कोडली येथील वेदांता खाणीत शनिवारी संध्याकाळी डंप कोसळून मातीत गाडलेल्या मनोज नाईक कळंगुटकर याचा शोध शनिवारी पुन्हा घेण्यास सुरुवात झाली. मात्र संध्याकाळपर्यंत ते सापडू शकला नसल्याने सोमवारी पुन्हा शोधकार्य सुरू होणार आहे. दुर्घटनेनंतर खाणीवर जाणार्या सर्व गेट समोर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार काही परप्रांतीय कामगार मातीत गाडल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
रविवारी सकाळपासून डंपची माती बाहेर काढण्याचे काम हाती घेण्यात आले. अंदाजे दीडशे मिटर खोल डंप कोसळल्याने मनोज नाईक कळंगुटकर कोणत्या ठिकाणी सापडू शकेल या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. धारबांदोड्याचे मामलेदार लक्ष्मीकांत कुट्टीकर तसेच कंपनीचे अधिकारी शोधकार्याच्या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत.
आणखी कामगार गाडल्याची भीती
काही स्थानिक तसेच कामगारानी दिलेल्या माहितीनुसार टिपर चालकाला बाजू दाखविण्यासाठी परप्रांतीय कामगार डंपवर ठेवण्यात येतात. शनिवारी सदर डंपला तडे गेल्याचे कंपनीच्या अधिकार्यांनी पाहिले होते. त्यामुळे शनिवारच्या दुर्घटनेत टिपर चालकासोबत अन्य परप्रांतीय कामगार आत गाडले जाण्याची शक्यता आहे. मात्र कंपनीचे अधिकारी संगीता चक्रवती यांनी एकच कामगार गाडला गेला असून शोध कार्य जोरात सुरू असल्याचे सांगितले.
स्थानिक आमदार दीपक पाऊसकर यांनी सकाळी दुर्घटनास्थळी भेट देवून चौकशी केली. मात्र स्थानिक पंच, तसेच पत्रकारांना गेटमधून प्रवेश दिला गेला नाही. आमदार दीपक पाऊसकर यांनी उपस्थित पत्रकारांना आपल्या वाहनातून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा रक्षकांनी वाहन रोखून सर्व पत्रकारांना खाली उतरविले. त्यामुळे कंपनीच्या अधिकार्यांशी फोनवरून माहिती घ्यावी लागली. परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवल्याने तसेच गेटमधून कुणालाच प्रवेश दिला नसल्याने कंपनीकडून माहिती लपविण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सध्या कोडली परिसरात सुरू आहे.
शनिवारी संध्याकाळी सेझा वेदांताचा कंपनी मध्ये खनीज उत्खननाचे काम सुरू होते. जुने पीट बंद करून दुसर्या जागी नवीन पीट मारण्याचे काम सुरू होते. नवीन पीटाची माती जूना पीट बुजवण्यासाठी काम सुरू होते. सदर माती पीटमध्ये ढकलण्यासाठी टिपरचा उपयोग करीत होते. सदर टिपर मनोज नाईक चालवत होता. मनोज खणीच्या धडेवर टिपर चालवत होता. अचानक टिपर बाजूला असलेल्या कडेला गेला. तेथे असलेला मातीचा ढिग कोसळला व त्या ढिगामध्ये मनोज गाडला गेला. सदर माहिती मिळताच सेझा वेदांता कंपनीने शोध कार्यास सुरूवात केली. शनिवारी रात्री व रविवार दिवसभर काम सुरू केले तरी उशिरापर्यंत काहीच हाती लागले नाही.
खासदार नरेंद्र सावईकर, विनय तेंडुलकर व दिपक पावस्कर यांनी घटनास्थळी भेट दिली तर उपजिल्हाधिकारी प्रशांत शिरोडकर, मामलेदार प्रताप गावकर, लक्ष्मीकांत कुट्टीकर तसेच कुडचडेचे निरीक्षक रविंद्र देसाई, तसेच कुडचडे पोलीस स्थानकाचे पोलीसफाटा मोठ्या संख्येने घटनास्थळी होता.