राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर घरी निगराणीखालील लोकांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील दोन दिवसात २७० लोकांना घरी निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. राज्यात घरी निगराणीखाली ठेवलेल्या लोकांची संख्या १२६२ वर पोहोचली आहे. तसेच सरकारी निगराणीखाली १९८ व्यक्तींना ठेवण्यात आले आहे.
राज्यात आत्तापर्यंत ७ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली असून परदेशातून आलेल्या ६ व्यक्तीना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच विदेशातून आलेल्या एका कोरोना रुग्णाच्या बंधूला कोरोनाची बाधा झालेली आहे. राज्यात आतापर्यंत १२० जणांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या खास कोरोना आयसोलेशन वॉर्डात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.
राज्यात कोरोना संशयितांच्या नमुन्याची तपासणीची सोय फोंडा, म्हापसा, मडगाव येथे करण्यात आली असून तपासणीसाठी चाचणी मशीन आणि जलद तपासणी कीट्सची व्यवस्था करण्यात आली आहे.
घरी निगराणीखाली ठेवलेल्या व्यक्तीपासून नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. घरी निगराणी ठेवलेल्या व्यक्तीची नागरिकांना माहिती व्हावी म्हणून घरी निगराणीखाली ठेवलेल्या व्यक्तीच्या घरावर खास स्टिकर्स लावण्यात येत आहेत. तसेच घरी निगराणीखाली व्यक्तीच्या हालचालीवर पाळत ठेवण्यासाठी जीपीएस आधारित कोविड शोधक या ऍपचा वापर केला जात आहे.
कोविड १९ अंतर्गत आत्तापर्यत सुमारे पाचशे पेक्षा जास्त नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी दिली.
कोविड१९ च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सामाजिक आरोग्य सर्वेक्षण करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारी पथकांकडून घरोघरी भेटी देऊन सर्वेक्षण केले जाणार आहे.
राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूसाठी घराबाहेर पडावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना सोशल डिस्टंसचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे.