कोणाला कौल?

0
131

महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभांसाठी आज निवडणूक होत आहे. दिवसेंदिवस प्रबळ होत गेलेला भारतीय जनता पक्ष या निवडणुकीतून पुन्हा एकवार आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन करू इच्छितो आहे आणि दुबळा होत गेलेला विरोधी पक्ष आपल्या अस्तित्वाची लढाई लढतो आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपा – शिवसेना महायुती विरुद्ध कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडी असा सामना आहे, तर हरियाणामध्ये भाजप, कॉंग्रेस व जननायक जनता पक्ष असा बहुरंगी सामना आहे. दोन्हीही राज्ये सध्या भाजपच्या सत्तेखाली आहेत आणि गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दोन्ही राज्यांमध्ये भाजपाने पुन्हा जोरदार मुसंडी मारलेली आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीमध्येही त्या यशाची पुनरावृत्ती घडवण्याच्या आत्मविश्वासाने भाजपाचे नेते प्रचारात उतरल्याचे यावेळी दिसून आले. दुसरीकडे, विरोधक पुन्हा एकदा जमेल त्या शक्तीनिशी भाजपाचा रथ रोखण्यासाठी मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर भाजपा – शिवसेनेला यावेळी मोठ्या प्रमाणात बंडखोरीचा सामना करावा लागला. अनेकांना उमेदवारी नाकारली गेल्यानंतर त्यांनी बंडाचे निशाण फडकावले. त्यातील काहींची मनधरणी करून त्यांना समजावण्यात आले असले, तरी पन्नासहून अधिक बंडखोर रिंगणात राहिलेले आहेत. त्यामुळे भाजपा आणि शिवसेनेसाठी ही मोठी डोकेदुखी आहे. शिवसेनेने महाराष्ट्रात आदित्य ठाकरेंना निवडणुकीत उतरवून निवडणुकोत्तर तंट्याची तजवीज केलेली दिसते आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला गेल्या लोकसभा निवडणुकीपासूनच फुटीचे ग्रहण लागलेले आहे. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात मोठी इनकमिंग मोहीम राबवली. अन्य पक्षांतून जे जे नेते येतील, त्यांना आपले दार खुले ठेवले. त्यातून आपल्या विरोधकांना दुबळे करण्याची रणनीती भाजपने आखली आणि त्याला बर्‍यापैकी यशही आले. प्रदेश कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या मुलासह भाजपामध्ये एव्हाना स्थिरस्थावर झालेले आहेत. त्यांच्यानंतर भाजपामध्ये जाण्यासाठी महाराष्ट्रात रांगच लागली. हरियाणामध्येही कॉंग्रेसमध्ये बंडखोरी झालीच. तिथले कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर पक्षनेतृत्वावर तोफा डागत पक्षातून बाहेर पडले आणि भाजपमध्ये गेलेले नसले तरी जननायक जनता पक्षाला पाठिंबा देऊन राहिले आहेत. प्रचाराच्या रणधुमाळीत दोन्ही राज्यांमध्ये स्थानिक प्रश्नांपेक्षा राष्ट्रीय प्रश्नांचीच चर्चा अधिक झाली. किंबहुना भारतीय जनता पक्षाने आपल्या केंद्रातील सरकारने घेतलेल्या धडाकेबाज व धाडसी निर्णयांचेच ढोल या राज्यांच्या निवडणूक प्रचारात वाजवले. विशेषतः काश्मीरचे ३७० कलमाखालील विशेषाधिकार काढून घेण्याच्या निर्णयाचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांतील प्रचारसभांमधून हिरीरीने मांडला आणि त्यावर विरोधी भूमिका घेणार्‍या विरोधी पक्षांना खिंडीत पकडले. एका अर्थाने भाजपाने हा रचलेला हा सापळाच होता. बालाकोटच्या विषयामध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांचे जे झाले, तेच या निवडणुकीमध्ये काश्मीरच्या विषयावरून विरोधकांचे झाले. या निर्णयाच्या पाठीशी असलेले जनमत आणि विरोधी पक्षांनी घेतलेली विरोधी भूमिका याचा ताळमेळच उरला नाही. त्याचा फटका निवडणुकीत किती बसतो ते दिसेलच. विरोधी पक्षांनी, विशेषतः कॉंग्रेसने स्थानिक प्रश्नांना पुढे आणण्याऐवजी मोदी सरकारच्या आर्थिक आघाडीवरील अपयशाचेच ढोल पिटण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधींकडून नोटबंदी, जीएसटीसारखे गेल्या लोकसभा निवडणुकीत उपयोगी न ठरलेले मुद्देच पुन्हा पुढे करण्यात आले. राफेलचा विषय मात्र यावेळी राहुल यांनी गुपचूप गिळल्याचे दिसून आले. वास्तविक दोन्ही राज्यांत भाजपचे सरकार असल्याने त्यांच्या गेल्या पाच वर्षांतील कामगिरीवर कोरडे ओढण्याची संधी विरोधी पक्षांना होती, परंतु या दोन्ही सरकारांनी तसे विशेष लक्षवेधी मुद्देच विरोधकांना दिलेले नाहीत, त्यामुळे राष्ट्रीय विषयांवरून वेळ मारून नेण्याची पाळी विरोधकांवर आलेली दिसली. गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच या विधानसभा निवडणुकांतही जातीपातीची समीकरणे थोडी बाजूला पडतील अशी चिन्हे आहेत. त्याहून मोठे विषय यावेळी प्रचारात ऐरणीवर आणले गेले. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच या विधानसभा निवडणुकांतही मतदार मतदान करणार का हे पाहावे लागेल. यावेळी सोमवारी मतदान होत असल्याने दोन दिवसांची सुट्टी मिळालेले शहरी मध्यमवर्गीय मतदानाऐवजी सुटीवर जाणे पसंत करतील अशी भीती निवडणूक आयोगाला व राजकीय पक्षांनाही आहे. त्यामुळे मतदार जागृतीसाठी मोठी मोहीम राबवली गेली. हा मध्यमवर्गीय शहरी मतदार किती प्रमाणात मतदान करतो त्यावरही निकालांचा कल अवलंबून असू शकतो. विरोधकांतील अनेक दिग्गज नेत्यांचे राजकीय भवितव्य या निवडणुकीत पणाला लागलेले आहे. अनेक सत्ताधार्‍यांच्या पायांमध्ये बंडखोर कितपत कोलदांडा घालतात तेही पाहावे लागेल. एकूणच दोन्ही राज्यांतील या विधानसभा निवडणुकांमध्ये मुख्यत्वे विरोधकांचा कस लागलेला आहे. त्यातून ते किती तावून सुलाखून निघतात पाहूया!