कोरोनाने काल एकही बळी नाही

0
117

काल मंगळवारी राज्यात कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तसेच गेल्या चोवीस तासांत कोरोनाचा संसर्ग झालेले १५९ रुग्ण सापडले. त्यामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या एकूण कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४८ हजार ९३५ एवढी झाली आहे. राज्यात कोरोनाचे सध्याचे रुग्ण १३१० एवढे आहेत अशी माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत ७०१ जणांचा मृत्यू झाला आहे.
काल दिवसभारत १४६ जण कोरोनामुक्त झाले असून कोरोनामुक्त झालेल्यांची राज्यातील संख्या ४६,९३६ झाली आहे.

आतापर्यंत ३,६३,०६२ एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे. कोरोना संसर्ग झालेल्या १३,६३४ जणांनी राज्यातील इस्पितळात उपचार घेतले आहेत. तर २५,३२३ जणांनी गृहविलगीकरणात राहून उपचार घेतले आहेत. रुग्ण बरे होण्याची राज्याची टक्केवारी ९५.१८ टक्के एवढी आहे.
सीरमची लस २५० रुपयांत?
करोना प्रतिबंधक लशीच्या पुरवठ्याचा करार करण्यासंदर्भात पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची केंद्र सरकारबरोबर चर्चा सुरू आहे. भारतात सीरमने कोविड प्रतिबंधात्मक तयार केलेल्या लशीला ‘कोविशिल्ड’ असे नाव दिले असून ‘कोविशिल्ड’च्या प्रत्येक डोसची किंमत २५० रुपये असू शकते. लशीच्या किंमतीसंदर्भात सीरमबरोबर सरकारची चर्चा सुरू आहे. ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने मिळून विकसित केलेल्या या लशीचे उत्पादन भारतात सीरम इन्स्टिट्यूट करत आहेत. या लसीचे आतापर्यंत काही कोटी डोस बनून तयार झाले आहेत. सीरमने कोविशिल्ड लशीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे.
यूकेमध्ये या लशीला मान्यता मिळाल्यानंतर भारतातही कोविशिल्डला मान्यता मिळू शकते.

ब्रिटनमध्ये लशीकरण सुरू

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या लशीकरणाला सुरुवात झाली आहे. ब्रिटनने फायझर बायोएनटेक लशीच्या वापराला मंजुरी दिली आहे. त्यामुळे काल मंगळवारपासून ब्रिटनमध्ये लशीकरण सुरू झाले आहे. ९० वर्षीय वृद्धेला पहिली लस देण्यात आली. आहे. ही महिला फायझर/बायोएनटेक कोविड लस घेणारी जगातली पहिली महिला ठरली आहे. मार्गारेट कीनन असे या ९० वर्षीय वृद्धेचे नाव आहे. ही लस ९५ टक्के प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे.