>> रविवारी राज्यात तिघांचा मृत्यू
राज्यात आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ५० हजारांच्या पुढे जाऊन ती ५०,०६४ एवढी झाली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेले ८८ नवे रुग्ण काल गोव्यात सापडले. काल तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ७२१ झाली आहे. सध्याच्या रुग्णांची संख्या ९७२ एवढी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६२ टक्के झाले आहे. तसेच काल राज्यात ९१ जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ४८,३७१ झाली असल्याची माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. काल खात्यातर्फे ९६६ जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली.
आतापर्यंत ३,८१,३९२ एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे. कोरोना संसर्ग झालेल्या १४,०५१ जणांनी राज्यातील इस्पितळात उपचार घेतले आहेत. तर २६,०८७ जणांनी घरी विलगीकरणात राहून उपचार घेतले आहेत.
दक्षिण गोव्यात मडगाव येथे सर्वाधिक १५२ रुग्ण असून केपे ७८ तर फोंड्यात ५१ रुग्ण आहेत. उत्तर गोव्यातील पर्वरीत ७७, पणजीत ५९ रुग्ण उपचार घेत असून इतर ठिकाणी ५० पेक्षा कमी रुग्ण आहेत.
उत्तर गोव्यातील कोविड केअर सेंटरमध्ये सर्वच्या सर्व म्हणजे २७५ खाटा रिक्त झाल्या आहेत. तर दक्षिण गोव्यातील ६० पैकी २८ खाटा रिक्त असून तिथे ३२ जण उपचार घेत आहेत. काल कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या १८ जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला. तर ३७ जणांनी इस्पितळात विलगीकरणात राहण्याचे ठरवले.