कोरियाच्या हान कांग यांना साहित्यातील नोबेल

0
5

2024 सालचा साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले असून यंदा दक्षिण कोरियाच्या हान कांग यांना हे पारितोषिक मिळाले आहे. जीवनातील मार्मिक कथा सुंदर शैलीत सादर केल्याबद्दल त्यांना हा बहुमान मिळाला आहे. हान कांग यांनी 1993 मध्ये कविता लिहून करिअरची सुरुवात केली. 1995 मध्ये त्यांनी कथा लिहायला सुरुवात केली. नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्या हान कांग पहिल्या कोरियन व जागतिक पातळीवरील अठराव्या महिला आहेत. यापूर्वी 2016 मध्ये ‘द व्हेजिटेरियन’ या कादंबरीसाठी त्यांना मॅन बुकर इंटरनॅशनल पारितोषिकही मिळाले होते. या कादंबरीने त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून दिली.
नोबेल समितीने हान कांग यांच्या ‘ग्रीक लेसन’ या कादंबरीवर विशेष चर्चा केली आहे. आयुष्यातील संकटांमुळे आवाज गमावलेल्या मुलीची ही कथा आहे. या कादंबरीत संवादातील अडथळे असतानाही दोन माणसांमध्ये फुलणाऱ्या नात्याचे सुंदर वर्णन केले आहे.

यापूर्वी वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिके जाहीर झाली आहेत. व्हिक्टर एम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना औषधशास्त्रातील, जेफ्री ई. हिंटन आणि जॉन जे. हॉपफिल्ड यांना भौतिकशास्त्रातील आणि रसायनशास्त्राचे डेव्हिड बेकर, जॉन जम्पर आणि डेमिस हसाबिस यांना मिळाले आहे.
हे नोबेल पारितोषिक वितरण 14 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. विजेत्यांना 8.90 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली जात आहे.
2023 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार नॉर्वेजियन लेखक जॉन फॉस यांना देण्यात आला. त्यांच्या नाटक आणि कथांसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. आतापर्यंत 120 जणांना साहित्यात नोबेल मिळाले आहे. त्यात केवळ 17 महिला आहेत. त्यामुळे नोबेल समितीवर टीकाही होत आहे.