राज्यात १४ वर्षाच्या मुलीचा कोविडने झालेला मृत्यू ही दुर्दैवी घटना असून अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये म्हणून नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. सरकारी यंत्रणा कोविडचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे. नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे, ताप, थंडी आदींची लक्षणे असलेल्या नागरिकांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत कोविड महामारीवर बोलताना काल केले.
आपण कोरोनाला घाबरण्याची गरज नाही, या वक्तव्यावर आजही ठाम आहे. मास्क, सामाजिक अंतर, सॅनिटायझर्स या नियमांचे पालन करण्याची गरज आहे. असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यातील कोविड महामारीला तोंड देण्यासाठी वैद्यकीय, सरकारी यंत्रणा सक्षम आहे. देशातील इतर राज्याच्या तुलनेत कोविड रुग्णांसाठी चांगली सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. विरोधकांकडून लहानसहान गोष्टीचा बाऊ केला जात आहे. आम्हांला विरोधकांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
विरोधकांकडून केवळ टीका
राज्यातील कोविड व्यवस्थापनातील कारभार पारदर्शक आहे. विरोधकांना केवळ टीका करणे सोपे आहे. कोविड या विषयावर घेतलेल्या बैठकीत कोविडवर सूचना करण्याचे आवाहन केले होते मात्र त्यांच्याकडून सूचना प्राप्त झाल्या नाहीत. असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
अर्थसंकल्पात आरोग्याला प्राधान्य
सरकारने अर्थसंकल्पात आरोग्यक्षेत्राला प्राधान्य दिले आहे. त्याच बरोबर शिक्षण, उद्योग या क्षेत्राकडे लक्ष देत आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.