कोरोना ः ७ मृत्यू, ३७४ नवे बाधित

0
103

>> एकूण बळी २३६, सध्याचे रुग्ण ४,७५४, एकूण रुग्ण २०,८२९, कोरोनामुक्त १५,८३९

राज्यातील कोविड प्रयोगशाळेत १२७४ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी काल करण्यात आली असून ३७४ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण जास्तच आहे. तथापि, स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी कमी करून रुग्णसंख्या कमी असल्याचे दाखविले जात आहे. राज्यात आणखी ७ रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोना बळींची संख्या २३६ एवढी झाली आहे. मागील सहा दिवसांत ४४ जणांचा बळी गेला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २०,८२९ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ४,७५४ एवढी झाली आहे.

आणखी सात मृत्यू
राज्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. सप्टेंबरच्या सहा दिवसांत ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. वाडे वास्को येथील ४२ वर्षांचा पुरुष, भाटले-पणजीत ७० वर्षांच्या पुरुष रुग्णांचा मृत्यू त्यांना इस्पितळात दाखल केल्यानंतर सहा तासांत झाला. डिचोली येथील ६५ वर्षाच्या पुरुष रुग्णाचा इस्पितळात दाखल केल्यानंतर केवळ अकरा तासांत मृत्यू झाला. डिचोली येथील ६० वर्षांचा पुरुष रुग्ण, पर्वरी येथील ७५ वर्षांचा पुरुष रुग्ण, सांकवाळ येथील ५५ वर्षांची महिला रुग्ण, शिरोडा येथील ६७ वर्षांच्या पुरुष रुग्णाचे निधन झाले आहे.

५५८ कोरोनामुक्त
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह ५५८ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १५,८३९ एवढी झाली आहे. आरोग्य खात्याकडून ११०२ स्वॅबचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेत २४१ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.

तिसवाडीत ४९० रुग्ण
तिसवाडी तालुक्यात कोरोनाचे ४९० रुग्ण आहेत. पणजीत उच्च आरोग्य केंद्राच्या कक्षेत २२४, खोर्ली केंद्र परिसरात ११९ आणि चिंबल केंद्र परिसरात १४७ कोरोना रुग्ण आहेत.

बार्देशात ९७२ रुग्ण
बार्देश तालुक्यातील विविध आरोग्य केंद्राच्या कक्षेत ९७२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. म्हापसा येथे २३५, हळदोणा येथे ११६, कांदोळी येथे ६१, कोलवाळ येथे १५१, शिवोली येथे १२५ आणि पर्वरी येथे २८४ रुग्ण आहेत.

पेडणे येथे २८० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. डिचोली तालुका आरोग्य केंद्राच्या कक्षेत ४५१ रुग्ण आहेत. वाळपई आरोग्य केंद्राच्या कक्षेत १५६ रुग्ण आहेत. फोंडा तालुक्यातील विविध भागात ६१२ रुग्ण, धारबांदोडा तालुक्यातील विविध भागात ९०, केपे तालुक्यात १९० कोरोना रुग्ण आहेत. मुरगाव तालुक्यात ४०९ रुग्ण आहेत.
सासष्टी तालुक्यात ७३७ रुग्ण आहेत. सांगे तालुक्यात १८८ रुग्णाचा समावेश आहे. त्यात सांगे येथे ६७ रुग्ण आणि कुडचडे येथे १२१ रुग्णांचा समावेश आहे.