केंद्र सरकारने देशभरात लागू केलेले २१ दिवसांचे लॉकडाऊन १४ रोजी संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने १५ एप्रिलपासूनचे आरक्षण सुरू केले आहे. या बुकिंगनुसार १५ एप्रिलपासून कोकण रेल्वेची सेवा सुरू झाली तर गोव्यासाठी तो मोठा चिंतेचा विषय ठरणार आहे.
गोवा हे देशातील सर्वांत लोकप्रिय पर्यटन स्थळ असून उन्हाळ्यात दरवर्षी गोव्यात देशी पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे गोव्यात येत असतात. कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर येत्या १५ एप्रिलपासून कोकण रेल्वे सेवा सुरू झाली तर राज्यात हजारोंच्या संख्येने देशी पर्यटक येणार असून तसे झाल्यास राज्यात कोरोनाचा फैलाव होण्याची भीती निर्माण झाली आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांना विचारले असता १५ एप्रिलपासूनचे कोकण रेल्वेचे आरक्षण सुरू झाले असल्याच्या वृत्ताला त्यांनी पुष्टी दिली. इंडियन रेल्वेज केटरिंग ऍण्ड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) कोकण रेल्वेचे १५ एप्रिलपासूनचे आरक्षण सुरू केले असल्याचे ते म्हणाले. याचा अर्थ १५ एप्रिलपासून कोकण रेल्वे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे काय, असे विचारले असता, देशातील सगळीच रेल्वे सेवा बंद असून ती १५ एप्रिलपासून सुरू करायची की काय त्याचा निर्णय रेल्वे मंत्रालय घेणार असल्याचे ते म्हणाले. रेल्वे मंत्रालय नेमका काय निर्णय घेते त्यावर सगळे अवलंबून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. १४ एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊन असल्याने देशभरातील सर्व रेल्वेंचे १४ एप्रिलपर्यंतचे आरक्षण बंद झाले होते. आता १४ एप्रिल हा लॉकडाऊनचा शेवटचा दिवस असल्याने व अजून तरी सरकारने लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याचा निर्णय न घेतल्याने आयआरसीटीने १५ एप्रिलपासून कोकण रेल्वेचे आरक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे घाटगे यांनी नमूद केले.