कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग अजूनही स्तब्धच आहे. जगभरात कोरोना संक्रमितांची संख्या ९० लाखांच्या वर पोहोचली आहे. या महामारीचा मोठा फटका क्रीडा जगतालाही बसला आहे. बर्याच क्रीडापटूंना या महामारीचा संसर्ग झालेला आहे. त्यात आता बल्गेरियन टेनिस स्टार ग्रिगोर दिमित्रोव आणि क्रोएशियाचा बोर्ना कोरीक यांचाही समावेश झाला आहे. या दोघांची कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे.
नुकतीच क्रिकेट क्षेत्रातील शाहिद आफ्रिदी, मश्रफे मुर्तजा, नफीस इक्बाल यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात आता आणखी क्रीडापटूंची भर पडत आहे.
जागतिक १९व्या स्थानावरील दिमित्रोवने रविवारी आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे घोषित केले होते. त्यानंतर आता बोर्ना कोरीक यानेही आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असल्याची पुष्टी ट्विटरवरून दिलेली आहे. या दोघांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर क्रोएशियामध्ये सुरू असलेली प्रदर्शन स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.