गोवा लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये कोकणी पेपरची सक्ती करून झाल्यानंतर आता राज्य सरकारने कर्मचारी भरती आयोगाच्या परीक्षेतही कोकणी पेपर सक्तीचा करून त्या विषयात मिळणाऱ्या गुणांच्या आधारे उमेदवार निवड करण्याचा निर्णय बेधडक घेऊन टाकला आहे. ज्या गोव्यामध्ये हजारोंच्या संख्येने विद्यार्थी केवळ मराठी आणि इंग्रजी माध्यमातून शिकत आहेत, ज्या मुलांनी कोकणीचे कोणतेही औपचारिक शिक्षण घेतलेले नाही, त्या मुलांना त्यांच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाच्या परीक्षेमध्ये – की जी परीक्षा त्यांच्या जीवनाला स्थैर्य मिळवून देणार आहे – कोकणी भाषेचा पेपर सोडवायला लावून त्याच्या आधारे त्यांची पात्रता – अपात्रता ठरवणे हे अत्यंत खोडसाळपणाचे आहे. सरकारमधील काही घटक आपले हितसंबंध साधून घेण्यासाठी सरकारला कसे फशी पाडतात ह्याचे हे मासलेवाईक उदाहरण आहे. स्थानिक उमेदवारांना संधी देण्यासाठी कोकणी सक्ती करण्यात आल्याचा दावा जरी सरकार करीत असले, तरी स्थानिकांना रोजगार संधी देण्यासाठी पंधरा वर्षे गोव्यात वास्तव्याचा दाखला सक्तीचा आहेच. जी व्यक्ती पंधरा वर्षे गोव्यात वास्तव्याला आहे, तिला कोकणी बोलता येणारच, पण तिलाच काय, जो जन्माने गोवेकर आहे, त्याला देखील तो रोज जी घरी कोकणीच बोलत असला, तरी कोकणी लिहिता येईल की नाही शंका आहे, कारण जरी आज कोकणीला भाषा म्हणून राजमान्यता मिळालेली असली, तरी कोकणी लेखन – वाचनाची गोव्याची परंपराच नाही आणि जरी तिच्यावर राजभाषेचा टिळा लावला त्याला साडे तीन दशके उलटून गेली असली, तरीही तिचा लेखन वाचन व्यवहारामध्ये आम गोमंतकीयांनी स्वीकार केलेला दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे निव्वळ भाषिक अभिनिवेशापोटी भलत्या गोष्टी लादण्याआधी सारासार विचार करणे आवश्यक आहे. गोव्यामध्ये पहिली ते चौथीपर्यंत इंग्रजी माध्यमातून आजच्या घडीस 50,504 विद्यार्थी शिकतात. त्या खालोखाल मराठी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 30,258. मात्र, कोकणी माध्यमातून शिकणारे विद्यार्थी आहेत केवळ 8627. माध्यमिक म्हणजे इयत्ता पाचवी ते सातवी इयत्तेत 71,503 विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून शिकत आहेत. कोकणी माध्यमाची एकही माध्यमिक शाळा नाही आणि त्यात एकही विद्यार्थी शिकत नाही. ही परिस्थिती असताना विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या परीक्षेमध्ये थेट कोकणी पेपर सोडवायला लावण्यामागील हेतू शुद्ध नाहीत. गोव्यात कोकणी वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे बोलली जाते. पेडण्याची आणि काणकोणची किंवा अंत्रुजी आणि सत्तरीची कोकणी यामध्ये मोठा भेद आहे. त्यामुळे काणकोणच्या कोकणीतील शब्दांचा अर्थ पेडण्याच्या व्यक्तीला समजत नाही आणि पेडणेकरी बोली काणकोणकरांना कळत नाही अशीच स्थिती आहे. ख्रिस्ती समुदायाची व्यथा तर याहून मोठी आहे. हिंदू समाजाच्या वापरातील कोकणीतील शब्दांचा अर्थ त्यांना कळत नाही, कारण एक तर त्यांनी इंग्रजी माध्यम जवळ केलेले असते आणि त्यांच्या घरीही सर्रास इंग्रजी प्रतिशब्दांचाच वापर होत असतो. त्यामुळे लोकसेवा आयोग काय किंवा कर्मचारी भरती आयोग काय, त्यांच्या कोकणी प्रश्नपत्रिकांतील शब्दांचा अर्थच ह्या मुलांना समजत नाही अशी स्थिती आहे. गोवा लोकसेवा आयोगाच्या कोकणी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पाहिले तर कोकणीच्या नावाने किती बाष्कळपणा चालला आहे त्याचा प्रत्यय येतो. उदाहरणार्थ प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न पाहा. प्रश्न – ‘शिटकावणी म्हळ्यार….’ उत्तरांचे पर्याय आहेत 1. दुयेंस येता त्या लक्षणांची सुलूस, 2. शिटुकसाणेची पूर्वसुचोवणी, 3. गडगड जातकच जावपी जोगलावणी, 4. नाटक सुरू जातना गातात ती नांदी. 5. नन ऑफ द अबाव्ह. आता ही ‘सुलूस’, ‘शिटुकसाण’, ‘जोगलावणी’ असल्या शब्दांची भरमार असलेली कोकणी नेमकी कोणाची आहे? पेडणे, डिचोली, सत्तरीच्या बहुजनसमाजाला ह्या शब्दांचा अर्थ तरी कळेल काय? आणखी काही प्रश्न पाहा – 2. वॉटर सप्लाय म्हळ्यार कोंकणीत किते. पर्याय आहेत जलप्रक्रिया, उदका प्रक्रिया, उदका पुरवण, उदका उसपप. 3. वोटर्स लिस्ट म्हळ्यार कोंकणीत किते? पर्याय आहेत – मतदारांची माहिती, मतदारांची रचना, मतदारांची पत्रिका, मतदारांची व़ळेरी. आता ‘मतदारांची वळेरी’ ऐवजी ‘मतदारयादी’ म्हणणारे मतदार ‘गोंयकार’ नाहीत काय? हा सगळा तद्दन बालिशपणा आहे आणि विद्यमान सावंत सरकार ‘बाटग्याची बांग अधिक मोठी’ म्हणतात त्याप्रमाणे, भाषावादाचे गाडलेले मुडदे बाहेर काढून त्यांची भुते नाचवणाऱ्यांच्या तालावर नकळत नाचते आहे, बहुजन समाजातील गुणवंत उमेदवारांच्या भवितव्याशी खेळते आहे ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे.