>> राज्यात गेल्या चोवीस तासांत ६ बळींसह ४२८ पॉझिटिव्ह
राज्यात चोवीस तासांत नवे ४२८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून ६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने ३५ हजारांचा टप्पा पार केला असून एकूण रूग्णसंख्या ३५ हजार ३२८ एवढी झाली आहे. सध्याच्या रुग्णांची संख्या ४८३९ एवढी झाली आहे. राज्यात कोरोनामुळे आत्तापर्यंत ४५६ जणांचा बळी गेला आहे.
६ जणांचा मृत्यू
राज्यात आणखी ६ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गोमेकॉमध्ये तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. मडगाव येथील ईएसआय इस्पितळात २ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका रुग्णाला हॉस्पिसियो इस्पितळामध्ये आणण्यात आल्यानंतर केवळ तासाभरात मृत्यू झाला आहे. काणकोण येथील ७० वर्षांचा पुरुष, मेरशी येथील ७० वर्षांचा पुरुष, पैठण बार्देश येथील ७९ वर्षांची महिला, साल्वादोर द मुंदमधील ४५ वर्षांची महिला, सुकूर बार्देश येथील ७३ वर्षांची महिला आणि कुडचडे येथील ६७ वर्षांच्या महिला रुग्णाचे निधन झाले आहे.
राज्यात आत्तापर्यंत २ लाख ६० हजार ९९५ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. कोविड प्रयोगशाळेत चोवीस तासात १२१८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.
५०६ कोरोनामुक्त
राज्यात चोवीस तासांत ५०६ कोरोना रुग्ण बरे झाले असून कोरोना रुग्ण बरे झालेल्या संख्येने ३० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३० हजार ०३३ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.०१ टक्के एवढे आहे.
कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या २६२ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. होम आयसोलेशनखालील रुग्णांची संख्या १६,७४१ एवढी झाली आहे. नवीन ९२ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत.
राज्यातील दोन्ही जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमधील सुमारे ५० टक्के खाटा रिक्त आहेत. उत्तर गोव्यातील कोविड केअर सेंटरमधील ५४५ खाटांपैकी २८१ खाटा रिक्त आहेत. तर दक्षिण गोव्यातील कोविड सेंटरमधील १००६ खाटांपैकी ६५० खाटा रिक्त आहेत.
पणजीतील २२९ रुग्ण
पणजीत दररोज नवनवे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. मागील दोन दिवसांत ३९ रुग्ण आढळून आले आहेत. पणजीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २२९ एवढी झाली आहे. पणजीत २ रोजी नवे २७ रुग्ण आणि ३ रोजी नवे १२ रुग्ण आढळून आले आहेत.
मडगाव येथे सर्वांधिक ३७३ रुग्ण आहेत. पर्वरी येथे २९७ रुग्ण, साखळी येथे २८६ रुग्ण, फोंडा येथे २७१ रुग्ण, म्हापसा येथे २४७ रुग्ण, वास्को येथे २४४ रुग्ण, पणजी २२९ रुग्ण, शिवोली येथे २२१ रुग्ण, चिंबल येथे २०४ रुग्ण आहेत.
खोर्ली येथे १९७ रुग्ण, कुठ्ठाळी येथे १६८ रुग्ण, पेडणे येथे १६६ रुग्ण, डिचोली येथे १६० रुग्ण, वाळपई येथे १५९ रुग्ण, कांदोळी येथे १५५ रुग्ण, काणकोण येथे १४७ रुग्ण, सांगे येथे ११३ रुग्ण, कुडचडे येथे ११० रुग्ण, हळदोणा येथे १०८ रुग्ण, कोलवाळ येथे १०६ रुग्ण आहेत. इतर ठिकाणची रुग्ण संख्या शंभरांपेक्षा कमी आहे.