>> केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट
ब्रिटनमध्ये आढळलेले कोरोना विषाणूचे नवे रूप आतापर्यंत भारतात कोणाच्या शरीरात आढळलेले नसल्याचे काल मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले. भारतात आतापर्यंत कोरोना विषाणूच्या स्ट्रेनमध्ये महत्त्वपूर्ण परिवर्तन झाल्याचे आढळलेले नाही. त्यामुळे सध्या तरी चिंता करण्याची गरज नसल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
आपल्या देशात निर्मिती होत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लशी आणि अन्य देशातील लशींच्या निर्मितीवर सध्यातरी या नव्या स्ट्रेनचा काहीही परिणाम झाला नसल्याचे नीती आयोगाने सांगितले.
दरम्यान, भारतात ब्रिटनहून आलेल्या विमानातील पाच प्रवाशांना कोरोनाची लागण झाली आहे. जे प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आहेत, त्यांच्यामध्ये नवीन स्ट्रेन आहे का? ते अजून स्पष्ट झाले नसून तपासणी आणि संशोधनानंतरच ते स्पष्ट होईल. लंडनमध्ये या नव्या स्ट्रेनचे अनेक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सरकारकडून सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात येत असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.
केंद्राकडून नवी नियमावली
ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवे रूप आढळल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. नव्या नियमानुसार, यूकेहून येणार्या प्रवाशांपैंकी नव्या करोना स्ट्रेनसहीत संक्रमित आढळलेल्या रुग्णांना वेगळ्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात येणार आहे. याशिवाय कोरोना संक्रमित आढळलेल्या सहप्रवाशांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येईल. तसेच सरकारने कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता ब्रिटनहून येणार्या विमानांसाठी नवी एसओपी जाहीर केली आहे. यात विमानतळावरच आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे. नवा विषाणू आढळलेल्या रुग्णाची उपचारानंतर १४ दिवसांनी पुन्हा कोरोना चाचणी होईल. १४ व्या दिवशीही तो पॉझिटिव्ह आढळल्यास त्याची दोनवेळा निगेटिव्ह चाचणी येईपर्यंत चाचणी सुरू राहील. आरटी-पीसीआर चाचणीत निगेटिव्ह आढळणार्या प्रवाशांना घरी क्वारंटाइन करण्यात येईल. प्रवासी ज्या शहरात विमानाने उतरले त्या शहरातून दुसर्या शहरात गेले असतील तर त्याची माहिती संबंधित जिल्हा आणि राज्यांना दिली जाईल. अशा प्रवाशांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांना स्वतंत्र आयसोलेशन सेंटरमध्ये इन्स्टिट्युशनल क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येईल.
सहा आठवड्यात लस
तयार करू ः बायोएनटेक
कोरोनाच्या संसर्गाच्या नव्या विषाणूमुळे जगभरात खळबळ माजलेली असतानाच बायोएनटेकने नव्या विषाणूवर प्रभावी ठरणार लस सहा आठवड्यात तयार करता येणार असल्याची घोषणा केली आहे.
बायोएनटेकने विकसित केलेल्या लशीचे उत्पादन फायजर कंपनीने केले असून ब्रिटन, अमेरिकेत या लशीच्या आधारे लशीकरण सुरू झाले आहे. बायोएनटेकचे सह-संस्थापक उगर साहिन यांनी सांगितले की, करोनाच्या लशीला वेगळ्याच पद्धतीने विकसित केले आहे. यामुळे करोना विषाणूच्या नव्या प्रकारावर मात करण्यासाठी सक्षम लस तयार करता येऊ शकते. या लशीमुळे निर्माण होणारी ऍण्टीबॉडी क्षमता विषाणूच्या नव्या प्रकाराशी दोन हात करू शकतो. आवश्यकता भासल्यास सहा आठवड्यात नवीन लस तयार करता येऊ शकते.
नवीन विषाणू अजून नियंत्रणात
ब्रिटनसह इतर देशांतही बाधितांमध्ये नवा विषाणू आढळला असून इतर देशांनीही ब्रिटनसोबतची विमान सेवा स्थगित केली आहे. अशाचवेळी जागतिक आरोग्य संघटनेने हा नवीन विषाणू अद्यापही नियंत्रणाबाहेर गेला नसल्याचे म्हटले आहे.
यूकेच्या विमानांना दाबोळीत बंदी
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचे नवे रूप आढळून आल्याने दाबोळी विमानतळावर आठवड्यात चार वेळा उतरणार्या यूकेची हवाईसेवा येत्या ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांनी दिली. ब्रिटनमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणूचे नवे रूप आढळल्याने ब्रिटनला जाणार्या व येणार्या विमानांवर मंगळवारी रात्रीपासून बंदी घातली असून ती ३१ डिसेंबरपर्यंत लागू राहील असे भारत सरकारने काल घोषित केले आहे. त्यानुसार दाबोळी विमानतळावर उतरणार्या युकेतील साप्ताहिक विमानावर ३१ डिसेंबरपर्यंत बंदी घातली असल्याची माहिती श्री. मलिक यांनी दिली.