>> विषाणू विरोधातील लढा कायम राखणार ः सावंत
केंद्र सरकारने देशभरातील कोरोना विषाणूच्या संदर्भात जाहीर केलेल्या वर्गीकरण अहवालांमध्ये गोवा राज्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. राज्यात कोरोना विषाणूच्या विरोधातील लढा यापुढेही कायम राखला जाणार असून कोरोना फ्रंट लाइन वॉरियर्स आणि नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल केले.
केंद्र सरकारने विविध राज्यातील कोरोना विषाणूचा फैलाव, उपाययोजना, रुग्ण स्थिती आदींबाबतच्या एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन प्रत्येक राज्यातील जिल्ह्याचे रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशा तीन गटांमध्ये वर्गीकरण केले जाहीर केले आहे. या वर्गीकरणामध्ये गोवा राज्यातील दोन्ही जिल्ह्यांचा ग्रीन झोनमध्ये समावेश असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
गोवा राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेले सात रुग्ण आढळून आले होते. राज्यातील सर्व कोरोनाबाधित बरे झाले आहेत. त्यातील ६ जणांना होम क्वारंटाईन केले आहे. तर, एक सरकारी क्वारंटाईन सुविधेमध्ये आहे. राज्यात ३ एप्रिलनंतर एकही कोरोनाची बाधा झालेला रुग्ण आढळून आलेला नाही.
राज्यात कोरोना विषाणूच्या सामाजिक फैलाव झाला नाही. विदेशातून आलेल्या सहाजणांना कोरोना विषाणूची बाधा झाली. तसेच, विदेशातून आलेल्या एका व्यक्तीच्या भावाला कोरोना विषाणूची बाधा झाली. या सर्वांवर वेळीच उपचार करून कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आणण्यात आली आहे.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुमारे दोन हजार नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. आत्तापर्यत १९७ कोरोना संशयितांवर उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे.
राज्य सरकारने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण केले आहे. त्यात सुमारे साडे चार लाख लोकांची माहिती संकलित करण्यात आली. श्वासोच्छवास घेण्याबाबत तक्रार केलेल्या ५ हजार लोकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.