कोडलीतील खनिजाची वाहतूक पोलीस बंदोबस्तात सुरू

0
98
कोडलीतील खाणींवरून खनिज मालाची वाहतूक अशी पोलीस बंदोबस्तात सुरू झाली.

कोडली येथील वेदांतच्या सेझा स्टरलाइट खाणीवरून ई-लिलाव झालेल्या खनिजाची वाहतूक अखेर काल कडक पोलीस बंदोबस्तात सुरू झाली. वाहतुकीच्या कंत्राटावरून वाद निर्माण झाल्यानंतर खनिज वाहतूक झाली नव्हती. काल संध्याकाळी ५ वा.पर्यंत ३५० टन खनिजाची वाहतूक झाल्याचे सांगण्यात आले.वाहतुकीच्या कोडली ते उसगाव तिस्क मार्गावर दर पाचशे मीटर अंतरावर पोलीस तैनात करण्यात आले होते. शिवाय कोडली खाणीभोवतीही कडक पोलीस पहारा होता. खनिज घेऊन निघणार्‍या प्रत्येक ट्रकासोबत पोलिसांचे पीसीआर वाहन जात होते. दरम्यान, जीईएलशी नोंदणीकृत ट्रकांनाच यात सामावून घेतल्याचे सांगण्यात आले.
ई लिलाव झालेल्या खनिजाची वाहतूक करताना ‘जीईएल’कडे नोंदणी झालेल्या खनिज ट्रकांना सामावून घेण्यात यावे अशी उत्तर गोवा ट्रक मालक संघटनेची मागणी होती. तसे न झाल्यास कायदा हातात घेण्याचा इशारा त्यांनी दिला होता.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार काल काही गट उसगाव तिस्क येथे वाहने थांबवण्याच्या तयारीत होते मात्र कडक पोलीस बंदोबस्त पाहून त्यांनी तसे करणे टाळले. दरम्यान, खनिज वाहतुकीचे कंत्राट मिळालेल्या अभिषेक प्रभू लॉजीस्टीकचे मालक दाभाळ किर्लपालचे सरपंच दीपक प्रभू पावसकर हे खाणीवर उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, कोर्टाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या वेळेत खनिज वाहतूक होईल. काल दुपारी २ ते ५ या वेळेत ३५ ट्रीप्स झाल्याचे त्यांनी सांगितले. वाहतुकीत दाभाळ, उसगाव, धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील ट्रकांना सामावून घेतले असून लगतच्या भागांतील ट्रकांनाही सामावून घेतले जाणार आहे. जीईएलशी नोंदणीकृत असलेल्या ट्रकांनाच सामावून घेतले असल्याचे पावसकर यांनी सांगितले.