‘कोरोना’चा जागतिक अर्थव्यवस्थेस फटका

0
252
  • शैलेंद्र देवळणकर

चीनच्या भिंतीपल्याड पोहोचलेल्या कोरोना व्हायरस मुळे केवळ जागतिक आरोग्याचाच प्रश्‍न झालेला नसून याची झळ संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेला बसू लागली आहे. चीन हा जागतिक पुरवठा साखळीतील सर्वांत मोठा घटक असून कोरोनाच्या परिणामांमुळे ही साखळीच खंडित झाली आहे. याचा ङ्गटका चीनकडून स्वस्तात आयात करुन चालणार्‍या जगभरातील उद्योगधंद्यांना बसला आहे.

कोरोना व्हायरस हा आता केवळ चीनच्या भिंतीआड राहिलेला नसून त्याने सातासमुद्रापार प्रवेश केला आहे. संपूर्ण जगभरात या विषाणूने थैमान घालायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत या विषाणूने ३००० हून अधिक जणांचे बळी घेतले असून एक लाखांहून अधिक जणांना त्याची लागण झाली आहे. इटली, युरोप आदी पाश्‍चिमात्य राष्ट्रांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण सापडू लागले आहेत. त्याचबरोबर जपान, दक्षिण कोरिया, अमेरिका जगातील मोठ्या महासत्तांमध्येही कोरोनाचा संसर्ग पसरताना दिसून येत आहे. त्यामुळे याची झळ केवळ आरोग्याच्या दृष्टीने न राहता संपूर्ण जगाला आता याच्या आर्थिक झळा बसायला सुरुवात झाली आहे. ही झळ इतक्या मोठ्या प्रमाणावर बसू लागली आहे की, जगभरातील शेअर बाजारांमध्ये प्रचंड मोठी पडझड होताना दिसत आहे. भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक २८ ङ्गेब्रुवारी रोजी १४०० अंकांनी कोसळलेला दिसून आला. अवघ्या पाच मिनिटांमध्ये गुंतवणुकदारांचे ५ लाख कोटींचे नुकसान झालेे. सलग सहाव्या दिवशी निफ्टी आणि सेन्सेक्स दबावाखाली दिसून आला. या सहा दिवसांत शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना १ लाख कोटींचा ङ्गटका बसला. अमेरिकेतील डाऊ जोन्समध्येही जवळपास १२०० अंकांची घसरण झाली. एका दिवसात झालेली ही सर्वांत मोठी घसरण ठरली. गेल्या आठवड्यात डाऊ जोन्स जवळपास ३२०० अंकांनी घसरला आहे.

जगभरातील अर्थतज्ज्ञ आणि वित्तीय संस्था या आता पुढे येऊन अशा स्वरुपाचे भाकित व्यक्त करत आहेत की, २००८ मध्ये लेहमन ब्रदर्सच्या दिवाळखोरीनंतर जगाला ज्याप्रमाणे एका मोठ्या आर्थिक मंदीच्या प्रवाहातून जावे लागले होते, त्याहून भयंकर प्रकारची आर्थिक मंदी येणार्‍या काळात पहायला मिळू शकते. यामागचे कारण म्हणजे गेल्या १० वर्षांपासून चीन हा जगाचे मॅन्युङ्गॅक्चरिंग हब बनलेला असून चीनची अर्थव्यवस्था पूर्णतः निर्यातभिमुख बनलेली आहे. वैश्‍विक निर्यातीमध्ये चीनचा वाटा सुमारे १३ टक्के इतका आहे. अमेरिका, जपान, हॉंगकॉंग, नेदरलँड, जर्मनी, व्हिएतनाम, कोरिया यांसह अनेक देशांना चीनमधून अब्जावधी डॉलर्सची निर्यात केली जात आहे. उदाहरणच घ्यायचे झाल्यास, चीन आणि जपान यांच्यातील व्यापार ४०० अब्ज डॉलर्सचा आहे. अमेरिका आणि चीनचा व्यापार ७०० अब्ज डॉलर्सचा आहे. यामध्ये चीनकडून अमेरिकेला होणारी निर्यात साधारणतः ४५० अब्ज डॉलर्सची आहे. आज अमेरिकेतील जवळपास ५० टक्के उद्योग चीनमधून येणार्‍या कच्च्या मालावर, स्पेअर पार्टस्‌वर अवलंबून आहेत. इतकेच नव्हे तर अनेक अमेरिकन कंपन्यांची उत्पादने चीनमध्ये होतात. उदाहरणच घ्यायचे झाल्यास, ऍपलच्या ५० टक्के मोबाईलचे उत्पादन चीनमध्येच होते. मायक्रोसॉफ्टच्या विंडोज कॉम्प्युटरचे उत्पादन चीनमध्ये होते. संपूर्ण जगाचे आणि खास करुन युरोपचे आवडते पेय असणार्‍या डाएट कोकचे महत्त्वाचे घटक चीनकडून आयात केले जातता. थोडक्यात, चीन हा जागतिक पुरवठा साखळीचा सर्वांत मोठा घटक आहे. जोपर्यंत हा पुरवठा व्यवस्थित आणि सुरळित होत नाही तोपर्यंत कंपन्या उत्पादन घेऊच शकत नाहीत. आज अमेरिका आणि युरोपसह जगभरातील अनेक देशांतील आयटी क्षेत्र, गारमेंट क्षेत्र, ऑटोमोबाईल क्षेत्र मोठ्या प्रमाणावर चीनवर विसंबून आहे. कोरोना व्हायरसमुळे ही पुरवठा साखळी खंडित झाली आहे. त्याचप्रमाणे चीनने जगभरात मोठ्या गुंतवणुकीही केलेल्या आहेत.

ऑस्ट्रेलियापासून आङ्ग्रिकेपर्यंत, जपानपासून अमेरिकेपर्यंत अनेक देशांत चीनने साधनसंपत्तीच्या विकासासह अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. यामध्ये ४० अब्ज डॉलर्सचा चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरीडॉरसारखे अनेक प्रकल्प आहेत. असाच कॉरीडॉर चीन म्यानमार, नेपाळसोबत विकसित करत आहे. बॉर्डर रोड इनिशिएटिव्हअंतर्गत अब्जावधी डॉलर्सच प्रकल्प चीनने हाती घेतले आहेत. पण या सर्व प्रकल्पांवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. याचे कारण आजघडीला चीनमधील परिस्थिती इतकी भयंकर बनली आहे की, तेथील कामगार घर सोडून बाहेर जायला तयार नाहीयेत. त्यामुळे चीनमधील कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. दुसरीकडे मॉल्ससारख्या गर्दीच्या ठिकाणी जाण्यास लोक तयार नसल्यामुळे त्यांचेही अर्थकारण धोक्यात आले आहे. लोकांनी अनेक गोष्टींची खरेदीही थांबवली आहे. या सर्वांमुळेमागणीही कमालीची घटली आहे. इतर देशांचे जे पदार्थ-वस्तू चीनमध्ये विकल्या जातात त्यांच्यावरही प्रतिकूल परिणाम झाला आहे. चीन हा लोकसंख्येबाबत जगातील पहिल्या क्रमांकाचा देश आहे. त्यामुळे चीनमधील मागणी प्रभावित होण्याचे ङ्गटके जगभरातील देशांना सोसावे लागत आहेत.
संपूर्ण वैश्‍विक व्यापार हा मागणी आणि पुरवठा या दोन गोष्टींवर चालत असतो. या दोन्ही घटकांना कोरोनाचा जबरदस्त ङ्गटका बसला आहे. चीनची निर्यात घटल्यामुळे इतर देशांमध्ये महागाईचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चीनकडून तेलाची आयातही कमी झालेली आहे. त्यामुळे जागतिक बाजारात तेलाचे दर घसरले असले तरी तेलउत्पादक देशांच्या अर्थकारणावर त्याचे प्रतिकूल परिणाम होणार आहेत. एकंदरीतच, चीनची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरुप झाल्यामुळे मागणी-पुरवठ्याची साखळी विस्कळित झाली आहे. पर्यटन व्यवसायालाही याचा मोठा ङ्गटका बसला आहे.

मागील काळात, चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापारयुद्धामुळे जागतिक आर्थिक विकासाचा दर काही प्रमणात कमी झाला होता. अलीकडेच हे व्यापारयुद्ध संपल्यामुळे जगाने सुटकेचा निःश्‍वास टाकला होता. हळूहळू का होईना पण अर्थव्यवस्था आता रुळावर येईल अशी आशा निर्माण झालेली असतानाच कोरोना इङ्गेक्टमुळे जागतिक अर्थव्यवस्थेच्या वृद्धीचा दर जवळपास ०.३ टक्क्यांनी घसरेल असा अंदाज वर्तवला जात आहे. युरोप, अमेरिका, आशिया देश या सर्वांनाच कोरोना व्हायरसच्या परिणामांचा ङ्गटका बसणार आहे. त्यामुळेच जगभरातील शेअर बाजार कोसळायला सुरुवात झाली आहे. याचा सर्वांत जास्त ङ्गटका अमेरिकेला बसणार आहे. कारण अमेरिका हा चीनचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणुकांना सामोरे जावे लागणार असल्यामुळे ते हा ‘चीनी इङ्गेक्ट’ मान्य करायला तयार नाहीत. गेल्या काही महिन्यांत अमेरिकेतील बेरोजगारी जवळपास ५० टक्क्यांनी घटलेली आहे. त्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था आजघडीला सुस्थितीकडे निघाली आहे. पण कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेचेही धाबे दणाणले आहेत.

ट्रम्प कितीही नाकारत असले तरी ऍपल, मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला असल्याचे सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात लवकरात लवकर यश आले नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेसाठी ती धोक्याची घंटा ठरणार आहे. २००८ पेक्षाही मोठ्या महामंदीचा सामना जगाला करावा लागू शकतो, ही भीती दुर्लक्षून चालणार नाही. त्यामुळे कोरोनाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर जनमत एकत्रित करुन सामूहिक प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.