>> राज्यात महामारीचे एकूण ८६ बळी
>> चोवीस तासांत ४१५ बाधित
>> एकूण रुग्णसंख्या ९४४४
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरूच असून कोरोना पॉझिटिव्ह आणखी ६ रुग्णांचे काल निधन झाले. त्यामुळे राज्यातील कोरोना बळींचा आकडा ८६ झाला आहे. राज्यात नवे ४१५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून कोरोना रुग्णांची सध्याची संख्या २८७८ एवढी झाली असून कोरोना रुग्णांची एकूण संख्या ९४४४ झाली आहे.
राज्यात २९ जुलैपासून कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचे दरदिवशी बळी जात आहेत. मंगळवारी आत्तापर्यंतच्या सर्वाधिक ६ बळींची नोंद झाली आहे. यापूर्वी एकाच दिवशी ५ जणांचा बळी गेलेला आहे. दर दिवशी साधारणपणे तीन कोरोना रूग्णांचा जणांचा मृत्यू होत आहे. राज्यातील कोरोना रूग्णांच्या मृत्यूचे सत्र रोखण्यात आरोग्य यंत्रणेला यश प्राप्त झालेले नाही.
गोवा वेल्हा येथील ४५ वर्ष पुरुष, सडा वास्को येथील ७२ वर्षीय पुरुष, मेस्तवाडा वास्को येथील ६८ वर्षीय पुरुष आणि बायणा वास्को येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचे मडगाव येथील कोविड इस्पितळामध्ये उपचार सुरू असताना निधन झाले. बेती येथील ६८ वर्षीय पुरुष रुग्णाचे बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळामध्ये सोमवारी निधन झाले. तर, सडा वास्को येथील ७३ वर्षीय पुरुष रुग्णाचे गोमेकॉमध्ये मंगळवारी निधन झाले. सर्व कोरोना रुग्णांचा को-मॉर्बिड स्थितीमुळे मृत्यू झाला आहे, असे आरोग्य खात्याने दैनंदिन माहिती पत्रकात नमूद केले आहे.
दरम्यान, काल राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह २७२ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६४८० एवढी झाली आहे. बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेत २४५१ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून ८६९ स्वॅबच्या नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. आरोग्य खात्याने २५९० स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.
पणजीत नवे २७ रुग्ण
राजधानी पणजी शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आणखी २७ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या १२२ झाली आहे. आल्तिनो येथे ७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. याठिकाणच्या १४८ जणांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते. करंजाळे, सांतइनेज, आल्तिनो, रायबंदर, दोनापावल, १८ जून रस्ता, मिरामार आदी भागात रुग्ण आढळले आहेत. पणजी पालिकेने कोरोना रुग्ण आढळून आलेल्या विविध भागांचे निर्जंतुकीरण सुरू केले आहे.
चिंबलात नवे २० रुग्ण
चिंबलमध्ये नवे २० रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या १५१ झाली आहे. खोर्ली – ओल्ड गोवा येथे नवे ४ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या ७७ झाली आहे.
मडगावात नवे २५ रुग्ण
मडगाव भागातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. नवे २५ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या २७९ झाली आहे. कुडतरी येथे नवे १३ रुग्ण, कुडचडे येथे ३. कासावलीत ४ रुग्ण, नावेलीत ५ रुग्ण आढळले आहेत.
मुरगावात आतापर्यंत ६० बळी
मुरगाव तालुक्यात कोविड -१९ महामारीमुळे काल मंगळवारी मडगाव ईएसआय इस्पितळात उचपार घेत असलेल्या वास्कोतील तीन ज्येष्ठ नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुरगाव तालुक्यातील कोरोनामुळे बळी गेलेल्यांचा आकडा ६० वर पोहोचला आहे. मंगळवारी वास्को व मुरगाव भागातील मिळून तीनजणांचा मृत्यू झाला. गेल्या दोन आठवड्यापासून वास्कोतील दोन ज्येष्ठ नागरिक व मुरगाव बोगदा येथील जेष्ठ नागरिक कोरोना संक्रमित झाल्याने त्यांना उपचारासाठी मडगाव कोविड इस्पितळात दाखल केले होते.