>> मुंबईहून ७ जूनला आल्या होत्या; तिसर्याचा अहवाल निगेटीव्ह
पेठेचावाडा-कोरगाव येथे मुंबईहून आलेल्या दोन महिला कोरोना रुग्ण सापडल्याने कोरगाव गावात आणि पेडणे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. तुये सामुदायिक केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. विद्या परब यांनी कोरगाव येथे मुंबईहून आलेल्या दोन महिला कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह मिळाल्याची माहिती दिली. कोरगाव येथे दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर तुये येथील आरोग्य अधिकारी डॉ. विद्या परब यांनी तातडीने कोरगाव पंचायत मंडळाची बैठक घेतली.
यावेळी डॉ. विद्या परब यांनी कोरगाव गावात एखादी व्यक्ती बाहेरून आली तर न घाबरता त्यांची माहिती सरपंच किंवा पंचायत सदस्यांना कळल्यावर त्यांनी अशा व्यक्तीना हाकलून न देता त्याची माहिती पेडणे उपजिल्हाधिकारी किंवा पेडणे मामलेदार यांना द्यावी किंवा घरातच त्यांना क्वारंटाईन राहण्यास सांगावे. असे सांगून पंचायतीने गावात कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी असे सांगितले.
कोरगावात सापडलेले
कोरोना रुग्ण मुंबईचे
कोरगाव गावात सापडलेल्या दोन महिला रुग्ण या ७ जून रोजी गोव्यात आल्या होत्या. एकूण तीन जणांचा यात समावेश होता. मुलगा, सून व सासू ही तिघेजणी गोव्यात आल्यानंतर पेठेचावाडा येथे नव्याने बांधण्यात आलेल्या एका घरात भाडेपट्टीवर राहत होती. त्यांची चाचणी केल्यानंतर सून व सासू त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर मुलाचा चाचणी अहवाल हा निगेटिव्ह आल्याची माहिती सरपंच स्वाती गवंडी यांनी दिली.