यानंतर त्या मस्तकाची उत्तरक्रिया केली म्हणून येथे कपालमोचन मंदिर आहे. जवळच यमेश्‍वर मंदिर आहे. शंकराने यमाला येथे बोलावून घेऊन शांत केले होते म्हणून यमेश्‍वर या नावाने हा भाग ओळखला जातो. कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजे भाऊबिजेच्या दिवशी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो.
शहरात निरनिराळ्या कारणांमुळे प्रसिद्ध असलेले असे दहा मठ ऐसपैस पसरलेले आहेत. त्यातील शंकराचार्यांचा गोवर्धन मठ, चैतन्य महाप्रभूंचा गौडीय वैष्णव मताचा राधाकांत मठ तसेच ओरिसा भाषेत भागवत रचणारे संतकवी जगन्नाथदास हे ठळकपणे लक्षात येणारे आहेत.

झाडूवाला राजा
जगन्नाथाच्या रथयात्रेची कित्येक वैशिष्ट्ये आहेत. पुरीच्या गजपती राजघराण्याचा प्रतिनिधी रथयात्रेच्या ठिकाणी आल्यानंतर स्वतःच्या नोकरचाकर, दासदासींना बाजूला ठेवून जमिनीवर उतरतो व सोन्याच्या झाडूने रथयात्रेचा रस्ता साफ करतो. जगन्नाथासमोर नृपनाथाने किती नम्र व्हायचे असते त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.
जुन्या काळातील एक कथा अशी आहे की, गजपती घराण्याच्या राजाने शेजारच्या राज्याच्या राजकन्येला विवाहासाठी मागणी घातली तेव्हा त्या राजकन्येने मी झाडूवाल्याशी विवाह करणार नाही असे सांगून नकार कळवला. हे ऐकून पुरीच्या राजाला संताप आला व त्याने सेना पाठवून शेजारच्या राजाचा पराभव केला तरीही त्याचे राज्य त्याला परत केले व राजकन्येला आपल्या प्रधानाच्या ताब्यात दिले आणि सांगितले की, उद्या सकाळी हिच्या नजरेला जो झाडूवाला पडेल त्याच्याशी विवाह करून टाक. राजाचा प्रधान बुद्धिमान होता. त्याने एक युक्ती केली. सकाळी राजा जिथे फिरायला जातो तिथे तो राजकन्येला घेऊन आला व राजाला म्हणाला, तिच्या योग्यतेला शोभेल असा तू एकमेव झाडूवाला आहेस. प्रधानजीचे चातुर्य ओळखून राजाने त्या राजकन्येशी विवाह केला.

अक्षुण्ण परंपरा
जगन्नाथाचे मंदिर हे जगातील सर्वात मोठे कृष्णमंदिर आहे. तशीच रथयात्राही जगप्रसिद्ध आहे. या रथयात्रेच्या दरम्यान पुरीनगरीतील रहिवासी घरात देवपूजा करत नाहीत. सर्वजण अमंगळ भेदाभेद विसरून रथ ओढतात. रथचक्राच्या खाली पडून मरण पावल्यास मोक्ष मिळतो असा विश्‍वास असल्यामुळे रथासमोर उडी घेऊन जीवन संपवणार्‍यांचीही पूर्वी खूप संख्या असायची. जणू जगन्नाथाची रथयात्रा यासाठीच प्रसिद्ध आहे असे मानून यात्रेची जगभर बदनामी करण्याचा इंग्रजांनी प्रयत्न केला होता. आता ही प्रथा आपोआपच बंद पडलेली आहे.

जगन्नाथ या नावातच सर्वकाही येते. तो जगाचा नाथ आहे. त्याचा रथ ओढला जातो तेव्हा कोण किती शक्ती लावतो याचा पत्ता लागत नाही. म्हणूनच संसाराच्या गाड्याला जगन्नाथाचा रथ म्हटले जाते. माणूस जे काही प्रयत्न करतो ते सर्व तो एकटा करत नसतो तर तो जगन्नाथाचा रथ ओढत असतो. त्यात कोणाचा किती वाटा असेल हे सांगता येत नाही. चैतन्य महाप्रभूनी ‘हरी बोल’ हा आदेश सर्वांना दिला व ‘हरे रामा हरे कृष्णा’ हा गजर पूर्व भारतातील भजनी मंडळीच्या तोंडी घातला. यंदा अडचणी आलेल्या असल्या तरी स्थानिक मंडळीनी ही परंपरा अक्षुण्ण चालू ठेवली याबद्दल त्यांचे आभार मानलेच पाहिजे.