कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध

0
12

>> केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांचे लोकसभेत निवेदन; खबरदारीच्या उपायांची दिली माहिती

चीनसह अन्य देशांत पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने भारताची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर, लसीकरण पूर्ण करण्याबरोबरच अन्य उपाययोजना करण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी राज्यांना दिला होता. तसेच काल केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी संसेदत कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. विमानतळांवर प्रवाशांची कोरोना चाचणी सुरू केली आहे. केंद्र सरकार कोरोनाला रोखण्यासाठी कटिबद्ध असून, योग्य पावले उचलत आहोत, असे मांडवीय यांनी लोकसभेत सांगितले.

जास्तीत जास्त कोरोना रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्याची सूचनाही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे. जेणेकरुन चीनमध्ये रुग्णवाढीस कारणीभूत ठरणार्‍या बीएफ ७ सारख्या उपप्रकारांची माहिती मिळू शकेल, असेही मांडवीय यांनी सांगितले.

दरम्यान, जगभरात कोरोनाचा प्रभाव दिसत आहे; मात्र भारतात मात्र सातत्याने कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होत आहे. भारतात दररोज सरासरी १५३ नवीन प्रकरणे नोंदवली जात आहेत.

नववर्षाच्या स्वागत कार्यक्रमांवर निर्बंध शक्य?
सण आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी लोकांनी मास्क घालावेत, सोशल डिस्टन्सिंग नियम पाळण्याच्या सूचना राज्य सरकारांना दिल्या आहेत, असे सांगतानाच केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यावेळी नववर्षाच्या स्वागतावर निर्बंध येऊ शकतात, असे संकेत दिले. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यांनी सतर्क राहून मास्क घालणे, सॅनिटायझर वापरणे, स्वच्छतेची काळजी घेणे आणि सोशल डिस्टन्सिंग राखणे यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, असेही ते म्हणाले.