कोरोनाच्या ‘जेएन.1′ उपप्रकाराचे राज्यात 19 रुग्ण

0
8

कोविडच्या नव्या उत्सर्जित जेएन.1 विषाणूचा संसर्ग झालेले 21 रुग्ण देशभरात सापडले असून, त्यापैकी तब्बल 19 रुग्ण हे गोव्यात सापडल्याने तो राज्यासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. अन्य प्रत्येकी 1-1 रुग्ण हे महाराष्ट्र व केरळ ह्या राज्यात सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर काल केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी एक बैठक घेत देशभरातील कोविड स्थितीचा आढावा घेतला. त्यात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्यमंत्री आणि अधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीत गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सुद्धा सहभाग नोंदवला. तसेच कोविड स्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर काय उपाययोजना करावी त्याबाबतही संबंधितांशी चर्चा केली. कोविडच्या नव्या उत्सर्जित जीवाणूच्या पार्श्वभूमीवर आता दक्ष राहण्याची गरज आहे, असे मांडवीय यांनी सांगितले.
कोविडचे चांगल्या प्रकारे नियोजन करता यावे यासाठी केंद्र व राज्य यांच्यात चांगल्या समन्वयाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कोविडचा काळ अजून संपलेला नसून, आगामी परिस्थितीबाबत सगळ्यांनीच दक्ष राहण्याची गरज असल्याचे मांडवीय यांनी नमूद केले.

देशात नवे 614 कोरोना रुग्ण
गेल्या 24 तासांत देशात 614 नवीन कोविड प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यापैकी 242 केरळमधील आहेत. या कालावधीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात 2311 सक्रिय कोविड प्रकरणे आहेत. आतापर्यंत 5,33,321 लोकांनी आपला जीव गमावला आहे.

चिंतेचे कारण नाही : डॉ. सूर्यवंशी
कोविडच्या नव्या उत्सर्जित जेएन.1 चा संसर्ग झालेले 19 रुग्ण गोव्यात सापडल्याच्या वृत्ताला काल गोव्याचे साथींच्या रोगांचे तज्ज्ञ डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांनी दुजोरा दिला; मात्र घाबरून जाण्याचे अथवा चिंता करण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संसर्ग झालेल्या सगळ्या रुग्णांना सात दिवसांचा काळ पूर्ण केलेला असून, ते आता पूर्णपणे बरे झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.