कोरगाव अपघातात पोलीस कॉन्स्टेबल ठार

0
136

कोरगाव येथे झालेल्या स्वयं अपघातात गंभीर जखमी झालेल्या केरी, पेडणे येथील कुणाल अशोक पेडणेकर (२७) या पोलीस शिपायाचे काल उपचार सुरू असताना गोमेकॉत निधन झाले. शनिवारी ४ रोजी सायंकाळी अपघातात गंभीर झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुणाल आपल्या दुचाकी मोटारसायकलवरून कोरगाव येथून केरीला जात होते. देऊळवाडा, कोरगाव येथे झालेल्या स्वयं अपघातात तो गटाराच्या बाजूला फेकला जाऊन गंभीर जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत सुरुवातीला म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला बांबोळी येथे पाठवण्यात आले होते. तेथे उपचार चालू असताना काल त्याची प्राणज्योत मालवली.
कुणाल पोलीस खात्यात चार वर्षांपूर्वी भरती झाला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याचे लग्न झाले होते. त्याची पत्नी गरोदर असून ती माहेरी असल्याने तिची खबरबात घेण्यासाठी तो जात असताना अपघात घडला.

वळपे अपघातात दोघे पोलीस गंभीर
वळपे, पेडणे येथे महामार्ग – १७ वर सोमवारी रात्री ८ वाजता दोन कारगाड्यांची टक्कर होऊन झालेल्या अपघातात विनिकेश सावंत (साळगाव पोलीस स्थानक) व नितेश घाडी (पर्वरी पोलीस स्थानक) हे दोन पोलीस शिपाई गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. जखमी पोलीस शिपाई मिळून तिघे पोलीस जीए ११ – एस – १७७३ क्रमांकाच्या खासगी स्वीफ्ट कारने म्हापशाहून पेडणेला जात होते. तर एमएच ०९ – व्हीके – ३८३ क्रमांकाची इनोवा विरुद्ध दिशेने येत होते. वळपे येथे महामार्गावर दोन्ही कारची समोरासमोर धडक बसली.