‘कोरोना’च्या उच्चाटनासाठी काही भरीव करा ना!

0
145
  • शंभू भाऊ बांदेकर

श्‍वसनाचा त्रास होणे, ताप, कफ, धाप लागणे आणि श्‍वासोच्छ्वास मंदावणे ही या विषाणूंमुळे होणार्‍या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. अधिक गंभीर रुग्णांमध्ये संसर्गामुळे न्यूमोनियाही होऊ शकतो. शिवाय गंभीर आणि तीव्र स्वरूपाचे श्‍वसनविषयक त्रास आणि मूत्रपिंड निकामी होत शेवटी मृत्यू असे परिणाम दिसून येतात,

चीनमध्ये कोरोनाच्या विषाणूंचे थैमान चालूच असून या विषाणूंचा संसर्ग झाल्याने मृतांची संख्या हजाराच्या घरात पोचली आहे, तर चीनमध्ये या विषाणूंचा संसर्ग झालेल्यांची संख्या ३५ हजारांच्या घरात पोचली आहे.

चीननंतर जपानमध्येही कोरोनोचा संसर्ग झालेला रुग्ण आढळला आहे, तर आपल्या भारतामध्येही अनेक ठिकाणी या विषाणूंचा प्रादुर्भाव झालेले रुग्ण आढळले असून यात प्रामुख्याने केरळ राज्याचा समावेश आहे. गोव्यातही काही संशयितांना क्वारंटाईन करण्यात आले होते. कोरोना व्हायरसमुळे भीती जशी वाढली आहे, तशी दक्षता घेण्यावरही भर दिला जात असून संपूर्ण जगालाच ‘कोरोनाच्या उच्चाटनासाठी काहीतरी भरीव करा ना’ अशी हाक देण्याची वेळ आली आहे.

रुग्णांमधून घेतलेल्या या विषाणूंच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. त्यानंतर चीनचे आरोग्याशी संबंधित अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटनेने हा कोरोना व्हायरस असल्याचे प्रतिपादन केले. कोरोनो विषाणूचे अनेक प्रकार आहेत. मात्र, येथील सहा प्रकारच्या विषाणूंची माणसांना बाधा होऊ शकते, असे आढळून आले. मात्र, नव्या विषाणूंचा शोध लागल्यानंतर संक्रमित होणार्‍या कोरोनो विषाणूंची संख्या आता सातवर आली आहे. या नव्या कोरोनो विषाणूंच्या जेनेटिक कोडचे विश्‍लेषण करण्यात आले. कोरोना विषाणूंचा एक प्रकार म्हणजे ‘सार्स.’ हा नवा विषाणू सार्सच्या जवळचा असल्याचे संशोधकांनी केलेल्या विश्‍लेषणात आढळून आले आहे.

गेल्या वर्षाच्या अखेरपासूनच चीनमध्ये एका भयावह तापाची सुरुवात झाली होती, परंतु या वर्षीच्या सुरुवातीपासून हा विषाणू किती भयावह आहे, हे उजेडात आले आणि सर्वत्र भीतीचे सावट पसरले असून दक्षता घेणे फार महत्त्वाचे आहे हे स्पष्ट झाले. चीनच्या ‘वुहान’ या शहरात गेल्या डिसेंबरमध्ये न्यूमोनियाची साथ फैलावली. चीनबरोबरच थायलंड आणि जपान मध्येही या विषाणूंचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाल्यामुळे संपूर्ण जग खडबडून जागे झाले, कारण जागतिकीकरणाच्या या काळात अशा प्रकारच्या साथीही सर्वत्र झपाट्याने पसरतात हे सिद्ध झाले.

या तापाला कारणीभूत असलेल्या आणि ‘चायना कोरोना व्हायरस’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या या विषाणूंचा फैलाव माणसाकडून माणसाला होतो, त्यामुळे साहजिकच रुग्णांना हाताळणारे कर्मचारी आणि डॉक्टर इत्यादींना याचा सर्वाधिक धोका असतो. या विषाणूंची संसर्गाची ताकद एवढी प्रचंड झाली की, सध्या ती जगभरात इतर कोणत्याही आजारांपेक्षा हा आजार भयावह ठरत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे आणि म्हणूनच या रोगाबद्दल भीती वाटणे साहजिकच आहे, पण त्याबरोबर सरकारच्या आरोग्य खात्यासह सर्व संबंधित यंत्रणांनी दक्ष राहणे आवश्यक आहे.

या कोरोनाबाबत थोडे खोलात जाऊन सांगायचे म्हणजे या विषाणूचे नाव ‘कोरोना व्हायरस’ असे असले, तरीही हा एकच एक विषाणू नसून हा विषाणूंचा समूह आहे. या विषाणूंच्या संसर्ग २०१२ पासून लक्षात आला आहे. या विषाणूंच्या समूहाला दोन गटांमध्ये विभाजित केले जाते. मर्स-सीओव्ही आणि सार्स. मर्स म्हणजे मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम. मर्स हा आजार नावाप्रमाणेच मध्य पूर्वेत अथवा पश्‍चिम आशियात आढळला. त्याचा पहिला रुग्ण सौदी अरेबियात २०१२ मध्ये सापडला होता, तर सार्सचा पहिला रुग्ण २००३ मध्ये आशियात सापडला होता आणि तिथून मग हळूहळू जगभर सर्वत्र पसरले होते.

जागतिक आरोग्य संघटनेच्यामते श्‍वसनाचा त्रास होणे, ताप, कफ, धाप लागणे आणि श्‍वासोच्छ्वास मंदावणे ही या विषाणूंमुळे होणार्‍या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. अधिक गंभीर रुग्णांमध्ये संसर्गामुळे न्यूमोनियाही होऊ शकतो. शिवाय गंभीर आणि तीव्र स्वरूपाचे श्‍वसनविषयक त्रास आणि मूत्रपिंड निकामी होत शेवटी मृत्यू असे परिणाम दिसून येतात, असे स्पष्ट केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने या संदर्भात अनेक तातडीच्या बैठका घेतल्या असल्या, तरी या आजाराच्या उद्रेकाला अद्याप आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून जाहीर करण्यात आलेली नाही. त्यांनी या संदर्भात काही मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. उदा. चीनमधील कोणत्याही खास कार्यक्रमादरम्यान पुरेशी आरोग्य विषयक काळजी घेतली जावी, असे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेला राष्ट्रीय आरोग्य कमिशनकडून (नॅशनल हेल्थ कमिशन) मिळालेल्या माहितीनुसार बहुतेक रुग्ण हे ‘हुनाम सी फूड होलसेल मार्केट’ या बाजारपेठेत सतत जाणारे असल्याचे चिनी अधिकार्‍यांना आढळून आले आहे. बाजारपेठेत एक प्रकारचे सागरी खाद्य खाणार्‍यांना या विषाणूंचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर ही बाजारपेठ नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे १ जानेवारीपासून बंद करण्यात आली आहे. ७ जानेवारीला चिनी आरोग्य अधिकार्‍यांना कोरोनो व्हायरसच्या नवीन प्रकाराचा शोध लागला. त्यांनी त्याला ‘नोव्हेल कोरोनो व्हायरस’ किंवा ‘एनसीओव्ही’ असे नाव दिले. तसेच त्यांनी आधीच्या सार्स किंवा मर्स सीओव्हीमुळे मोठ्या प्रमाणात लागण होत असल्याचे दावेही चुकीचे असल्याचे म्हटले आहे. काही का असेना, चीनमधून व्हायरस झालेला हा कोरोनो म्हणजे एक प्रकारे भीतीची दहशत बसविणारा आणि दक्षतेची जाणीव करून देणारा ठरला आहे. यामुळे चीन जात्यात, तर जगाबरोबर आपणही सुपात आहोत.
कोरोनो विषाणूचा प्रादुर्भाव वाढतोय ही गोष्ट खरी आहे, पण त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी, असा इशारा सरकारकडून दिला गेला आहे, हे ठीक आहे. पण आता ‘कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी काहीतरी ठोस व भरीव कराना’ अशी सांगण्याची वेळ आली आहे.