कोरोनाचे पणजी, चिंबलमध्ये राज्यातील २४ टक्के रुग्ण

0
70

पणजी उच्च आरोग्य केंद्राच्या परिसरात मार्च महिन्याच्या पहिल्या १० दिवसांत नवीन ५९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात चोवीस तासांत नवीन ६९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून नव्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद नाही.
राज्यातील सध्याच्या ६७५ कोरोना रुग्णांपैकी साधारण २३.५५ टक्के कोरोना रुग्ण पणजी, चिंबल परिसरात आहेत.
राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५५,६०७ एवढी झाली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ८०२ एवढी आहे.

कोरोना पॉझिटिव्ह असलेले आणखी ५७ रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत एकूण ५४ हजार १३० रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३४ टक्के एवढे आहे.
चोवीस तासांत नवीन १,४९१ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील ४.६२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या नवीन ७१ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करण्यात आले. दोन प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

दरम्यान, सरकार नियुक्त स्वयंपूर्ण मित्रांनी येत्या शनिवार १३ मार्चला खास कोरोना लसीकरण शिबिराबाबत पंचायत पातळीवर सरपंच, पंचायत सचिव, पंच सदस्य यांच्यामध्ये जनजागृती करावी. या खास शिबिराचा जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा अशी सूचना सरकारतर्फे करण्यात आली आहे.
राज्यातील ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र, उच्च प्राथमिक आरोग्य केंद्रातून करण्यात येणार्‍या लसीकरणाची माहिती लाभार्थींना देण्याची सूचना करण्यात आली आहे.