कोरोनाचे नवे रूप

0
67

दरवर्षी हिवाळ्यामध्ये थंडीचा कडाका वाढू लागला की सर्दीचे रुग्ण वाढतात. त्यातच कोरोना आल्यापासून कोरोनाची नवी लाटही वर्षअखेरीला येऊन धडकते असा गेल्या दोन तीन वर्षांचा आपला अनुभव राहिला आहे. आताही डिसेंबर महिन्याची अखेर जवळ येत असतानाच देशामध्ये अचानकपणे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. कोरोना विषाणूच्या जेएन.1 नावाच्या नव्या व्हेरियंटमुळे ही वाढ होत असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा निष्कर्ष आहे आणि ह्या नव्या व्हेरियंटचे देशात 21 रुग्ण आढळले, त्यातील तब्बल 19 आपल्या गोव्यात आढळले आहेत. नुकतेच केरळमध्ये कोरोनामुळे तिघेजण दगावले असल्याने जनता धास्तावून जाणे स्वाभाविक आहे, परंतु कोरोनाच्या यापूर्वीच्या व्हेरियंटपेक्षा हा जेएन.1 विषाणू अधिक घातक असल्याचे अद्याप तरी आढळून आलेले नाही. कोरोनाच्या आधीच्या विषाणूंचा सामना ज्या लशींच्या मदतीने आपण सर्वांनी केला, त्याच लशीने मिळवून दिलेली प्रतिकारशक्ती ह्या व्हेरियंटचा सामना करण्यास सक्षम आहे, असा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. मात्र, हा व्हेरियंट गेल्या वर्षी धुमाकूळ घालून गेलेल्या ओमिक्रॉन विषाणूचेच नवे रूप असल्याने संसर्ग आणि परिणाम ह्या दोन्ही दृष्टींनी तो तितकाच तापदायक आहे. ह्या विषाणूची बाधा जरी तीव्र नसली तरी अन्य आजार असलेल्यांसाठी, साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि लस न घेतलेल्यांसाठी त्यापासून धोका संभवतो. त्यामुळे जग आता कोरोनामुक्त झालेले आहे ह्या भ्रमात न राहता पुन्हा एकदा कोरोनाबाबत सरकारने सुचवलेली खबरदारी घ्यायला सुरुवात करण्याची वेळ आली आहे. गेल्या सहा डिसेंबरला देशात कोरोनाचे 115 रुग्ण होते. मात्र ती संख्या झपाट्याने वाढताना दिसते आहे. केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील काराकुलम येथे ह्या व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळून आला होता. मात्र आता खुद्द गोव्यामध्येच एकोणीस रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण घरीच उपचार घेत आहेत व कोणालाही इस्पितळात दाखल करावे लागलेले नाही ही आश्वासक बाब जरी असली, तरी सध्या राज्यामध्ये पर्यटकांचे लोटलेले लोंढे आणि नववर्षाच्या पार्ट्यांची असणारी रेलचेल लक्षात घेता येत्या काही दिवसांत गोव्यातील रुग्णसंख्या वाढून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाणार नाही अशी आशा आहे. कोरोनाच्या पूर्वीच्या बीए.2.86 ह्या व्हेरियंटच्या स्पाईक प्रोटीनमध्ये केवळ एक म्युटेशन होऊन हा नवा विषाणू तयार झाला आहे असे तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे त्याची तीव्रता किंवा धोकादायकता अद्याप तरी आढळून आलेली नाही. परंतु केंद्र सरकारने राज्यांना सतर्कतेचे आणि सज्जतेचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे आता राज्यातील कोरोना तपासणी आणि उपचारांच्या उपलब्धतेचा आढावा घेऊन आवश्यक त्या गोष्टी पार पाडण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. कोरोना चाचणीची व्यापक सोय उपलब्ध करणे, रुग्णांसाठी औषधांचा मुबलक साठा औषधालयांमध्ये उपलब्ध करून देणे, सॅनिटायझर, मास्कची उपलब्धता तपासणे ह्या गोष्टी आरोग्य संचालनालयाने तातडीने कराव्यात. कोरोनाची लक्षणे ही सामान्य सर्दीसारखीच असतात त्यामुळे सामान्य सर्दी समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाण्याची शक्यता बळावते. त्यामुळे सर्दी, ताप, नाक ओलसर राहणे, घसा खवखवणे, डोकेदुखी, श्वसनाचा त्रास आदी लक्षणे आढळल्यास हयगय न करता कोरोना चाचणी करून घेतल्यास अधिक गुंतागुंत निर्माण होणार नाही आणि इस्पितळात जाण्याची पाळीही ओढवणार नाही. गेले काही महिने कोरोनाचे अस्तित्व जवळजवळ शून्यावर गेल्याचे दिसत होते, त्यामुळे जनताही निर्धास्त वावरते आहे. कोरोनाला जणू विसरूनच गेली आहे. त्यामुळे आता अचानक अवतरलेल्या ह्या नव्या व्हेरियंटने तिची झोप उडवली आहे. मात्र, घाबरून जाण्याचे कारण नाही. पुढील दोन तीन आठवडे महत्त्वाचे असतील. त्यात हा व्हेरियंट कितपत पसरतो, किती तीव्र स्वरूप धारण करतो, लाटेचे रूप घेतो का हे स्पष्ट होईल. त्याने अक्राळविक्राळ लाटेचे रूप घेऊ नये यासाठी जनता आणि सरकार ह्या दोन्हींकडून प्रयत्न होणे जरूरी आहे. व्यावसायिक आस्थापनांना सॅनिटायझर उपलब्ध करून देण्याचे आदेश सरकारने दिले पाहिजेत. नागरिकांनी सामाजिक अंतर, मास्क आदींचा वापर सुरू करावा लागेल. जनता आणि सरकार यांच्या परस्पर सहकार्यानेच ह्यापूर्वीच्या कोरोना व्हेरियंटवर जशी मात केली गेली, तशीच ह्या नव्या व्हेरियंटवर मात करणेही अवघड ठरू नये. जनतेमध्ये त्यासाठी योग्य जागृती करण्यासाठीही सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे. कोरोनाच्या ह्या नव्या व्हेरियंटबाबत भीती पसरवण्याचे कारण नाही. मात्र, गरज आहे ती त्याच्याविषयीच्या जागृतीची.