‘कोरे’ मार्गावरून कोळसा वाहतुकीस मान्यता नाहीच

0
0

राज्यातील कोकण रेल्वेच्या मार्गावरून कोळसा वाहतूक करण्यासाठी मान्यता दिली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा यांच्या एका लक्षवेधी सूचनाला उत्तर देताना विधानसभेत काल दिले. केंद्र सरकारने कोकण रेल्वे मार्गावर गोव्यातील मये, नेवरा आणि सां जुझे दी आरियल या तीन ठिकाणी नवीन स्थानके स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या प्रस्तावित रेल्वे स्थानकांच्या जवळच रेल्वेची स्थानके कार्यरत असल्याने नवीन रेल्वे स्थानकांचा वापर कोळसा वाहतुकीसाठी केला जाण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे, असे आमदार क्रुझ सिल्वा यांनी सभागृहात बोलताना सांगितले. कोकण रेल्वे मार्गावर कोळसा वाहतूक करण्यास कदापि मान्यता दिली जाणार नाही. उत्तर गोव्यातील मये येथील प्रस्तावित रेल्वे स्थानकाचे स्वागत करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. कोकण रेल्वे मार्गावरील प्रस्तावित नवीन स्थानकांबाबत काही आक्षेप असल्यास ते लिखित स्वरूपात सादर करावेत. लेखी स्वरूपात प्राप्त होणारे आक्षेप केंद्रीय मंत्रालयाकडे पाठविण्यात येतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. सांत आंद्रेचे आमदार विरेश बोरकर, बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनीही आपली मते मांडली.