राज्यात नवे ४३८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून आणखी ६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोना बळींची एकूण संख्या ४०७ झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३२,३९६ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ४९१७ एवढी झाली आहे.
राज्यात मागील दोन दिवसांपासून कोविड चाचण्यांच्या तपासणीचे प्रमाण कमी झाल्याने कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी दिसून येत आहे. राज्यात दोन हजार आणि जास्त स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी केल्यास पाचशे, सहाशेवर रुग्ण आढळून येतात. चोवीस तासांत केलेल्या १४५२ स्वॅबच्या नमुन्यांच्या तपासणीत ४३८ नमुने पॉझिटिव्ह आढळले. राज्यात आत्तापर्यंत २ लाख ५१ हजार ०३३ स्वॅबच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली असून त्यात ३२ हजार ३९६ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
६१२ कोरोनामुक्त
चोवीस तासांत आणखी ६१२ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २७ हजार ०७२ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ८३.५६ टक्के एवढी आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नवीन ३३६ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. होम आयसोलेशनखालील रुग्णांची संख्या १४ हजार ९२७ एवढी झाली आहे.
सहा जणांचा बळी
राज्यात आणखीन ६ जणांचा बळी गेला आहे. बांबोळी येथे गोमेकॉमध्ये ३ रुग्णांचा मृत्यू झाला. मडगाव येथील ईएसआय इस्पितळात एका रुग्णाचा मृत्यू झाला. दक्षिण गोव्यातील एका खासगी इस्पितळात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर, सांगे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका कोरोना रुग्णाचे निधन झाले आहे. बेस्तोडा म्हापसा येथील ५० वर्षांचा पुरुष, खोर्ली म्हापसा येथील ६४ वर्षांचा पुरुष, काणका वेर्ला येथील ६३ वर्षांचा पुरुष, सासष्टीतील ६८ वर्षांचा पुरुष, हळदोणा येथील ५० वर्षांचा पुरुष आणि सांगेतील ५९ वर्षार्ंच्या पुरुष रुग्णाचे निधन झाले.
पर्वरीतील कोरोना रुग्णांचा संख्या ४०५ वर पोहोचली आहे. साखळी येथील रुग्ण संख्या ३६५ झाली आहे. मडगाव येथील रुग्ण संख्या ३५० झाली आहे.
पोलीस महासंचालक बाधित
पोलीस महासंचालक मुकेशकुमार मीना यांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. ते उपचारार्थ दोनापावल येथील एका खासगी इस्पितळात दाखल झाले आहेत.
पणजीत दोन दिवसांत नवे ५८ रुग्ण
पणजी महानगरपालिका क्षेत्रात दोन दिवसांत नवे ५८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. पणजीतील एकूण रुग्णसंख्या २९१ झाली आहे. महानगरपालिका क्षेत्रात दररोज नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. रविवार दि. २७ रोजी ३९ आणि सोमवार दि. २८ रोजी १९ नवे कोरोना रुग्ण आढळले. भाटले, टोक, दोनापावल, सांतइनेज, पाटो-रायबंदर, आल्तिनो, मिरामार, करंजाळे, फोंडवे रायबंदर, पणजी दादा वैद्य रस्ता आदी भागात नवे रुग्ण आढळून आले आहेत.