>> आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे आवाहन; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक
राज्यात कोविड-१९ मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर भर दिला जाणार आहे. राज्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तर सावधगिरी बाळगावी, असे आवाहन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी काल केले.
राणे यांनी कोविड-१९ महामारीवर विचारविनिमय करण्यासाठी आरोग्य अधिकार्यांसोबत काल बैठक घेतली. राज्यातील आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क केली जाणार आहे. तसेच, कोविड उपचाराच्या विषयावर २७ डिसेंबरला पुन्हा ‘मॉक ड्रिल’ केले जाणार आहे, असे मंत्री राणे यांनीसांगितले.
नागरिकांनी सावधगिरीचा उपाय म्हणून मास्क वापरला पाहिजे. ज्या नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. त्यांनी लस घ्यावी, तसेच बुस्टर डोस घ्यावा, असे आवाहनही राणेंनी केले.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठकीत सहभाग घेतला. या बैठकीत विविध देशात वाढणार्या कोरोनाबाधितांबाबत माहिती देण्यात आली. त्याचबरोबर कोविड मार्गदर्शक तत्त्वांबाबत सूचना देण्यात आल्या, असेही राणेंनी सांगितले.
गोवा हे पर्यटन स्थळ असल्याने कोरोनाला वेळीच रोखण्यासाठी भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उपाययोजना हाती घेतली जाणार आहे. नागरिकांनी संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे लक्ष द्यावे. कोविडचा संशय असल्यास घरीच रहा आणि स्वतःला आणि इतरांना या विषाणूपासून सुरक्षित ठेवा, असेही राणे म्हणाले.
राज्यात सक्रिय रुग्णसंख्या १५ वर
राज्यात मागील चोवीस तासात नवीन ४८७ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यात नवीन १ कोरोनाबाधित आढळून आला. परिणामी राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या १५ एवढी झाली आहे.