कोरोना असूनही यंदा ‘इफ्फी’ ला चांगला प्रतिसाद

0
247

>> आयोजकांचा दावा; १६ ते २४ दरम्यान होणार आयोजन

दरवर्षीप्रमाणे यंदा गोव्यात होणार असलेल्या ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (इफ्फी) प्रतिनिधी नोंदणीला चांगला प्रतिसाद लाभत आहे, अशी माहिती गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सतीजा यांनी काल दिली.

येत्या १६ जानेवारी ते २४ जानेवारी २०२१ दरम्यान ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाते. परंतु, कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर यावेळी इफ्फीचे आयोजन पुढे ढकलण्यात आले आहे. इफ्फीसाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली जात आहे. इफ्फीसाठी प्रतिनिधी नोंदणीला सिने व्यावसायिक आणि चित्रपटप्रेमींकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, दरवर्षीपेक्षा यंदाच्या महोत्सवास गोव्याबाहेरून येणार्‍या प्रतिनिधींचा प्रतिसाद कमी मिळण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

कोकणी मराठी चित्रपटांच्या
प्रिमियर शोचे आयोजन
५१ व्या इफ्फीमध्ये गोव्यातील कोकणी, मराठी फीचर, नॉन फीचर फिल्मसाठी खास प्रिमिअर शोचे आयोजन केले जाणार आहे. गोव्यातील फिल्म निर्मितीला उत्तेजन देण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. या विभागासाठी प्रवेशिका ४ जानेवारी २०२१ पर्यत स्वीकारण्यात येणार आहेत. यासंबंधीची सविस्तर माहिती गोवा मनोरंजन संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे कळविण्यात आले आहे.