कोरोनामुळे राज्यात बळींचे शतक पार

0
157

>> आणखी ५ मृत्यू, बळींची संख्या १०४

>> नवीन ३०० पॉझिटिव्ह, सध्याची रुग्णसंख्या ३७६०

राज्यात कोरोना विषाणूची परिस्थिती गंभीर बनली आहे. राज्यात काल कोरोनामुळे झालेल्या ५ मृत्यूंमुळे कोरोना रुग्णांच्या बळींचे शतक पूर्ण झाले असून कोरोना बळींची संख्या १०४ वर पोहोचली आहे. नवे ३०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सध्याची संख्या ३७६० झाली आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ११,६३९ एवढी झाली आहे.
राज्यात २९ जुलैपासून सुरू झालेले कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे.

सध्या दर दिवशी साधारण तीनच्या आसपास रुग्णांचा मृत्यू होत आहे. मागील १६ दिवसात ५९ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. इतर आजार असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर योग्य ते उपचार होत नसल्याने बळीची संख्या वाढत आहे.

पणजीत आणखी एक बळी
वास्को येथील एसएमआरसी या खासगी इस्पितळामध्ये उपचार घेणार्‍या पणजीतील ६० वर्षे वयाच्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णाचे शनिवारी निधन झाले. यापूर्वी आल्तिनो येथील एका २९ वर्षाच्या युवकाचे कोरोना विषाणूने निधन झाल. पणजीत कोरोना बळीची संख्या २ झाली आहे.
चिंबल येथील ३६ वर्षीय पुरुष रुग्णाचे बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळामध्ये १४ ऑगस्टला निधन झाले. फोंडा येथील ७० वर्षीय महिला रुग्णाचे बांबोळी येथील गोमेकॉमध्ये शनिवारी निधन झाले. दवर्ली येथील ३९ वर्षीय पुरुष रुग्णाचे मडगाव येथील कोविड इस्पितळामध्ये शनिवारी निधन झाले. घोगळ मडगाव येथील ६६ वर्षाच्या पुरुष रुग्णाचे कोविड इस्पितळामध्ये काल निधन झाले.

२६९ जण कोरोनामुक्त
राज्यातील कोरोनाबाधित आणखी २८७ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७७७५ एवढी झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह सौम्य लक्षणे असलेल्या १२७ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. होम आयसोलेशनखालील रुग्णांची संख्या १९५१ एवढी झाली आहे.

गोमेकॉत ९७ संशयित
राज्यात मांगूर हीलमधून कोरोना रूग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली होती. आत्ता राज्यातील सर्वच भागात कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहेत. बांबोळी येथे जीएमसीच्या खास वॉर्डात कोरोना संशयित म्हणून ९७ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत. बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेने १७३६ स्वॅबच्या नमुन्याचे अहवाल जाहीर केले. प्रयोगशाळेत २४३ स्वॅबचे अहवाल प्रलंबित आहेत. आरोग्य खात्याने १४८२ स्वॅबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत.

पणजीत नवे ९ रुग्ण
पणजीत परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. पणजीत आणखी ९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून कोरोना रुग्णांची एकूण संख्या १९३ एवढी झाली आहे. पणजी महानगरपालिकेने विविध भागांत निर्जंतुकीकरणाचे काम सुरूच ठेवले आहेत. पणजीतील राधा बिल्डिंग, सांतइनेज, करंजाळे, कांपाल, मिरामार, मळा आदी भागांत रुग्ण आढळले आहेत.

चिंबलमध्ये नवीन २७ रुग्ण
पणजीच्या जवळील चिंबलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढत चालली आहे. चिंबलमध्ये नवे २७ कोरोना रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या २५४ एवढी झाली आहे.

उत्पल पर्रीकर इस्पितळात
कोरोना विषाणूची बाधा झालेले माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर इस्पितळामध्ये दाखल झाले आहेत. उत्पल यांनी एका ट्वीट संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचारांसाठी इस्पितळामध्ये दाखल झाल्याचे संदेशात म्हटले आहे.

डॉक्टर कोरोना बाधित
गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड फ्रंटलाईन डॉक्टर आणि मायक्रोबायलॉजीचे साहाय्यक प्रोफेसर डॉ. मारिया पिंटो यांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी सांगितले.

म्हापशात आणखी एकाचा बळी
म्हापसा शहरात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह ६३ वर्षीय महिलेचा बळी गेला तर काल दिवसभरात १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. गावसावाडा येथील ६३ वर्षीय महिलेचा बळी गेला असून म्हापसा शहरात कोरोनामुळे एकूण ५ बळी गेले आहेत. आतापर्यंत २९० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बाधित झाले आहेत.

चेतन चौहान यांचे कोरोनामुळे निधन
भारताचे माजी क्रिकेटपटू आणि उत्तरप्रदेशचे मंत्री चेतन चौहान यांचे काल रविवारी कोरोनाने निधन झाले. त्यांना गुरुग्राममधील मेदांता इस्पितळात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

गेल्या महिन्यात चेतन चौहान यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यातून त्यांची प्रकृती सुधारत होती. परंतु त्यांना मूत्राशयाचा आणि रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने शुक्रवारी रात्री त्यांना व्हेंटिलेटरमध्ये ठेविण्यात आले होते. ७३ वर्षीय चेतन यांनी १९६९ मध्ये आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. १९७८ मध्ये त्यांनी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भारताकडून त्यांनी ४० कसोटी आणि ७ वनडे सामने खेळले. वनडे क्रिकेटमध्ये त्यांनी १५३ धावा केल्या आहेत.

रणजी क्रिकेटमध्ये दिल्ली आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेले होते. त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध १९८१मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. निवृत्तीनंतर काही काळ ते क्रिकेट समालोचक म्हणून काम केले. यासोबतच दिल्ली राज्य क्रिकेट संघटनेच्या विविध पदांवर त्यांनी काम पाहिले आहे.